धर्मराज हल्लाळे
चौरी-चौरा : उत्तरप्रदेश निवडणुकीत गुंतागुंतीची जातीय समीकरणे आणि धार्मिक मुद्दे कायम असले तरी शिक्षित तरूण विकास, रोजगारासाठी आग्रही दिसले. तर शेवटच्या टप्प्यात प्रचार युक्रेनच्याही मुद्द्यावर आला आहे. भारतात सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या आम्ही कसे संपर्कात होतो, त्यांना कशी मदत केली याचा सर्वच पक्षातील उमेदवारांचे समर्थक लाभ उठवत आहेत.
गोरखपूर, बस्ती, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज सह उत्तरप्रदेशमधील सुमारे ३ हजारांवर विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकल्याचे सांगितले जाते. त्यातील काहीजण आपापल्या जिल्ह्यात परतले आहेत. सद्या निवडणूक आणि युक्रेन या दोनच विषयाची चर्चा घरोघरी आहे. त्यामुळे उमेदवारांचे समर्थक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. परत आलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ केले जात असल्याचे अभिषेक प्रजापती या युवकाने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व सभांमध्ये युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे.
चौरी चौरा...शहीदों की याद !
चौरी चौरामध्ये भाजपाने त्यांच्या आघाडीतील निषाद पक्षाच्या सर्वण निषाद यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपाचे बंडखोर अजयकुमार टप्पू यांच्यामुळे समाजवादी पक्षाला जागा निघण्याची आशा वाटते. याच ऐतिहासिक नगरीत ब्रिटिश ठाणे उद्धवस्त करणाऱ्या २२८ जणांवर इंग्रजांनी खटला केला होता, १७२ जणांना फाशी सुनावली, त्यातील १९ जणांना फाशी दिली. ज्यात सर्व जाती धर्मातील स्वातंत्र्य सेनानी होते. त्या सर्वांची आठवण काढून मोठी भाषणबाजी सद्या सुरू आहे.
गोरखपूरमध्ये ४० टक्के बिहारी...
गोरखपूरचा मेकॅनिकल अभियंता आनंद सहानी म्हणाला, शिक्षण घेऊन रोजगार नाही. गोरखपूर शहरात ४० टक्के लोक बिहारमधून येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांचे रोजगार गेले. आमच्या पिढीनेही काय पुन्हा मुंबईकडेच जायचे का? एक नक्की गेल्या काही वर्षात रस्ते, सुविधा वाढल्या आहेत.