राज्यातील गुन्ह्यांच्या तपासाचे काम समाधानकारक आहे, पण शिक्षांचे काम मात्र निराशाजनक असल्याने यात सुधारणा करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटले असले तरी असा संकल्प सोडणारे ते पहिलेच पोलीस अधिकारी नव्हेत. मुळात त्यांच्या या विधानातील गृहीतक किती लोकाना मान्य होईल याचीच शंका आहे. तपास आणि त्यानंतरची शिक्षा या भानगडीतच पडायचे नाही आणि म्हणून गुन्हे नोंदवूनच घ्यायचे नाहीत, असा नवाच पायंडा पोलीस खात्यात अलीकडच्या काळात रुजू झाला आहे. अगदी अंगाशी येऊ शकेल असेच गुन्हे नोंदविले जातात. ते नोंदविताना भक्कम पंच आणि फुटू न शकणारे साक्षीदार गोळा करण्याचे कष्ट घेतले जात नाहीत. परिणामी अलीकडच्या काळात खुनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांंमध्येही खून तर झाला, पण तो कोणीच केला नाही, कारण सारेच दोषमुक्त, अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे आढळून येते. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईमुळेही अनेकदा गुन्हेगार मोकळे सुटण्याचे आढळून येते. कारण साक्षीदार कितीही पक्का असला तरी संबंधित घटना घडून गेल्यानंतर दीर्घ काळाने सारा तपशील त्याच्या स्मरणात राहतोच असे नसल्याने गुन्हेगाराचा वकील त्याचाच लाभ घेत असतो. पोलीस महासांचालक याबाबत फारसे काही करु शकतील अशी स्थिती नाही. सरकारच्या कायदा खात्याशी चर्चा करुनही याबाबत फारसे काही हाती लागू शकेल अशी स्थिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने वा मुंबई उच्च न्यायालयाने काही मनावर घेतले तरच महाराष्ट्रातील गुन्हे सिद्ध होणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे, याबाबत काही होऊ शकेल. दीक्षित यांचा दुसरा संकल्प आहे पोलीस जनतेला आपला मित्र वाटेल अशी स्थिती निर्माण करण्याचा. राज्याचे एक माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी याबाबत त्यांचे स्पष्ट मत व्यक्त करताना असे म्हटले होते की, जनतेला पोलिसांचा धाकच वाटला पाहिजे. मित्र वाटण्याचे काही कारण नाही. कालांतराने पोलीस दलाने शंकररावांचे हे विधान मनावर घेऊन तशी स्थिती निर्माण करुन ठेवली. त्यामुळे पापभीरु जनसामान्यांना खरोखरी पोलिसांचा धाक वाटू लागला! पोलीस आणि जनता यांच्यात जवळीकीचे नाते निर्माण व्हावे आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी दीक्षित यांच्या पूर्वसुरींनी ‘आपला शेजारी, खरा पाहरेकरी’ किंवा मोहल्ला कमिटी आदिसारख्या योजना अस्तित्वात आणून पाहिल्या. त्यांचा परिणाम तेवढ्यापुरता जाणवलाही असेल पण पुढे पहिले पाढे पंचावन्न. याचा अर्थ नव्याने याबाबत कोणी प्रयत्म करुच नयेत असे मात्र नाही.