रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला चढवेल आणि त्यातून तिसऱ्या महायुद्धालाही तोंड फुटू शकेल, अशी धास्ती निर्माण झाली असताना, थोडी दिलासादायक बातमी आली आहे. सीमेवर तैनात करण्यात आलेल्या एक लाख ३० हजार सैन्यांपैकी काही तुकड्या त्यांच्या तळांवर परततील, असे रशियन लष्करातर्फे मंगळवारी सांगण्यात आले. रशियाद्वारा युक्रेनवर हल्ल्याची शक्यता असल्याची ओरड अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘नाटो’ या लष्करी संघटनेत सहभागी असलेले देश करीत असताना रशिया मात्र तसा इरादा नसल्याचे वारंवार सांगत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने काही तुकड्या माघारी बोलावल्यास तणाव कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते.
अर्थात रशियाला युक्रेनच्या भूभागाचा घास घेण्याची इच्छाच नसती, तर सीमेवर तणाव निर्माण होण्याचे कारणच नव्हते, हेदेखील तेवढेच खरे आहे. रशियाने २०१४ मध्ये युक्रेनचा क्रीमिया नामक भूभाग हडपला होता, हे विसरता येणार नाहीच! पूर्व युरोपातील युक्रेन सातत्याने आक्रमणांनी भरडला गेला. तेराव्या शतकात मंगोलांनी, त्यानंतर पोलंडने, पुढे लिथुआनियाच्या एका सरदाराने आणि शेवटी रशियाच्या झारने युक्रेन गिळंकृत केला. रशियन राज्यक्रांतीनंतर युक्रेन सोव्हिएत संघराज्याचा एक प्रांत झाला. सोव्हिएत संघराज्य १९९१ मध्ये कोसळल्यावर युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून युक्रेन सतत पाश्चात्त्य देशांच्या निकट जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तीच रशियाची पोटदुखी आहे. युक्रेन `नाटो’चा सदस्य बनल्यास `नाटो’च्या फौजा थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचतील, जे रशियाला नको आहे.
रशिया युक्रेनवर आक्रमण करणार नाही; पण युक्रेनला `नाटो’ आणि `युरोपियन युनियन’मध्ये सहभागी न करण्याची, तसेच `नाटो’चा पूर्वेकडे आणखी विस्तार न करण्याची हमी पाश्चात्त्य देशांनी द्यावी, अशी मागणी रशियाने केली आहे. खरे तर रशियाला संपूर्ण पूर्व युरोपातच `नाटो’चे अस्तित्व नको आहे. कधीकाळी सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालील `वार्सा करार’ संघटनेचे सदस्य असलेले पूर्व युरोपातील अनेक देश आता `नाटो’चे सदस्य आहेत. त्यामध्ये युक्रेनचीही भर पडल्यास `नाटो’ थेट आपल्या दरवाज्यापर्यंत पोहोचेल, ही रशियाची भीती आहे. दुसरीकडे रशियाला युक्रेनच्या भूभागाचा घास घेऊ दिल्यास रशियाची भूक वाढतच जाईल आणि एक दिवस रशिया थेट पश्चिम युरोपच्या सीमेला भिडेल, अशी भीती `नाटो’ देशांना वाटत आहे. थोडक्यात रशिया व `नाटो’च्या परस्परविरोधी भयगंडातून सध्याचा संघर्ष उभा ठाकला आहे.
भयगंडाशिवाय रशिया व जर्मनीदरम्यान बाल्टिक समुद्रतळातून निर्माण करण्यात येत असलेल्या `नॉर्ड स्ट्रीम-२’ या वायूवाहिनीचा पैलूदेखील सध्याच्या संघर्षाला लाभला आहे. सध्याच्या घडीला रशियातून पश्चिम युरोपला होणारी नैसर्गिक वायूची निर्यात युक्रेन भूभागातून जाणाऱ्या वायूवाहिन्यांमधून होते. `नॉर्ड स्ट्रीम-२’ पूर्ण होताच रशियाला युक्रेनमधील वायूवाहिन्यांची गरजच उरणार नाही. दुसरीकडे युरोपने रशियाऐवजी आपल्याकडून खनिज तेल व नैसर्गिक वायू विकत घ्यावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्यामुळे अमेरिकाही रशिया-युक्रेन वादात जमेल तेवढे तेल ओतण्याचे काम करीत आहे. सध्याची परिस्थिती `नाटो’ व `वार्सा’दरम्यानच्या शीतयुद्धाची आठवण करवून देत आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून सोव्हिएत रशियाच्या पतनापर्यंत चाललेल्या शीतयुद्धादरम्यान अनेकदा तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटते की काय, असे प्रसंग उभे ठाकले; परंतु प्रत्येकवेळी काही तरी तोडगा निघून अथवा दोनपैकी एका पक्षाच्या माघारीमुळे युद्ध टळले. त्यामुळे आताही अवघ्या जगाला कवेत घेणारे युद्ध पेटेलच, असे काही नाही; कारण तिसरे महायुद्ध पेटलेच, तर ते जगाला पुन्हा अश्मयुगातच नेऊन पोहोचवेल, हे उभय पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. शीतयुद्ध काळात भारत तटस्थ देश होता; पण भारताचा सोव्हिएत रशियाच्या बाजूला असलेला कल लपलेला नव्हता. बदललेल्या भूराजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी तारेवरची कसरत आणखी कठीण झाली आहे. अलीकडे भारत अमेरिकेच्या जास्त जवळ गेला आहे खरा; पण आजही रशियाच भारताचा सर्वांत मोठा आणि विश्वासार्ह शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. त्यामुळे भारत रशियाला दुखवू शकत नाही आणि चीनच्या धोक्यामुळे अमेरिकेलाही दूर सारू शकत नाही! या पार्श्वभूमीवर भारत सरकारला युक्रेन संघर्ष हाताळताना खूप काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.