झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा पुन्हा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 07:42 AM2024-05-17T07:42:10+5:302024-05-17T07:44:17+5:30

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून अनेक गोष्टी घडल्या आहेत.

russia ukraine war another attempt to kill volodymyr zelenskyy | झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा पुन्हा प्रयत्न!

झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा पुन्हा प्रयत्न!

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यातल्या फारच थोड्या जगासमोर आल्या आहेत, तर अनेक गोष्टी आजही गुलदस्त्यातच आहेत. तेथील नागरिकांना कोणत्या अवस्थेत आणि किती हालअपेष्टांमध्ये एक एक दिवस पुढे ढकलावा लागतो आहे, याच्याही फारच थोड्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. या भागातील जवळपास प्रत्येक नागरिक अतीव यातनांनी पोळला गेला आहे.

प्रत्येकाच्या घरातील, कुटुंबातील, नात्यातील किमान एक तरी व्यक्ती दगावली आहे, गंभीर जखमी झाली आहे किंवा त्यांना आपले घर, प्रांत, देश सोडून पळून जावे लागले आहे. प्राणांची भीती तर इतकी की, जगण्याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. कोणत्याही क्षणी मृत्यू येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, याची जणू प्रत्येकानेच मनाची तयारी करून ठेवली आहे. ती इतकी की, या युद्धग्रस्त देशांतील राष्ट्राध्यक्षही त्याला अपवाद नाहीत. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष तर आपला डमी घेऊनच फिरतात किंवा बऱ्याचदा स्वत:ऐवजी त्यांचा डमीच विविध ठिकाणी, निरनिराळ्या कार्यक्रमांत वावरत असतो, याचे किस्सेही सांगितले जातात. कारण एकच, काही दगाफटका झाला, तर आपल्याला प्राण गमवावा लागू नये. 

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना तर ठार मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. बऱ्याचदा त्यांच्या जिवावर बेतले. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांतूनही ते अनेकदा बालंबाल बचावले. आताही नुकताच त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तर थेट त्यांच्या मुख्य बॉडीगार्डवरच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच झेलेन्स्की यांचे प्रमुख बॉडीगार्ड सेहरी रुड यांना निलंबित करण्यात आले आहे. 
 
याचप्रकरणी आणखी दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका अधिकाऱ्यावर तर दहशतवादी कृत्यात सामील असल्याचाही आरोप आहे. झेलेन्स्की यांना ठार मारण्याची सुपारी या दोन्ही अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि त्यासाठी रशियाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्यात आली होती, असे म्हटले जात आहे.
 
रशियाची गुप्तहेर संस्था ‘एफएसबी’ने त्यासाठी त्यांना दोन ड्रोन आणि बरीच आधुनिक शस्त्रास्त्रे गुप्तपणे पाठवली होती, ती त्यांच्या ताब्यातही मिळाली असल्याबद्दलचे पुरावे उपलब्ध आहेत, असे झेलेन्स्की यांच्या सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. झेलेन्स्की यांना मारण्यासाठी जी हत्यारे पाठवण्यात आली होती, ती आपल्या तिसऱ्या साथीदाराला द्यायचा त्यांचा प्रयत्न होता; पण त्याआधीच त्यांना पकडण्यात आले. युक्रेनच्या स्टेट गार्ड सर्व्हिसच्या दोन कर्नल्सनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

झेलेन्स्की यांना मारण्याचा पहिला प्रयत्न ऑगस्ट २०२३ मध्ये झाला होता. झेलेन्स्की यांना हवाई हल्ल्यात ठार करण्याचा प्रयत्न यावेळी झाला होता; पण हा प्रयत्न फसला. युक्रेनच्याच एका उच्चपदस्थ महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मागच्याच महिन्यात म्हणजे एप्रिल २०२४ मध्येही एका पोलिश व्यक्तीने झेलेन्स्की यांना ठार करण्याचा प्रयत्न केला होता; पण हा प्रयत्नदेखील फसला. पोलंड येथील एअरपोर्टच्या सुरक्षेची गुप्त माहिती, कोणत्या ठिकाणी सुरक्षेची कमतरता आहे आणि त्याचा कसा फायदा करून घेता येईल, याची माहिती या व्यक्तीने रशियाला दिली होती. 

याच एअरपोर्टवरून युक्रेनमध्ये शिरायचे आणि झेलेन्स्की यांच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन रचण्यात आला होता. जाणकारांचे म्हणणे आहे, झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या केवळ काही घटनाच उघड करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात किमान आठ ते दहा वेळेस झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. केवळ आयुष्याची दोरी बळकट असल्यानेच झेलेन्स्की प्रत्येक वेळी बचावले. झेलेन्स्की यांना ठार केले, तर अमेरिकेसह अनेकांचे ‘हिशेब’ चुकते करता येतील, असा त्यामागचा हेतू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

झेलेन्स्की यांना ‘पळवून नेण्या’चा कट

युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, केवळ झेलेन्स्कीच नव्हे, तर त्यांच्याव्यतिरिक्त आणखीही काही वरिष्ठ अधिकारी हल्लेखोरांच्या टार्गेटवर होते. युक्रेनची गुप्तहेर संस्था ‘एसबीयू’चे प्रमुख वासील मालिउक आणि आणखी एक अति वरिष्ठ अधिकारी किरिलो बुडानेव यांच्याही हत्येचा कट रचण्यात आला होता. झेलेन्स्की यांना तर आधी पळवून नेण्याचा आणि त्यानंतर त्यांचे हाल हाल करून ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: russia ukraine war another attempt to kill volodymyr zelenskyy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.