अन्वयार्थ- रशिया, युक्रेन आणि पाडलेले/पडलेले विमान : खरे काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:32 AM2024-02-05T08:32:34+5:302024-02-05T08:33:03+5:30

रशियाचा आरोप आहे की ‘युक्रेनने त्यांचे स्वतःचेच युद्धबंदी असलेले विमान पाडले आहे.’ युक्रेननेही अधिकृतपणे या आरोपाचा इन्कार केलेला नाही!

Russia, Ukraine and the downed/downed plane: What really happened? | अन्वयार्थ- रशिया, युक्रेन आणि पाडलेले/पडलेले विमान : खरे काय घडले?

अन्वयार्थ- रशिया, युक्रेन आणि पाडलेले/पडलेले विमान : खरे काय घडले?

वप्पाला बालचंद्रन

रशियाच्या बेलगोरोड प्रांतात २४ जानेवारीला ‘इल्युशिन - ७६’ हे रशियन लष्करी वाहतूक विमान कोसळून ६५ युक्रेनियन युद्धबंद्यांसह ७४ प्रवासी मरण पावले. आठवडा उलटल्यावर आता वादाला तोंड फुटले आहे. ‘एमएस १७’ या मलेशियन विमानाला २०१४ साली झालेला अपघात किंवा त्याआधी १९८३ मध्ये शीतयुद्ध शिगेला पोहोचले असताना तत्कालीन सोव्हियत रशियाने दक्षिण कोरियाचे ‘केएल ००७’ हे प्रवासी विमान पाडले होते; या घटनांशी ताज्या विमान अपघाताची तुलना केली जात आहे.

२० जानेवारी १९८१ रोजी अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून रोनाल्ड रेगन यांनी सूत्रे हाती घेतली. मॉस्कोविरुद्ध त्यांनी कडक धोरण अवलंबले. ८ मार्च १९८३ रोजी त्यांनी सोव्हियत युनियनचे वर्णन ‘दुष्ट साम्राज्य’ असे केले. त्याच महिन्यात त्यांनी आक्रमक बचावासाठी डावपेचात्मक संरक्षण धोरण (स्टार वॉर्स पॉलिसी) जाहीर केले. रेगन स्वतःहून अण्वस्त्र हल्ला करतील, अशी भीती रशियन गुप्तचरांना वाटत होती. अमेरिकेने प्रथम हल्ला केला तर तो हाणून पाडण्यासाठी त्यांनी ‘रियान’ हा अधिक तत्पर गुप्तचर कार्यक्रम हाती घेतला; त्याचा परिणाम असा झाला की, १ सप्टेंबर १९८३ रोजी न्यूयॉर्कहून अलास्कामार्गे सेऊलला जाणारे कोरियन एअरलाइन्सचे ‘बोईंग ७४७’ हे विमान ‘चुकून’ पाडण्यात आले. कर्मचाऱ्यांसह २६९ प्रवासी यात मरण पावले. हे अमेरिकेचे हेरगिरीचे विमान ‘बोइंग आरसी १३५’ आहे, असा रशियाचा समज झाला होता. 

१७ जुलै २०१४ रोजी मलेशियन एअरलाइन्सचे ॲम्स्टरडॅमहून कौलालंपूरला जाणारे ‘बोइंग ७७७’ हे विमान रशिया समर्थक बंडखोरांच्या युक्रेनमधील डोनबास प्रदेशावरून उडत होते, ते क्षेपणास्त्र डागून पाडण्यात आले. त्यात २९८ प्रवासी मरण पावले. 

२४ जानेवारी २०२४ रोजी घडलेली विमान दुर्घटना अधिक गोंधळात टाकणारी आहे. विमान पडल्यानंतर लगेचच रशियाने असा आरोप केला की, ‘युक्रेनने त्यांचे स्वतःचेच युद्धबंदी असलेले विमान पाडले आहे़.’ युक्रेनने अधिकृतपणे आरोपाचा इन्कार केला नाही; परंतु रशिया त्यांच्या युद्धबंद्यांना लष्करी विमानातून आणत होते, याची माहिती आपल्याला नव्हती, असा खुलासा मात्र केला. युद्ध चालू असतानाही दोन्ही देशांमध्ये युद्धकैद्यांची अदलाबदल होत होती. १९ डिसेंबर २०२३ रोजी पश्चिमी माध्यमांनी युक्रेनच्या घोषणेचा हवाला देऊन सांगितले की, २०१४ पासून रशियाने ३५७४ युक्रेनियन सैनिक आणि ७४३ नागरिकांना बंदिवान करून  मॉस्कोचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांच्या ताब्यात दिले आहे. २५९८ जवानांना ४८ वेळा झालेल्या अदलाबदलीत युक्रेनने परत मिळवले. 

विमान पडले त्या ठिकाणाहून जवळच्या शवागारात केवळ पाच मृतदेह नेण्यात आले, असे युक्रेनने जाहीर केल्याबरोबर वादाला तोंड फुटले. बीबीसीने म्हटले की, विमान दुर्घटनेत ६५ युक्रेनियन युद्धबंदी होते, या दाव्याच्या पुष्ट्यर्थ पुरेसा, पटेल असा पुरावा देण्यात रशिया अपयशी ठरला आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांवरून दाखविण्यात आलेल्या पहिल्या व्हिडीओत अनेक मृतदेह दिसत होते. परंतु, बरीच जीवितहानी झाल्याचे दाखविणारी छायाचित्रे मात्र नव्हती.

सीएनएनने म्हटले, रशियन तपास समितीने बर्फात पडलेल्या मृतदेहांच्या काही क्लिप्स दाखविणारा दुसरा व्हिडीओ प्रदर्शित केला; परंतु ही छायाचित्रे दुर्घटना स्थळाचे हवाई छायाचित्रण असल्याचा खुलासाही केला. याचा अर्थ दोन्हीचा सांधा जोड करण्यास हा पुरावा पुरेसा नव्हता. आतापर्यंत कैद्यांची अदलाबदल ही रस्ता वाहतुकीतून किंवा रेल्वेने केली जात होती. हवाईमार्गे वाहतूक होण्याचे अलीकडचे हे एकमेव उदाहरण. आपल्याला बदनाम करण्यासाठी रशिया चुकीची माहिती पसरवत आहे, अशी युक्रेनची भावना झाली आहे. यातच पुतीन यांनी आरोप केला की, युक्रेनने ‘आयएल ७६’ हे विमान अमेरिकन किंवा फ्रेंच क्षेपणास्त्रे वापरून पाडले. पश्चिमी भूराजकीय हितसंबंध राखण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच सैनिकांचा बळी दिला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांनीही विमान पाडल्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे.

(लेखक कॅबिनेट सचिवालयातील माजी विशेष सचिव, आहेत)

 

 

Web Title: Russia, Ukraine and the downed/downed plane: What really happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.