शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ही पृथ्वी तुमच्या बापाची आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 7:48 AM

माणसांचा उर्मटपणा, दहशतीच्या पद्धती वाढताहेत. ‘तुम्ही कोण माणसांना मारून टाकणारे,’ हा प्रश्न विचारणारी एलेना म्हणूनच महत्त्वाची आहे!

- अतुल पेठे

एलेना कोवल्स्काया ही एक समीक्षक आहे, दिग्दर्शक आहे. मी तिची नाटकं पाहिलेली, वाचलेली नाहीत. मात्र विकिपिडियावर तिची माहिती मिळते. तिच्या देशाने, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून तिनं ‘मेअरहोल्ड थिएटर अँड कल्चरल सेंटर’च्या कलादिग्दर्शक पदाचा राजीनामा दिला.  

मेअरहोल्ड हा अतिशय महत्त्वाचा लेखक, दिग्दर्शक रशियामध्ये होऊन गेला.  त्याच्या बंडखोरीबद्दल शेवटी त्याला फासावर चढविलं गेलं. जशी जुलमाची परंपरा असते तशी  बंडखोरीची, सत्त्वाचीही एक परंपरा असतेच. रशियामध्येही ती आहे. रशियाने युक्रेनवर लादलेल्या अमानुष युद्धाचा निषेध म्हणून सरकारचा पगार नाकारून एलेनाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेचे बाकी तपशील माहिती नाहीत, त्यांची मला गरजही वाटत नाही. जगामध्ये एखादा माणूस जेव्हा युद्धाच्या विरोधात उभा राहून विरोधातलं निशाण फडकवतो तेव्हा त्या माणसाच्या बाजूने असणं मला महत्त्वाचं वाटतं!  

रमेश शिपूरकरांविषयीच्या ‘बहुआयामी शिपूरकर’ नावाच्या पुस्तकात मी हृद्य नावाची एक गोष्ट वाचली. कृष्णा कंपाउंडर नावाची एक व्यक्ती निपाणी या गावात होती. लक्ष्मीच्या यात्रेला बोकडबळी देण्याची पद्धत त्यांना मान्य नव्हती.  एकटी व्यक्ती काय करणार? ते मिरवणुकीच्या रस्त्यावर जाऊन बसले. ‘बळी देणं, हिंसा करणं वाईट आहे, अशा प्रथा बंद कराव्यात, ही अंधश्रद्धा आहे’ अशा आशयाचं बोलत राहिले. त्यांच्याकडे कदाचित कोणीही लक्ष दिलं नाही, मिरवणुका त्यांच्या अंगावरून गेल्या; परंतु  त्यांच्या या कृतीचं महत्त्व त्याने कमी होत नाही. ज्याला आपण ‘व्हिस्पर ऑफ डिसेंट’ म्हणतो, ती निदान नकाराची कुजबुज तरी आपण करू शकतो की नाही हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे.

एक छायाचित्र आठवतं. हिटलरसमोर नाझी फौज उभी आहे. प्रत्येकानं उजवा हात ‘हेल हिटलर’ म्हणत पुढे केला आहे; परंतु एक सैनिक हात न उंचावता उभा आहे. त्या छायाचित्रातला हा हात न उंचावणारा माणूस मला ‘व्हिस्पर ऑफ डिसेंट’चा प्रतिनिधी वाटतो. ‘नाही मानियले, बहुमता’ असे म्हणणारा एक तरी मनुष्य तिथं उपस्थित, जिवंत आहे ही  महत्त्वाची गोष्ट असते, हजारोंनी हात उंचावण्याइतकीच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मोलाची. ही कृतीच फार धैर्यवान आहे. चुकीच्या गोष्टींविरोधात आपला आवाज जिवंत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

