काँग्रेस बंडखोरांच्या डोईवर भगव्या पगड्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:39 AM2021-03-04T05:39:30+5:302021-03-04T05:41:38+5:30
काँग्रेस पक्षातल्या बंडखोरांनी जम्मूत केलेल्या शक्तिप्रदर्शनात भगवा रंग कशासाठी? - तर म्हणे हा संघर्षाचा रंग आहे!
काँग्रेस पक्षातल्या बंडखोरांनी जम्मूत प्रथमच शक्तिप्रदर्शन केले. त्यात बऱ्याच पहिल्यावहिल्या गोष्टी समोर आल्या. आधी लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या पगडीच्या रंगाने. गुलाम नबी आझाद असोत वा भूपिंदरसिंग हुडा, कपिल सिब्बल किंवा आनंद शर्मा; सर्वांच्या डोक्यावरच्या पगड्या चक्क भगव्या रंगाच्या होत्या. आझाद यांनी गांधी घराण्याची चार दशकांहून अधिक काळ सेवा केली. पक्षाबाहेर असे ते प्रथमच काही करत होते. पण, भगवा रंग कशासाठी?- तर त्याचे उत्तर असे दिले गेले की, हा संघर्षाचा रंग आहे! गंमत म्हणजे हे बंडखोर भाजप किंवा राहुल गांधी अशा कोणाहीविरुद्ध लढा पुकारत नाहीत.
काँग्रेस पक्षातील डावे - उजवे आणि मधल्यांविरुद्ध त्यांचे बंड आहे. याआधी हे २३ बंडखोर “काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, राहुल गांधीही चालतील,” अशी मागणी करीत होते.
गेल्या महिन्यात त्यांचे १० जनपथवर सोनिया गांधी यांच्याशी बोलणे झाले त्या वेळी ते पाच राज्यांतील निवडणुका होईपर्यंत थांबायला तयार होते. पण, कुठेतरी त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी पहिल्यांदा जम्मूत मेळावा घेऊन तोफ डागली. आता देशाच्या विविध भागात असे मेळावे करण्याचा त्यांचा इरादा आहे, असे समजते. आझाद यांनी आपल्या भाषणात मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांची बरसात केलेली पाहून सारेच राजकीय निरीक्षक एकदम चक्रावले.
इतर वक्त्यांनी चुकूनही भाजपवर टीका केली नाही. पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षश्रेष्ठींनी आपली हकालपट्टी करावी, अशी या बंडोबांची अपेक्षा दिसते. शरद पवार यांनी १९९९ साली असे बंड केले तेंव्हा त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. पण, मोदी यांची स्तुती करून या मंडळींना सहानुभूती मिळविता येणार नाही. पवारांना अशी सहानुभूती मिळाली होती. त्यामुळे हा सगळा गोंधळ असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
मोदी स्टेडियममुळे संघात अस्वस्थता
कारणे भिन्न असतील; पण संघ परिवारातही सध्या अस्वस्थता दिसते आहे. विविध प्रकारच्या कामगिरीमुळे परिवार मोदी सरकारवर अत्यंत खूश आहे. कलम ३७० रद्द करणे, राममंदिराची उभारणी, तिहेरी तलाक, संघाच्या स्वयंसेवकांना महत्त्वाची पदे देणे अशी अनेक कामे मोदी सरकारने केली. मात्र सरदार पटेल स्टेडियमला मोदी यांचे नाव देण्याने परिवार नाराज आहे. रा. स्व. संघ व्यक्तिपूजेला कायम विरोध करीत आलेला आहे. संघातील कोणी थेट बोलायला तयार नाही; पण खाजगीत मात्र कुजबुज चालू आहे. नरेंद्र मोदी स्वत: संघाचे तत्त्वज्ञान, संस्कृतीचे पाईक असलेले खरे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे त्यांचे नाव दिले गेल्याने संदेश चुकीचा जातो, अशी अनेकांची तक्रार आहे. मोदी यांनी अशी अनेक कामे केली ज्यामुळे त्यांची प्रतिमा अटल - अडवानी युगापेक्षाही उंचावली. पण, त्या दोघांच्या नावे कोणतेही स्मारक उभे राहिले नाही अथवा एखादी संस्था, संकुलाला त्यांचे नाव दिले गेले नाही. राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी संघाच्या जवळचे आहेत. स्टेडियमला मोदी यांचे नाव दिले गेल्यावर पहिले ट्विट स्वामींनी केले. आंतरराष्ट्रीय सहभाग असलेले वेबिनार घ्यायला पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रक शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार या दोन मंत्रालयांनी मागे घेतले याबद्दल परिवाराने समाधान व्यक्त केले. “हे असे करा” असा निरोप परिवाराकडून गेला होता म्हणतात... मात्र सरकारच्या या अशा उद्योगांमुळे परिवार थोडा नाराजच आहे.
अदानी, अंबानी भिन्न रस्त्याने
राहुल गांधी यांनी अलीकडेच “हम दो - हमारे दो” असा टोला लगावला होता. तो अर्थातच अदानी आणि अंबानी यांना उद्देशून होता. दोन्ही औद्योगिक घराण्यांचा प्रवास मात्र भिन्न दिशेने चालला आहे. अदानी त्यांच्या वाटेत येईल ते म्हणजे ऊर्जा प्रकल्प, बंदरे, विमानतळ, सौर-पवन ऊर्जा प्रकल्प... असे काहीही घेत सुटले आहेत. उलट अंबानी एकाही सरकारी प्रकल्पाला हात लावत नाहीयेत. वाजपेयी यांच्या काळात त्यांनी आयपीसीएलसारख्या सार्वजनिक उद्योगातला मोठा भाग हिस्सा उचलला होता. आता मात्र अंबानी सार्वजनिक उद्योग आणि बांधकाम क्षेत्रातील प्रकल्पात स्वारस्य दाखवताना दिसत नाहीत. उलट खाजगी कंपन्या विकत घेणे आणि थेट विदेशी गुंतवणूक आणणे यात ते रुची घेत आहेत.
महत्त्वाच्या पदांबाबत चालढकल
महत्त्वाच्या चौकशी संस्थांच्या प्रमुखपदी नव्या नेमणुका न करता धकवून नेले जात आहे. ‘तात्पुरते साहेब’ कारभार पाहत आहेत. उदाहरणार्थ सीबीआयचा कारभार प्रवीण सिन्हा हे हंगामी म्हणून पाहत आहेत. खरेतर, सरकारकडे पूर्ण वेळ संचालक नेमायला पुरेसा अवधी होता. तरी काही काळासाठी गुजरातेतून आलेल्या या अधिकाऱ्याला जबाबदारी देण्यात आली. का?- त्याचे उत्तर नाही.
अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय मिश्र यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने पुढे चाल देण्यात आली. असे पूर्वी घडले नव्हते. सरकारची दुसरी महत्त्वाची तपास संस्था आयकर (तपासणी) महासंचालकपदावर पी. सी. मोदी आहेत. सीबीडीटीचे प्रमुख म्हणून त्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. तेच आयकराचा अतिरिक्त भार वाहत आहेत. अलीकडे एनसीबी चर्चेत होते. त्याचे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाचा कार्यभार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक रविवारी निवृत्त होत आहेत. तेथेही अद्याप नवा प्रमुख नेमलेला नाही.