डॉ. गिरीश जाखोटिया
शेती, शेतकी प्रश्न आणि शेतीच्या व्यवस्थापनाबद्दल खूप चर्चा झाल्या आहेत आणि खूप लिहूनही झाले आहे. या लेखाचा उद्देश आहे शेतकरी उत्कर्षाचा सोपा नियम (वा मूलमंत्र) सांगण्याचा. याला आपण सुटसुटीत भाषेत ‘३० चा नियम’ (रूल आॅफ ३०) असे नाव देऊयात. हा नियम म्हणजे विविध उपयोगी ठोकताळ्यांचा एक संच आहे जो माझ्या आजपर्यंतच्या अभ्यासावर आधारित आहे.माझा अभ्यास हा अपुरा असू शकतो. तुमच्या अनुभवानुसार तुम्ही हे ठोकताळे अधिक अचूक करू शकाल. यातील काही गृहीतके स्थल-काल-व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. उदाहरणार्थ, महागाईचा दर, शेतीचा आकार व प्रकार, कुटुंबाचा आकार व प्राधान्ये इत्यादी. आपण सुरुवात करूयात तुमच्या मासिक उत्पन्नापासून. खेडे-तालुका असे मिश्र जनजीवन गृहीत धरून हे किमान मासिक उत्पन्न साधारणपणे तीस हजार रुपये तरी असावे. हा आपल्या नियमातील पहिला ३०! (तुमच्या सध्याच्या आठ ते १० हजार मासिक उत्पन्नाने तुम्ही गरिबीतून कधीही वर येऊ शकणार नाही.) तुमच्या कुटुंबात मी सहा सदस्य गृहीत धरलेत. तुम्ही दोघे पती-पत्नी, तुमचे वृद्ध आई-वडील व शिक्षण घेणारी दोन मुले. महिन्याचा घरखर्च १५ हजार रुपये. त्यात औषधोपचार व सणांचा खर्च धरला आहे. मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी आणि अन्य प्रगतीच्या उपक्रमांसाठी पाच हजार. शेती, जीवन व अन्य विम्यासाठी पाच हजार आणि राहिलेले पाच हजार ही तुमची सक्तीची मासिक बचत. ही गोळाबेरीज होते तीस हजारांची. या तीसच्या नियमात पुढे जाऊया. मासिक ३० हजार उत्पन्न म्हणजे वर्षाला झाले तीन लाख साठ हजार. मी गृहीत धरतो की, तुमच्याकडे फक्त तीन एकर शेतजमीन आहे. आज साताºयाच्या आतल्या भागात जिथे पाऊस अगदीच जेमतेम पडतो, तिथे जमिनीचा एकरी बाजारभाव धरूया चार लाख इतका. म्हणजे तीन एकरांची एकूण किंमत (म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य) होते बारा लाख. तुमचे वार्षिक निव्वळ शेतकी उत्पन्न (शेती करण्याचा खर्च वजा जाता) तीन लाख साठ हजार व्हायचे असेल, तर तुमच्या एकूण गुंतवणुकीवरचा परताव्याचा वार्षिक दर असायला हवा तीस टक्के. (बारा लाखांवर तीस टक्के.) हा आपल्या नियमातला दुसरा ‘तीस’. तीस टक्के परताव्याचा दर मिळण्यासाठी शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमच्या मालाचा बाजारभाव नीटपणे ठरवावा लागेल.
महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे शोषण करणाºया दलालांना व भ्रष्ट व्यवस्थेला तुम्ही टाळायला हवे. आता हे कठीण काम एकटा-दुकटा शेतकरी करू शकत नाही. यासाठी तुम्ही एकत्र यायला हवे. इथे येतो आपल्या नियमातला तिसरा ‘तीस’. साधारणपणे तीस शेतकरी एकत्र आले, तर एकूण जमीन होते शंभर एकर. सहकारी तत्त्वावर सामुदायिक शेती केल्यास प्रत्येकी पंचवीस एकरात एक अशी चार वेगवेगळी पिके घेता येतील. जेणेकरून बाजारभाव काहींचे वर-खाली झाले तरी सरासरी परतावा मिळेल जो तीस शेतकऱ्यांना वाटून घेता येईल. तुम्हाला तुमच्या जमिनीचे स्वतंत्र व दूरगामी मूल्यांकन करता यायला हवे. इथे येतो आपल्या नियमातला चौथा ‘तीस’! असे मूल्यांकन करण्यासाठी किमान तीस वर्षांचा भविष्यकालीन परतावा तीस टक्क्यांनी मोजून आणि वेळ-महागाईच्या संदर्भात बदलून विचारात घ्यायला हवा. बाजारभाव किंवा असे मूल्यांकन, या दोहोंपैकी अधिकची किंमत तुम्ही अपेक्षित धरायला हवी. यातही पुन्हा तुमच्या जमिनीचे वेगळे असे महत्त्व असल्यास तेही मूल्यांकनात यायला हवे. तुमची शेतजमीन मोठ्या कंपनीला कसायला देणार असाल, तर तीस टक्के परतावा आणि तीस वर्षांची मिळकत लक्षात घ्या. मोबदला म्हणून ही कंपनी तुम्हाला तिच्या मालकीहक्काचे समभागही देऊ शकेल. नियमातला पाचवा ‘तीस’ हा तुमच्या पंचक्रोशीचा! साधारणपणे तीस चौरस किलोमीटर क्षेत्रातील विकासासाठी सामूहिकपणे पुढाकार घ्यायला हवा. इस्पितळे, शाळा, रस्ते, पाणी, बाजारपेठ व अन्य दळणवळणाची व्यवस्था या पंचक्रोशीत व्हायला हवी. ३० गुणिले ३० गुणिले ३० फुटांची जलाशये तुम्ही जमतील तेवढी निर्माण करायला हवीत. यासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीसाठी आग्रही असायला हवे. लेखाच्या शेवटी नियमातल्या सहाव्या व अखेरच्या ‘तिसा’कडे येतो. साधारणपणे पंचविशीत तुम्ही कामाला लागलात, तर ‘तीस’ वर्षे भरपूर काम करा.
या तीस वर्षांच्या वाटचालीत फालतू पुढाºयांना टाळा, अनावश्यक खर्च टाळा, त्यासाठी अंधश्रद्धा टाळा, भय-क्रोध-निराशा व व्यसने टाळा, अहंकार-भाऊबंदकी व जातपात टाळा. हिशेबी व सतर्क व्हा, निरोगी राहा, शेतीचे ज्ञान व त्याचा उपयोग वाढवा, समुदायातील शेतकºयांशी बंधूभाव व सहकार्य वाढवा आणि आर्थिक समृद्धीकडे पूर्ण लक्ष द्या.
( लेखक अर्थतज्ज्ञ आहेत )