नाटक, कला या क्षेत्रांमधल्या लोकांना वरवर वाटतं की आपल्या पाठीमागे कुठली संघटनात्मक, पक्षीय, संस्थात्मक ताकद? मात्र एक चांगली कविता व्यवस्थेला किती त्रास देऊ शकते हे मध्यंतरी आपण पाहिलं. ‘शववाहिनी गंगा’वरून भारतभर राडा झाला. नेहा सिंग राठोडच्या ‘यूपी में का बा’ या गाण्यावरून उत्तर प्रदेशातली निवडणुक हादरली. सफदर हाश्मींच्या ‘हल्ला बोल’सारख्या नाटकानं त्यावेळचा समाज हलवून टाकला. एक कविता, एक गाणं, एक नाटक एका गोळीपेक्षा, एका विटेपेक्षा मजबूत आणि खूप काळ टिकणारं ठरतं. याबद्दल आपली परंपरा शोधायची झाली तर तुकारामापासून शोधता येते. निषेधाचा किंवा नकाराचा स्वर सततच महत्त्वाचाच ठरत आलाय. सॉक्रेटिसने विषाचा प्याला प्याला, पण तो माणूस, त्याचं मूल्य वर्षानुवर्षे टिकलं. किंबहुना अधिक तेजाळून गेलं, युद्धापेक्षाही, युद्धावर कडी केली! आज जशा प्रकारच्या हिंसेची भाषा भारतभर बोलली जाते, जातपात, धर्म, पेहराव, खाण्या-पिण्यातली विविधता यावरून आपल्या अस्मिता भडकलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये तलवारी, तोंडामध्ये अत्यंत जहाल भाषा अवतरली आहे! वेगवेगळ्या अर्थाने हे युद्धखोरीच्याच दिशेने जाणंच तर आहे! 

दुसऱ्याला नामशेष करणं, मारून टाकणं, बेचिराख करणं,  या सगळ्याच गोष्टी जर आपण माणूस असू व विकासाच्या दिशेनं जात असू, तर चांगल्या नाहीत. इमारती जशा गगनचुंबी होतात तशी मनं गगनचुंबी होताना दिसत नाही. दुसऱ्याला मारून टाकण्याची ज्याची शस्त्रांची क्षमता चांगली ते राष्ट्र शूर असं मानलं जातं. शूरवीर या शब्दाची संकल्पना माणसाला मारून टाकण्याची नाही. अगदी युद्धसराव म्हणून जरी कुठं बॉम्ब पडत असतील आणि माणसं मरत नसतील तरी कित्येक कीटक, फुलपाखरं, झाडं, वनस्पती, शेवाळं, प्रवाळं, नष्ट होत असतातच. इथले मासे, हत्ती, उंट, जिराफ, पक्षी यांनाही ते विचारण्याचा हक्क आहे. तुम्ही कोण मारून टाकणारे? माणसांच्या उर्मटपणातून एकमेकांना, एकमेकांच्या राष्ट्रांना घाबरवण्याच्या पद्धती वाढताहेत. ही पृथ्वी तुमच्या बापाची आहे का, असा प्रश्न माणसांनी माणसाला कधी विचारायचा? माणूस म्हणून मला या सगळ्यानं व्याकूळ व्हायला होतं. जी हिंसा आपण प्रत्यक्ष स्वरूपात करतो ती खरं तर बोलण्याच्या, दिसण्याच्या, असण्याच्या पातळ्यांवरही प्रकट करू नये असं मला वाटतं.  

सिरियन विस्थापित कुटुंबातल्या तीन वर्षांच्या लहानग्या मुलाचं शव समुद्रातून वाहत माझ्या किनाऱ्याशी येऊन पडतं तेव्हा तो, त्याचे आई-बाप प्रत्यक्ष माझ्या ओळखीचे असणं जरूरी नाही. झाड कुठल्याही देशाचं असो, ते कापताना तुटून पडत असताना त्रास होतो. माणसं कुठल्याही देशात असोत, रक्त लालच असतं. दु:खं तशीच असतात. हे सार्वकालिक असतं. ओळखीतला माणूस गेला की दु:ख होणं नैसर्गिक आहे, पण अनोळखी गेल्यावर मला त्रास होतो तेव्हा नैसर्गिकतेलाच मी अधिक व्यापक केलेलं असतं. त्याला विश्वाचं आर्त म्हणतात. ‘माझे आर्त माझ्या मनी प्रकटले नाही’ असं नव्हे तर ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले’ असं ज्ञानेश्वर म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ ‘हा’ असतो. त्यामुळेच एलेनाची माझी ओळख असण्याची गरज नाही. तिनं दर्शवलेलं, राखलेलं मूल्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याला माझा पाठिंबा असणार! 

शब्दांकन : सोनाली नवांगुळ 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया