सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या संघर्षात शेतकºयांचेच नुकसान होणार आहे.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ‘गिधाडे राजहंस कधी झाली’ असा सवाल करत ‘स्वाभिमान’ सिद्ध करण्याची शपथ राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या तरुण कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती की, ‘सर्व राजकीय पक्षांचे नेते शेतकरीविरोधी आहेत आणि भाजप-शिवसेनेचे नेते जातीयवादाचा आधार घेणारी गिधाडे आहेत,’ अशी जहरी टीका त्यांनी केली होती. राजकारण्यांमुळे शेतकरी चळवळीचे अतोनात नुकसान होते, यावर त्यांची ठाम मते होती. याच संघर्षातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहाटे झाली.सुमारे वीस वर्षे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी खांद्याला खांदा लावून शेतकºयांच्या हितासाठी म्हणून चळवळ केली. भाजपसारख्या राजकीय पक्षाशी आघाडी करायलाही त्यांचा ठाम विरोध होता. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर वारेमाप आरोप करण्यात येत होते. दरवर्षी गळीत हंगामाच्या प्रारंभी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे होणाºया ऊस परिषदेत ‘मुलुखमैदान तोफ’ म्हणून सदाभाऊ खोत मिरवत होते. या विशेषणाने त्यांना भरते यायचे आणि शरद पवार, आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख आदींच्यावर ते जोरदार टीका करायचे.उसाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून झालेल्या अनेक आंदोलनांत दगडांचा वापर झालाच नाही, असे छातीवर हात ठेवून सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना सांगून टाकावे, म्हणजे एकदा लोकांना ‘कालचे राजहंस आज गिधाडा’सारखे एकमेकांचे लचके कसे तोडत आहेत, हे तरी समजेल. राजू शेट्टी म्हणतात, हा शेतकºयांचा संताप आहे. सदाभाऊ त्यांच्या गाडीत असते तर त्यांच्या पुढची भाषा बोलून मोकळे झाले असते. आपण ‘मुलखावेगळे तोफखाने’ आहोत, हे सिद्ध केले असते.राजू शेट्टी यांना लवकर समजले की, भाजपची धोरणे काही शेतकºयांच्या हिताची नाहीत. सदाभाऊ खोतांना मंत्रिपदावर असेपर्यंत असे वाटणे शक्य नाही; पूर्वी दगडफेक करणारी शेतकरी चळवळ होती आणि आता दगडफेक झाल्यावर अंगाला मार लागतो का? चार क्रांतिकारी निर्णय सदाभाऊ खोत यांनी राज्याचे कृषिमंत्री म्हणून घेतल्याचे सांगावे. मंत्री होताच दररोज आठवडी बाजारपेठांचे उद्घाटन करत होता, त्यापैकी एकतरी सुरू असल्याचे दाखवावे. कोल्हापूर बाजारसमितीलाच गूळ खरेदी करण्याचा प्रस्ताव आपण दिला होता. किती रवे खरेदी झाले ते जाहीर करावे? चाळीस हजार एकराला पाणी देणारी तुमच्या जिल्ह्यातील (सांगली) म्हैशाळ पाणी उपसा योजना या वर्षी सुरू करता आली नाही, हे अपयश कुणाचे आहे?काही तरी कामे करा, शेतकरी चळवळ करण्यासाठी आंदोलने करताना दगड उचलू नये; असे धोरण आधीपासून (तीस वर्षे शेतकरी चळवळीत आपण घालविली) स्वीकारले असते, तर त्याचा मार आता लागला नसता. तुरीविषयी सरकारचे काही चुकलेच नाही, तरीसुद्धा लातूर बाजारसमितीत तूर टाकून शेतकरी रडत- रडत घरी परतला, हे आपण सत्तेवर आल्यानंतर घडलेच नाही, असे कुणी मानावे; तो मान्य करा असा तुमचा हट्ट असेल तर तो कोण पुरा करणार? हट्ट पुरविण्यास आता तुम्ही दोघे (सदाभाऊ व राजू शेट्टी) लहान राहिला नाहीत. तुमच्या भांडणातून महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे कसे भले होणार, हे तरी एकदा सांगून टाका, म्हणजे शेतकरी चाबकाचा नाद सोडतील.- वसंत भोसले ( bhosale.vasant@lokmat.com)
सदाभाऊ, दगडांचा मार आता लागला का ?
By वसंत भोसले | Published: February 27, 2018 12:29 AM