सर्वसामान्य भारतीय नागरिकांना युक्रेन नावाचा देश या जगाच्या पाठीवर आहे, याची कल्पनाही नसेल. सोविएत रशियाची शकले पडली, त्यातून निर्माण झालेला युक्रेन हा देश आहे. तो माहिती असणे शक्य नाही. तसेच अशा दूरवरच्या देशात भारतातील हजारो मुले-मुली वैद्यकीय शिक्षणासाठी गेली आहेत, याचीही अनेकांना कल्पना नव्हती. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून अशा मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला, तेव्हा सांगली किंवा उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील छोट्या छाेट्या गावातून मुले आणि मुली युक्रेनची राजधानी कीव्ह या शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली. खरेच जग लहान झाले आहे. त्याचे जागतिकीकरण झाले आहे. दोन देशांदरम्यान वाद निर्माण होणे किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीत तणाव निर्माण होणे आता कोणालाच परवडणारे नाही, इतके जगभरातील मानवी संबंधांचे नाते गुंतले आहे.
१९८० मध्ये अफगाणिस्तानात रशियाने घुसखाेरी करून बंडखोरांविरुद्ध युद्ध छेडले तेव्हा जगाने चिंता करावी असे वाटत नव्हते. राजकीय चिंता जरूर असेल, पण सर्वसामान्य माणसांच्या घराघरांत ती क्वचितच होती. रशियाने युक्रेनवर युद्ध लादताच जगभरातील भांडवली बाजार कोसळला. क्रूड ऑइलचे दर बदलू लागले. सोने-चांदीच्या व्यापारावर परिणाम होऊ लागला. तसेच या देशात उच्चशिक्षणासाठी गेलेल्या भारतीय मुला-मुलींच्या सुखरूपतेला धरून चिंता वाढली. भारत सरकारचे रशियाशी घनिष्ठ संबंध असल्याने आणि युक्रेनविषयी तणाव नसल्याने भारतीय मुलांना सुखरूप आणण्याची मोहीम आखता आली. भारत सरकारने त्या मोहिमेस ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे.
या ऑपरेशनअंतर्गत २१९ विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान शनिवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथील माहोल हा त्या सर्वांना पुनर्जन्म मिळाला, असा होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. रविवारी आणखी दोन विमाने विद्यार्थ्यांना घेऊन आली. अशी अनेक विमाने येत राहतील. युक्रेनमध्ये भारतीय विमानांना उतरता येत नाही. युक्रेनवरील आकाश बॉम्बफेक करणाऱ्या रशियन विमानांनी व्यापून टाकले आहे. परिणामी, युक्रेनचे शेजारी रुमानिया किंवा पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना यावे लागत आहे.
देशाची सीमा ओलांडणे हे दिव्य असते. युद्धजन्य परिस्थितीत तर महाकठीण असते. सुदैवाने रशियासह युक्रेनभोवतीच्या देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे रुमानिया किंवा पोलंडमध्ये विमाने उतरून आपल्या मुलांना घेऊन यावे लागले. प्राथमिक अंदाजानुसार युक्रेनमध्ये सुमारे साडेपंधरा हजार भारतीय विद्यार्थी आहेत, असे सांगण्यात येते. त्या सर्वांनाच युद्ध समाप्तीची घोषणा होऊन युक्रेन पूर्वपदावर येईपर्यंत मायदेशी परतावे लागणार आहे. या युद्धाने ज्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्यांचाही विचार युद्ध समाप्तीनंतर होणार आहे. कारण रशिया हा भारताचा पूर्वीपासूनचा म्हणजे सर्वांत जुना मित्र आहे. संरक्षण क्षेत्रात रशियाशी भारताचे खूप जवळचे सहकार्य आहे.
या सहकार्याचा भारताला प्रत्येक वेळी उपयोग झाला आहे. किंबहुना प्रत्येक अडचणीच्या वेळी भारताने रशियाकडेच आशेने पाहिले आहे आणि रशियानेही भारताच्या या आशेवर पाणी फेरलेले नाही. परिणामी, संयुक्त राष्ट्रसंघात या युद्धाचा विषय आला तेव्हा भारताने तटस्थ राहणे पसंत केले. याचा अर्थ विराेध करणारे देश युद्धखाेर नाहीत, शांततावादी आहेत असा भाग नाही. अमेरिकेने इतर देशांच्या युद्धभूमीवर जाऊन अनेक युद्धे केली आहेत. त्यांचा विराेध हा राजकीय आहे. भारताने तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर पुढे युक्रेन कसा अर्थ घेणार यावर उभय देशांच्या संबंधांचा विचार हाेणार आहे. हे संबंध ताणले तर तेथे जाऊन उच्चशिक्षण घेणे साेपे राहणार नाही. मात्र, युक्रेन तशी काही कडक भूमिका घेईल, असे आता तरी वाटत नाही.
अद्याप युद्ध सुरू आहे. याचा शेवट कसा हाेईल माहीत नाही. भारत सरकारने आखलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ माेहिमेस अधिक वेग देऊन आपल्या मुला-मुलींना सुखरूप मायदेशी आणणे याला प्राधान्य दिले पाहिजे. गंगा ऑपरेशन यशस्वी हाेवाे. भारतातील सर्वसामान्य कुटुंबांतील मुले-मुली आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करताहेत हेच यातून स्पष्ट हाेते. सर्वच युक्रेनवासीयांना सुखरूप आणि शांततेने राहण्याचा अधिकार आहे, हेदेखील यानिमित्त प्रकर्षाने जाणवते.