व्लादिमीर पुतीन... काय म्हणावं या माणसाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:52 AM2022-02-25T08:52:47+5:302022-02-25T08:53:26+5:30
इतका हटवादी असा हा नेता आहे तरी कोण? त्याची विचार करण्याची पद्धती तरी काय आहे? त्याचं नियोजन तरी काय आहे?
निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार
damlenilkanth@gmail.com
जगभरचे नेते व्लादिमीर पुतीन यांना सांगत होते की, त्यांनी युद्ध करू नये, युक्रेनमधे सैन्य घुसवू नये, त्यातून जगाचं फार नुकसान होणार आहे.
फ्रान्सचे मॅक्रॉन, जर्मनीचे शोलाझ पुतीनना भेटले. अमेरिकेचे जो-बायडन सतत फोनवर बोलले, प्रत्यक्ष भेटायचीही तयारी दाखवली, पण पुतीननी त्यांचा हेका सोडला नाही. युक्रेन हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात जगानं पडू नये, असं ते म्हणत राहिले. रशियाच्या सभोवताली अमेरिकाधार्जिण्या देशांनी एक रिंग तयार केलीय आणि रशियाला धोका निर्माण केलाय. तेव्हा रशिया स्वतःच्या संरक्षणासाठी सीमेवरचे देश अंकित केल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं!
- इतका हटवादी असा हा नेता आहे तरी कोण? त्याची विचार करण्याची पध्दती तरी काय आहे? त्याचं नियोजन तरी काय आहे? पुतीन ही मनोविकाराचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नामी केस आहे. पुतीन अध्यक्ष झाल्या झाल्याची - २००० मधील गोष्ट.
त्यांनी समुद्रात नौदलाचा सराव करण्याचा आदेश दिला. कर्स्क नावाची अणूपाणबुडी या सरावाचा एक भाग होती. या पाणबुडीवर टॉर्पिडो होते, पाणबाॅम्ब होते. या पाणबुडीवर स्फोट झाला. भूकंपासारखे धक्के बसले. आसमंतात दूरवर असलेल्या नॉर्वेजियन बोटींना ते धक्के कळले. त्यांनी स्फोटाचा बिंदू शोधला आणि रशियन नौदलाला कळवलं की, काही गरज असल्यास सांगा, मदतीला येऊ. स्फोट घडल्यापासून काही मिनिटातच हा संदेश गेला होता.... पाणबुडीवरचे ११८ लोक तडफडत मेले.
पुतीन त्यावेळी सुटी घालवत होते, त्यांच्यासोबत त्यांचे सर्व श्रीमंत मित्र होते. पुतीननी तीन दिवस फोनही घेतला नाही. पाणबुडी जुनाट होती. पाणबुडीवरचे बाॅम्ब आणि टॉर्पिडो गंजलेले होते. पाणबुडीवरचे सैनिक इतर बोटींवरून गोळा केलेले होते. त्यांना पाणबुडीच्या कामाची माहिती आणि अनुभव नव्हता. नॉर्वेजियनांची मदत रशियन नौदल अधिकाऱ्यांनी नाकारली. कारण सांगितलं की, नॉर्वेजियन सैनिकांना तिथं प्रवेश दिला असता, तर नौदलाची गुप्त माहिती त्यांना कळली असती.
पूर्ण १० दिवस सुटी घेऊन मॉस्कोत परतल्यावर पुतीन यांनी पत्रकार परिषद घेतली. परिषदेत मृत नाविकांचे नातेवाईक हजर झाले. ते चिडलेले होते. नॉर्वेजियन बोटींची मदत का घेतली नाही, तुम्ही नाविकांना वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न केले, असे प्रश्न नातेवाईकांनी विचारले, पत्रकारांनी विचारले. पुतीन थंड होते. अपघात पूर्वीही घडले होते, पुढंही घडणारच आहेत, त्यावर एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही, असं ते म्हणाले. वरून हेही म्हणाले की, माणसं वाचविण्यापेक्षा पाणबुडी व यंत्रसामग्री वाचवणं, हा आपला अग्रक्रम आहे.
शेवटी जमलेले लोक चिडले. तुम्ही खोटारडे आहात, असं लोक म्हणाले आणि त्यांनी पुतीनना पुढं बोलू दिलं नाही. एक उपपंतप्रधान या परिषदेत होते. त्यांची कॉलर जमलेल्या लोकांनी धरली, त्यांना घालवून दिलं. पुतीननी रशियाचं गतवैभव परत मिळविण्याची धडपड सुरू केली. म्हणजे काय? - तर १९९१ मध्ये सोवियेत युनियनमधून फुटून निघालेले देश परत मिळवण्याचा खटाटोप सुरू केला. चेचेन्यावर हल्ले केले. चेचेन लोकांनी रशियात घुसून दहशतवादी हल्ले करायला सुरुवात केली. पैकी एक घटना २००२ मधील.
मॉस्कोतल्या एका थेटरात चेचेन घुसले. पुतीननी त्या थेटरात विषारी वायू सोडण्याचे आदेश दिले. त्यात गुदमरून थेटरातली १७० माणसं मेली. ४० ते ५० दहशतवाद्यांना मारण्याच्या नादात १७० माणसं मेली. २००४ मध्ये बेसलान या गावातल्या एका शाळेचा ताबा ३१ दहशतवाद्यांनी घेतला. पुतीननी सैनिक पाठवले. शाळेला वेढा घातला. सैनिक शाळेत घुसले. तीन दिवस वेढा चालला. दहशतवाद्यांना मारण्यासाठी सैनिकांनी एक श्मेल नावाचं शस्त्र वापरलं. या शस्त्रामुळं वातावरणाला आग लागते, हवेतला प्राणवायू शोषून घेतला जातो आणि वातावरणात एक विलक्षण दाब तयार केला जातो. तिन्हीचा परिणाम म्हणून ज्या बंद जागेत हे शस्त्रं वापरतात तिथली सगळी माणसं भाजून, घुसमटून मरतात. बेसलानमध्ये ३३३ माणसं मेली, त्यात १५० शाळकरी मुलं होती. पुतीन यांचं म्हणणं होतं की, दहशतवाद्यांवर कारवाई करायची तर असं होणारच. सुक्याबरोबर ओलं जळणारच.
- म्हणजे सुमारे ५० दहशतवादी मारण्यासाठी ५२० निष्पाप माणसं मेली. अशा कित्येक कहाण्या! देशातून गायब केल्या गेलेल्या, तुरुंगात कोंडलेल्या माणसांची तर गणतीच नाही आणि आता हे युध्द! - काय म्हणावं या माणसाला?