नवीन जबाबदारी कशी वाटते आहे? एका क्षणात सगळे जीवन बदलले. माझी मारुती झेन स्वतः चालवणारा मी आता चारही बाजूला सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेरला गेलो आहे. आता माझे व्यक्तिगत जीवन राहिलेलेच नाही. खुलेपणाने जगणारा माणूस आता बंधनात अडकला आहे. ही नवी दिनचर्या सवयीची व्हायला थोडा वेळ लागेल. राजघराण्याकडे असणारी हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची एका बसचालकाच्या मुलाकडे आली आहे.
काँग्रेसमध्ये वातावरण बदलते आहे का? बिलकुल. यावेळी निवडून आलेल्या बहुतेक आमदारांमध्ये माझ्यासारखे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून ते वेगवेगळ्या निवडणुका लढवत आले. आता काँग्रेसचा साधारण कार्यकर्ताही मोठ्या पदाचे स्वप्न पाहू शकतो. सामान्य कार्यकर्त्याला सशक्त करण्याचे राजीव गांधी यांचे स्वप्न साकार होताना दिसते आहे.
आपण नव्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान देणार काय? का नाही? सर्व अनुभवी आमदार आणि पक्षश्रेष्ठींशी बोलून मंत्रिमंडळाचे स्वरूप ठरवले जाईल. परंतु त्याआधी मी आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री राजस्थानमध्ये असलेल्या भारत जोडो यात्रेत काही काळ राहुल गांधींबरोबर चालणार आहोत.
तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हापर्यंत होईल?याबाबतीत आमचे प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला सांगू शकतील. दोन दिवस आधीपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हेही मला माहीत नव्हते.
आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल? सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून इथवर पोहोचलो आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेचा मी महामंत्री आणि अध्यक्ष होतो. सहा वर्षे एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्षपद माझ्याकडे होते. महाविद्यालयात जाण्यापूर्वी सकाळी ६ ते ८ मी दूध विकत असे. १० वर्षे हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मी सांभाळले. चार वेळा आमदार झालो; आणि आता पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे.
तुम्हाला सरकार चालवण्याचा अनुभव नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या असंतुष्टांना तुम्ही कसे सांभाळणार?मी पक्ष संघटनेत बराच काळ घालवला आहे. वीरभद्र सिंह मुख्यमंत्री असताना मी प्रदेशाध्यक्ष होतो. त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकायला मिळाले. २८ वर्षे पक्षसंघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना मी सर्वांना बरोबर घेऊन चाललो. खरेतर सरकार चालवण्यापेक्षा पक्ष संघटना चालवणेच जास्त कठीण असते, हेही जमेल! जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात आमच्या पक्षाने दिले आहे.
आर्थिक स्थिती चांगली नसताना हे कसे करणार? छत्तीसगड आणि राजस्थान सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यासाठी त्यांनी काय केले, याचा अभ्यास आम्ही करू. आमच्या मंत्रिमंडळाची बैठक तर होऊ द्या.
राज्यातल्या सर्व महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन आपण निवडणूक प्रचाराच्या वेळी दिले आहे. ते कसे पूर्ण करणार? सरकारची स्थापना होऊ द्या. सर्वजण एकत्र बसून मार्ग शोधूच! आधी हे पाहावे लागेल की राज्यातल्या किती महिला आयकर भरतात. त्यांना या योजनेमध्ये आणायचे की नाही यावरही विचार होईल.
एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन आपण दिले आहे. त्याचे काय? एकदा सचिवालयात पाऊल ठेवू द्या! किती जणांना सरकारी नोकरी देता येऊ शकते आणि किती जणांना खासगी क्षेत्रामध्ये नोकरी देता येईल याचा अंदाज घेऊ. पण एक खात्री देतो- जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल.