एकाच आठवड्यात आपल्या संरक्षक यंत्रणेने तीन डझनांहून अधिक नक्षल्यांचा बळी घेतला आहे. त्यांच्यापैकी अनेकांवर काही लाखांची बक्षिसे होती आणि त्यांची एटापल्लीपासून भामरागड व पुढे सिरोंचापर्यंत मोठी दहशतही होती. त्यांच्या मारल्या जाण्यामुळे तेथील भयग्रस्त आदिवासी काही काळपर्यंत मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. तशीही नक्षल्यांची संख्या त्या परिसरात रोडावली आहे. तेलंगण व आंध्र या दोन राज्यांनी त्यांचा अतिशय कडक बंदोबस्त केल्यामुळे व गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ झाली असल्यामुळे हे घडू शकले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील यंत्रणाही यासाठी कमालीच्या योजनाबद्ध रीतीने व जिद्दीने कामाला लागल्याचा हा पुरावा आहे आणि त्यासाठी साऱ्यांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदनच केले पाहिजे. गेली ५० वर्षे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाला नक्षल्यांनी ग्रासले आहे. या काळात त्यांनी ७५० हून अधिक आदिवासींचा व १५३ पोलिसांचा बळी घेतला आहे. त्यांना मदत करणाºयांत त्या परिसरातील राजकारणी व व्यापारीही पुढे राहिले आहेत. जंगलातून येणारा कच्चा माल आपल्या उद्योगापर्यंत सुखरूप यावा म्हणून नक्षल्यांना वार्षिक खंडणी देणाºया अशा उद्योगपतींचा व व्यापाºयांचा ठावठिकाणा पोलिसांनाही ठाऊक आहे. मात्र हीच माणसे राजकारणात वजनदार असल्याने त्यांना पोलिसांनी क्वचितच हात लावला आहे. आताची कारवाई पाहता सरकार व पोलीस या दोहोंनीही एका दृढनिश्चयाने हा हिंसाचार नाहिसा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसणारे आहे. नक्षलवाद ही हिंसाचारावर आधारलेली माओवादी विचारसरणी आहे. तिचा स्वीकार केलेली माणसे आदिवासींना आपल्या जरबेत ठेवून त्यांच्या जिवावर आपला हिंसक खेळ खेळत असतात. त्यांचे पुढारी पंचतारांकित जीवन जगत शहरात राहतात. मरणारे मरतात आणि हे मात्र मजेत असतात. आपली न्यायालयेही याच गफलतीमुळे या पुढाºयांना कधी मुक्त करतात तर कधी जमानतीवर सोडतात. जंगलात पाय रोवल्यानंतर या हिंसाचाºयांनी त्यांची दृष्टी आता शहरांकडे वळविली आहे. मोठ्या शहरातील बेरोजगार व असंतुष्ट तरुणांना हाताशी धरून आपल्या संघटनेचे जाळे पुणे-मुंबई-नागपूर असे सर्वत्र विणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अनेक ‘ज्ञानी’ म्हणविणाºया प्राध्यापक व तथाकथित विद्वानांचीही साथ आहे. परिणामी ही शस्त्रधारी माणसे प्रतिष्ठेने समाजात वावरताना आढळली आहेत. जन्मठेपेची शिक्षा झालेला त्यांच्यातला एक विद्वान पुढारी देशाच्या नियोजन मंडळावर नेमला गेल्याची सुरस व हास्यास्पद गोष्ट यातलीच एक आहे. ३० नोव्हेंबर या दिवशी डेक्कन क्विन ही प्रतिष्ठित गाडी तिच्यातील सर्व प्रवाशांना उतरवून पेटविली गेली. तेव्हाच आर.आर. पाटील यांनी नक्षल्यांच्या शहरातील या वावराचा उल्लेख प्रथम केला. तो वावर अजूनही चालू आहे. तरीही गडचिरोलीतील पोलिसांनी ३९ नक्षल्यांना कंठस्रान घातले असेल तर ती त्यांनी केलेली फार मोठी कामगिरी व पत्करलेली मोठी जोखीम मानली पाहिजे. या घटनेने नक्षल्यांचे कंबरडेच मोडले आहे. तसाही हा वाद आता दुबळा झाल्याची कबुली त्यांच्या नेत्याने त्यांच्या अधिवेशनात बोलताना याआधी दिली आहे. दरम्यान अनेक नक्षलवादी पोलिसांना शरण आले तर अनेकजण पकडले गेले. काहींनी तो मार्ग सोडल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. एकेकाळी आदिवासींचा वर्ग भिऊन त्यांना साथ व आश्रय द्यायचा. पण अलीकडे तोच गावोगावी त्यांच्याविरुद्ध उठाव करताना व त्यांना गावबंदी करताना दिसत आहे. या साºयाहून महत्त्वाची बाब आदिवासींमध्ये होत असलेल्या शिक्षणाच्या प्रसाराची आहे. आदिवासींची मुलेच आता डॉक्टर, वकील, अधिकारी व लोकप्रतिनिधी बनली आहेत आणि त्यातले आपले खरे कोण व संरक्षक कोण हे आदिवासींनाही कळू लागले आहे. मात्र ३७ नक्षलवादी मारल्यानंतर सरकारनेही शांत होऊन चालणार नाही. आदिवासी क्षेत्राच्या विकासाची, तेथील सडकांची, शाळांची व उद्योगांची कामे हाती घेणे त्यासाठी गरजेचे आहे. संरक्षण व विकास या बाबी एकत्र चालतील तरच त्या परिणामकारक ठरणार आहेत.
सुरक्षेला विकासाची जोड हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:03 AM