राजू नायक
बातमी आहे की रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांच्या संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. वास्तविक या वार्तेने गोव्यात आनंद व्हायला हवा होता; परंतु लोकांनी, विशेषत: पर्यटन व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
गोव्याला रशियन पर्यटकांची आवश्यकता नसल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. या लोकांना भाषेची अडचण असते. त्यावर मात करीत या रशियन पर्यटन व्यावसायिकांनी येथील पर्यटन केंद्रेच ताब्यात घेतली. हॉटेले त्यांची, टॅक्सी त्यांच्या, मार्गदर्शक त्यांचे आणि रशियन भाषेतील फलक! त्यांनी रशियन पर्यटकांसाठी मनोरंजनाची केंद्रेही सुरू केली. त्यामुळे या पर्यटकांचा गोव्याला लाभ काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. दुसरे, रशियन पर्यटक जादा खर्चही करीत नाहीत, त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला त्यांचा हातभार लागत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे, रशियातील पर्यटकांमुळे अमली पदार्थाचा व्यवहार वाढतो. तेथील गुन्हेगारही येथे येऊ लागल्याची एक भीती व्यक्त झाली होती.
परंतु आता, प्रत्यक्षात चार्टर विमाने ५० टक्क्यांनी घटली म्हटल्यावर आधीच रोडावलेल्या पर्यटनामुळे चिंता लागलेल्या स्थानिक व्यावसायिकांना नव्या काळजीने घेरले आहे. ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी या काळात १६९ चार्टर विमाने रशियातून गोव्यात आली असून त्यांनी ५४ हजार ९३४ पर्यटक आणले. २०१७-१८ या वर्षी एक लाख १६ हजार पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. रशियन चार्टर विमाने गोव्यात सर्वात मोठ्या संख्येने येतात; परंतु यंदाची घट ही खूपच गंभीर मानली जाते.
गोव्यातील पर्यटन संस्थेचे प्रमुख सावियो मेसियस यांच्या मते, गोवा पर्यटन केंद्र म्हणून महाग बनले आहे. वाढलेले विमानतळ दर व जीएसटी यामुळे ही चार्टर विमाने अन्य स्वस्त पर्यटनस्थळे पसंत करू लागली आहेत.
रशियन चार्टर विमाने हाताळणाऱ्या व्यावसायिकाने मान्य केले की आता गोव्याला श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, तुर्कस्तान, इजिप्त यांच्याकडून स्पर्धा सहन करावी लागते. परंतु पर्यटक अजूनही गोवा पसंत करतात; कारण येथील उबदार हवामान त्यांना आवडते. विशेषत: तेथील कडक थंडीमध्ये ते गोव्यात येऊ पाहातात.
परंतु, खर्च वाढल्यामुळे पर्यटन कंपन्या आता रशियन पर्यटकांच्या सोयी कमी करू लागल्या आहेत. पंचतारांकित हॉटेलांपेक्षा ते स्वस्तातील हॉटेले देतात व कर्मचारीवर्गही खूपच कमी केला आहे.
गोव्यात आता पर्यटन क्षेत्रात देशी पर्यटकांचा अक्षरश: धुमाकूळ चालू असतो. राज्य सरकारने जरी अनेक निर्बंध लागू केलेले असले तरी किनाऱ्यांवर मद्यसेवन, अन्न शिजविणे आणि विदेशी पर्यटकांची सतावणूक करणे असे प्रकार चालतात. रशियन पर्यटकांची सतावणूक होत नसली तरी पर्यटन क्षेत्राचे नाव काळवंडू लागले आहे, यात तथ्य आहे. गोव्यात येणारे बरेच रशियन पर्यटक, विशेष करून महिला येथे काही काळ रोजगार मिळविण्याच्याही अपेक्षेने येतात. पर्यटन व्यवसायात काम करायला त्या उत्सुक असतात. बॅले डान्सर, वेट्रेस, कसरतीचे खेळ आदी कामे त्या करतात. गोव्यात काहींनी लग्न हंगामात असे नृत्याचे कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)