भारतीय सैनिकाला पकडल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने चार दिवसात कोलांटउडी मारली. त्यामुळे चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी धावा केला जात आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिला, त्यातून सैनिक आणि शेतकरी यांचे देशाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित झाले. या दोन्ही घटकांविषयी सर्वसामान्य भारतीयांच्या मनात आदराची भावना आणखी बळावली. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बघायला मिळतो. गावामधील अनेक शेतकऱ्यांची मुले सैन्यात दाखल होतात. सैनिकांचे गाव म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील सामनेर हे गाव त्यापैकीच एक आहे. गेल्या आठवड्यात ते अचानक प्रकाशझोतात आले. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याने देशभर आनंदोत्सव साजरा होत असतानाच चंदू चव्हाण या सैनिकाने चुकून नियंत्रण रेषा ओलांडल्याने त्याला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्याची बातमी येताच सामनेरसह खान्देशला धक्का बसला. त्याचे मूळ गाव सामनेर (जि.जळगाव) आणि आजोळ बोरविहिर (जि.धुळे) येथील नातेवाईक व ग्रामस्थांनी ‘चंदूदादा’च्या सुटकेसाठी धावा सुरु केला. चंदू यांच्या सुटकेच्या मागणीसाठी सामनेरला ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला. सरपंचांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. धुळ्यात विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने केली. ज्याला जो मार्ग योग्य वाटला, त्याने तो निवडून चंदू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांची ही धडपड जशी चंदू चव्हाण यांच्यासाठी होती, तशीच ती प्रत्येक भारतीय सैनिकासाठी होती. भारतीय सैनिकांविषयी सर्वसामान्यांमध्ये असलेल्या आस्थेची ही अनुभूती होती. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी लष्कराने पकडल्याच्या बातमीच्या धक्क््याने त्याच्या आजीचे निधन झाले. मोठ्या भावासोबत आजी जामनगर (गुजराथ) येथे राहात होती. भाऊ भूषण चव्हाण हादेखील लष्करात कार्यरत आहे. आई-वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर चंदू आणि त्यांच्या भावंडांचे पालनपोषण या आजीने बोरविहिर येथे केले. चंदू परत येत नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने आजी-नातवाच्या ऋणानुबंधाचे दर्शन घडले. चंदू यांना पाकिस्तानी लष्कराने पकडणे, त्या धक्कयाने आजीचे निधन होणे, या दु:खद वार्ता चव्हाण कुटुुंबियांमध्ये घडत असताना भाच्याच्या आगमनाने एक सुखद झुळूक आली. इंदूर येथे असलेल्या रुपाली नामक बहिणीला मुलगा झाला. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारख्या या घडामोडी घडत आहेत. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी चंदू यांच्या कुटुंबियांना दिली आहे. राजनाथसिह यांनी भूषण चव्हाण यांना फोन केला तर डॉ.भामरे हे स्वत: बोरविहिरला जाऊन आले. आजोबा चिंधा पाटील आणि भाऊ भूषण चव्हाण यांना भेटून थोडा अवधी लागेल, पण चंदू यांना परत आणू असा दिलासा दिला. ‘स्ट्रॅटेजीक स्ट्राईक’ नंतर बिथरलेल्या पाकिस्तान आणि तिथल्या प्रसार माध्यमांच्या कोलांटउड्यांनी चव्हाण कुटुुंबियांची चिंता वाढवली आहे. ‘डॉन न्यूज ’ नेच चंदू चव्हाण या भारतीय सैनिकाच्या अटकेचा दावा केला होता. भारतीय लष्कराने चंदू हा चुकून सीमा ओलांडून गेल्याचे सांगत पाकिस्तान लष्कराकडे त्याच्या सुटकेची मागणी केली. परंतु चार दिवसांनी पाकिस्तानने चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच असा कांगावा सुरु केला.पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार होणारे उल्लंघन, कबुतरे, फुगे पाठवून निर्माण केलेले संभ्रमाचे वातावरण यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. संबंध सुधारल्यानंतर चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होतील, याची जाणीव सैनिक असलेल्या भावाला आहे. त्यामुळे परिस्थिती निवळण्याची सारे वाट पाहात आहेत.- मिलिंद कुलकर्णी
सैनिकाच्या सुटकेसाठी धावा
By admin | Published: October 08, 2016 4:02 AM