सचिन जवळकोटे
जिल्ह्यातील दोन मोठे लोकप्रतिनिधी. पहिल्या ताई...दुसरे महाराज. या आमदार ते खासदार. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दोघांचाही भारदस्त वावर. ‘प्रणितीताईं’चा ‘राहुलबाबां’सोबत तर ‘महाराजां’चा ‘मोदीं’सोबतचा फोटो नुकताच नजरेला पडलेला. मात्र फोटो पाहताना एक गूढ प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकलेला. या दोघांचाही दिल्लीत एवढा रुबाब...तरीही आपल्याच गावात एवढी हतबलता का? प्रश्न...प्रश्न...प्रश्न...म्हणूनच याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न...लगाव बत्ती...
दिल्लीत ‘गोंडगाव महाराजां’नी नुकतीच ‘मोदीं’ची भेट घेतलेली. त्यांना स्वत:च्या हातात म्हैसुरी पगडीही नेसवली. भगव्या वस्त्रांचा आदर करणाऱ्या ‘मोदीं’नी ‘महाराजां’ची आस्थेनं विचारपूस केली. कसंनुसं हसत ‘सब ठीक है’ असं भलेही ‘महाराज’ म्हणाले असले तरी सोलापुरात काहीच ठीक नव्हतं, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाऊक होते. खासदार होऊन पावणेचार वर्षे होत आली; मात्र या कालावधीत ‘महाराज’ जिल्ह्यातील किती सार्वजनिक सोहळ्यांना उपस्थित राहिले, हे त्यांच्या पीएलाच ठाऊक.
त्यांचा मठ शेळगीत. निवासस्थान अक्कलकोटमध्ये. ‘मार्केट यार्ड ते पाण्याची टाकी’ या मार्गावरची मंडळी सोडली तर ‘महाराजां’ची गाडी कधी इतर सोलापूरकरांनी पाहिल्याचं कुणीच सांगायला नाही तयार. शेळगीहून पुण्याला जाण्यासाठी बाहेरच्या बाहेर बायपास रोड. त्यामुळे जनतेला दर्शनच नाही. खरंतर हे सारं घडलं ‘सीसी’कांडामुळे होय. कास्ट सर्टिफिकेट. जवळची भक्तमंडळी मठापासून दूर झाली. पार्टीचे नेते-कार्यकर्तेही त्यांचं नाव चारचौघांत घेताना टाळू लागली.
सोलापूरच्या विमानसेवेसाठी ‘महाराजां’नी आजपावेतो तीनवेळा ‘ज्योतिरादित्यां’ची भेट घेतलेली. पहिल्या भेटीत ‘सिंधियां’नी स्पष्टपणे सांगितलेलं, ‘अडथळे हटवणारच. विमान सुरू करणार’ मात्र दुसऱ्या भेटीत भाषा बदललेली ‘बारामतीकरांचा आग्रह वेगळाच दिसतोय. जरा थांबूया’ नंतर परवा तिसऱ्या भेटीत उत्तर मिळालं, ‘अडथळे दूर करण्याची जबाबदारी स्टेटची. एकनाथभाई अन् फडणवीसांनी शब्द दिलाय. तेव्हा येत्या दोन-तीन महिन्यांत विमान उडणार सोलापुरातून. मात्र आयुष्यभर प्रचनात रमलेल्या ‘महाराजां’ना याचं मार्केटिंगच न करता आलेलं. ‘महाराज चोवीस तास मौनात असतात’ हा जसा प्रपोगंडा झाला, तसाच ‘महाराज काहीच काम करत नाहीत’ अशाही कंड्या पिकल्या गेल्या.
