Russia Ukraine War: ही शांत बसण्याची नव्हे, सर्वांनी एकत्र येण्याची वेळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:07 AM2022-04-07T06:07:09+5:302022-04-07T06:07:58+5:30

Russia Ukraine War: हुकूमशाही व्यवस्था स्वातंत्र्याच्या मूल्यांचा ऱ्हास करू पाहतील, तर अशा अत्याचारांचा सामना करण्यासाठी अमेरिका आपल्या मित्रांच्या पाठीशी उभी असेल!

Russia Ukraine War: It's time to dump her and move on! | Russia Ukraine War: ही शांत बसण्याची नव्हे, सर्वांनी एकत्र येण्याची वेळ !

Russia Ukraine War: ही शांत बसण्याची नव्हे, सर्वांनी एकत्र येण्याची वेळ !

Next

- डेव्हीड रॅन्झ
(पश्चिम भारतातील पाच राज्यांचे अमेरिकी वकिलातीचे प्रमुख)
सध्याची परिस्थिती  जगभरातील लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. व्लादिमीर पुतीन यांनी केवळ युक्रेनमधील लोकांवर हल्ला केलेला नाही तर, हा हल्ला जागतिक शांतता आणि लोकशाही यांच्यावरील देखील आहे. या हल्ल्याचे पडसाद  मानवी हक्क, अन्नसुरक्षा, ऊर्जा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांवर  उमटणार आहेत.  अशा हुकूमशाही पद्धतीने सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मिता यांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर, आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात येईल. म्हणूनच भूमिका घेण्याची,  न्याय्य गोष्टींसाठी एकत्रितपणे उभे राहण्याची गरज आहे. 
युक्रेनवर हल्ला करण्याचे नियोजन पुतीन यांनी खूप आधीच केले होते. अत्यंत पद्धतशीरपणे लष्करी सामग्रीसह दीड लाखापेक्षा जास्त सैन्य पुढे नेले होते. याचसोबत फिल्ड हॉस्पिटलदेखील होती. अनावश्यक संघर्ष आणि मानवी यातना टाळण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना त्यांनी धुडकावून लावले.  
 रशियाच्या योजनांबद्दल अमेरिकेने आपल्याकडे असलेली सर्व माहिती /गुप्तवार्ता याचकरिता जाहीर केली की नंतर लपवाछपवी होऊ नये आणि गोंधळही !  रशियाने डॉनबस येथे छुप्या पद्धतीने बॉम्बहल्ले वाढविण्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. रशियाने युक्रेनवर सायबर हल्ले देखील केले. मॉस्कोमध्ये झालेला राजकीय फार्स आणि युक्रेनच्या विरोधात केलेले बेछूट दावे तसेच ‘नाटो’ने रशियाच्या आक्रमकतेचे केलेले समर्थन देखील अनुभवले. युक्रेनमध्ये वंशविच्छेद होत असल्याचे खोटे दावे करत रशियाने स्वतःच्या लष्करी कारवाईचे समर्थन सुरूच ठेवले आहे; मात्र वंशविच्छेद झाल्याचा कोणताही पुरावा प्राप्त झालेला नाही.
पुतीन यांनी युक्रेनवर केलेल्या चौफेर निर्दयी हल्ल्यांमध्ये अनेकांनी प्राण गमावले, मालमत्तेचा मोठा विध्वंस झाला. जाणीवपूर्वक हल्ले करून सामान्य नागरिकांना लक्ष्य करतानाच, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत असल्याची विश्वासार्ह माहिती देखील समोर येत आहे. रशियाच्या लष्कराने निवासी इमारती, शाळा, रुग्णालये, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, सामान्य नागरिकांची वाहने, शॉपिंग सेन्टर्स, रुग्णवाहिका यांना लक्ष्य केले. मारियोपॉल येथील सुतिकागृह, चित्रपटगृह तसेच सामान्य नागरिकांच्या रोजच्या वापराच्या अनेक जागांची जाणीवपूर्वक निवड करून त्यांना लक्ष्य केले गेले.  या हल्ल्यांची तीव्रता वाढत असून  निरपराध नागरिक, महिला, बालके मृत्युमुखी पडत आहेत, तसेच जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे; 
परंतु गेल्या तीस वर्षांपासून अनुभवलेल्या स्वातंत्र्याची किंमत युक्रेनचे नागरिक जाणतात त्यामुळेच त्यांची भूमी बळकविण्याचा प्रयत्न ते सहन करणार नाहीत. या सर्व घटना संपूर्ण जग अतिशय जवळून पाहत आहे.
अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी अमेरिका सर्व प्रकारच्या आयुधांचा वापर करेल. अमेरिका आपल्या सर्व सहकारी देशांसोबत सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करेल. निर्वासितांंच्या गरजांची पूर्तता करतानाच, युक्रेनमध्ये देखील जे बेघर झाले आहेत त्यांना सर्वतोपरी जीवनावश्यक सहाय्य केले जाईल. 
आपल्या शेजारच्या हुकूमशाही देशाकडून अशा प्रकारच्या लष्करी आक्रमकतेचा सामना करणारा केवळ युक्रेन हा एकच देश नाही,  भारतीय जवानदेखील असा सामना करत आहेत. रशियाच्या हल्ल्यातून आपल्या देशाचा बचाव करताना युक्रेनचे अनेक सैनिक धारातीर्थी पडले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये अमेरिका आपल्या मित्रांसोबत कायमच उभी राहिलेली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यावेळी अमेरिकेने भारताला अभूतपूर्व पाठिंबा देत चीनी घुसखोरीच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली होती. गलवान घटनेवेळी अमेरिकेने जेवढी स्पष्ट भूमिका घेतली होती तितकीच स्पष्ट भूमिका आता अमेरिकेने युक्रेनमधील घुसखोरीबाबत घेतली आहे. 
हुकूमशाही व्यवस्था निर्दयी अत्याचारांद्वारे स्वातंत्र्याच्या मूल्यांचा ऱ्हास करू पाहत आहेत. अशावेळी स्वातंत्र्याचे शाश्वत मूल्य जपण्यासाठी अमेरिका, भारत आणि अन्य लोकशाही देशांनी एकत्रितपणे ठामपणे उभे राहणे नितांत गरजेचे आहे. प्रत्येक देशाला त्याचे सार्वभौमत्व जपतानाच लष्करी कारवायांपासून मुक्त राहण्याचा, आर्थिक उन्नती साधण्याचा अधिकार आहे. या मूलभूत मूल्यालाच पुतीन यांनी सुरूंग लावला आहे. केवळ युरोपातच नव्हे तर इंडो-पॅसिफीक अथवा जगात अन्यत्र कुठेही जर आमच्या सहकारी, मित्रांचा हा हक्क  कुणी हिरावू पाहत असेल तर त्याविरोधात अमेरिका सहकार्य करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी उभी राहील, डगमगणार नाही.  आजच्या वर्तमानाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतीन यांनी अयोग्यपणे युक्रेनवर केलेल्या अन्याय्य हल्ल्यामुळे, जगात लोकशाही मूल्यांवर श्रद्धा असलेले देश कसे आणखी जवळ आले, हेच जगाला समजेल.

Web Title: Russia Ukraine War: It's time to dump her and move on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.