- नीता ब्रह्मकुमारी
शहरातील धावते जीवन, रस्त्यावर वाहनांची गर्दी, फेरीवाल्यांचे वेगवेगळे आवाज, मनामध्ये कामाची वर्दळ... असे हे आजचे मानवी जीवन. कधी कधी प्रश्न पडतो की ही धावपळ कोणासाठी, कशासाठी? आज भले कोणी श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक जण रूप आणि रुपयाच्या मागे धावत आहे. एक वेळ अशी होती की लोक सकाळी लवकर उठून काकड आरतीसाठी मंदिरामध्ये पोहोचायचे आणि मग आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात करायचे, पण आज तरुण असो की वृद्ध, सगळे एखाद्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉक करताना दिसून येतात.
शरीर निरोगी, तंदुरुस्त राहावे यासाठी केलेला हा प्रयत्न चुकीचा नाही, परंतु शरीराची जशी काळजी घेतली जाते तशी मनाची काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण आपल्या प्रत्येक विचारांचा परिणाम शरीराच्या अनेकानेक अवयवांवर सतत होत असतो. संपूर्ण दिवसामध्ये आपण काय आणि किती खावे, याची जागृती सध्या वाढत चालली आहे.
एखादा पदार्थ खाल्ल्याने किती चरबी वाढते, किती जीवनसत्त्वे मिळतात याचा चार्ट सतत बघितला जातो. पण या मनामध्ये कितीतरी व्यर्थ, नकारात्मक विचार चालतात व त्याचाच परिणाम म्हणून आज मधुमेह, रक्तदाब, कर्करोग असे नानाविध आजार शरीरात घर करत आहेत. आपण हे जाणतो की तन आणि धन (रूप आणि रुपया) या दोन्ही गोष्टींपासून लाभणारे सुख क्षणभंगुर आहे. याची जीवनात नितांत गरज आहे, परंतु जितकी आवश्यकता आहे तितकेच आपल्याजवळ असावे. पैसै आणि शरीराचा मोह अतिशय हानिकारक आहे. व्यक्ती हा रूपाने सुंदर असण्यापेक्षा गुणाने सुंदर असला तर जीवन सुंदर बनते. पैसा खूप असला तरी सरळ मार्गाने त्याची प्राप्ती केली नसेल तर तो सुख लाभू देत नाही. मनुष्य आपली व्यक्तिरेखा रूप आणि रुपया या दोघांनी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु या दोन्ही कालांतराने आपल्यापासून दूर जातील.