शेळगीतला रस्ता खासदार निधीतून होऊनही तिथे महाराजांच्या नावाचा बोर्ड लावू दिला जात नाही, ही जशी त्यांची खंत, तशीच ‘अक्कलकोट’मध्ये सर्वप्रथम ‘कल्याणशेट्टीं’च्या कानावर टाकल्याशिवाय खासदार निधी खर्च करायला अधिकारी तयार नाहीत, हीही नवी ब्रेकिंग न्यूज. खरंतर ‘मल्लूअण्णां’च्या जेऊरमध्ये परस्पर वीस लाखांचा निधी दिल्यानंतर हा सारा बंदोबस्त केला गेला, हा भाग वेगळा. मध्यंतरी तर ‘प्रशांतपंतां’च्या पुढाकारातून सारेच आमदार ‘देवेंद्रपंतां’नाही भेटायला निघालेले, ‘खासदार निधी आम्हाला मिळत नाही’ म्हणून तक्रार करायला. काहीही असो खुद्द ‘कमळ’वाले ‘खासदारांना खासदारसारखं का वागवत नाहीत’ याचा शोध घेण्याची वेळ आता मतदारांवरच आलेली...लगाव बत्ती...
एकीकडे ‘प्रणितीताई’ राजस्थानात ‘राहुलबाबां’समोर यात्रेत पायपीट करत होत्या, तेव्हा इकडे जिल्ह्यात वेगळंच काहीतरी घडत होतं, शिजत होतं. ‘शिंदे फॅमिली’ला अंधारात ठेवून जिल्ह्यातील तालुका ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी करण्यात आलेल्या. प्रश्न या पदांचा नव्हता. जिल्ह्याच्या नेतृत्वाचा होता. एकेकाळी महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या ‘सुशीलकुमारां’ना पद्धतशीरपणे डावलण्याचा होता.
या निवडींविरुद्ध मंगळवेढ्याच्या ‘नंदकुमारां’नी एकेरी भाषेत ‘धवलदादां’समोर संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘ढोबळे-काळें’ची माणसं ‘हात’ पार्टीत मोठी केली जाताहेत, असा आरोपही केला गेला. जिथं ‘ढोबळे-काळे’च एकाच पार्टीशी कधी निष्ठावान राहिले नाहीत, तिथं त्यांच्या कार्यकर्त्यांचा तरी काय दोष? असो. तीन जुने ‘हात’वाले मुंबईत जाऊन ‘पटोलेनानां’ना भेटले. या नव्या निवडींविरुद्ध तक्रारी केल्या. तेव्हा ‘नानां’नी ठणकावून सांगितलं, ‘कुठलीही नवी निवड झाली की सोलापूरचं शिष्टमंडळ निघतंच तक्रारी करायला. सेवादल असो, प्रवक्ता असो. नाहीतर जिल्हाध्यक्ष असो. प्रत्येकवेळी तक्रार, तक्रार, बंद करा हे आता. निवडी बदलल्या जाणार नाहीतच.’
तिघे हिरमुसले होऊन परतले. ‘निवडीला स्टे मिळाला’ असे सांगणाऱ्यांचे चेहरेही बारीक झाले. खरंतर हा देशातल्या अन् राज्यातला बदलत्या राजकारणाची छोटीशी झलक होती. ‘खर्गेअण्णा, एच.के. अण्णा अन् पटोलेनानां’ची ही स्ट्रॅटेजी होती. त्याला साथ ‘संगमनेर’च्या ‘थोरातां’ची होती. जिथं साडेतीन वर्षांपूर्वी पहिल्याच आमदारकीत ‘तनपुरे-तटकरे’ वंशजांना मंत्रिपद दिलं गेलेलं, तिथं तिसऱ्या टर्मलाही ‘शिंदे’पुत्रीला पद्धतशीरपणे सत्तेतून दूर ठेवलं गेलेलं. या पार्श्वभूमीवर ‘ताईं’ना विश्वासात न घेता जिल्ह्यातील पदाधिकारी निवडण्याची घटना तर किस झाड की पत्ती होती.
‘मोदी लाटेतही तिसऱ्यांदा आमदारकी मिळविणाऱ्या ‘प्रणितीताईं’चं कर्तृत्व कदाचित ‘कमळ’वाल्यांनी अचूक ओळखलेलं, म्हणूनच की काय आजही ही मंडळी आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील. मात्र ‘ताईं’च्या पार्टीची मंडळी या गटाचं खच्चीकरण करण्यासाठी आसुसलेली. ‘दिल्लीत रुबाब’ दाखविणाऱ्या ‘ताईं’ची कार्यकर्ते मंडळी ‘गल्लीत हतबल’ झालेली. वक्त वक्त की बात है...लगाव बत्ती...