कुणाचे नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. आता आपल्या महिला किकेट संघाचेच बघा, महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी देशात फारशी चर्चा नव्हती किंवा या स्पर्धेविषयी कुणाला फारसे औत्सुक्य नव्हते. एव्हढेच काय मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर यासारखी काही नावे सोडली तर संघातील इतर महिला खेळाडूंची नावेही कुणाला ठावूक असण्याचे कारण नव्हते. पण विश्वचषक स्पर्धा सुरु झाली आणि आपल्या महिलांनी मैदान गाजविण्यास सुरुवात केली तेव्हा कुठे आम्ही त्यांचे गुणगान सुरु केले. या महिलांनी एक एक किल्ला सर करीत जेव्हा उपांत्य फेरीत दिग्गज आॅस्ट्रेलिया संघाला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा तर समस्त भारत वर्षाने या संघाला अक्षरश: डोक्यावर घेतले. विश्वकप हातात यायच्या आधीच महिला खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला. अंतिम सामन्यात दुर्दैवाने हातातोंडाशी आलेला घास दूर गेला. पण पराभूत होऊन मायदेशी परतलेल्या या संघाचे विजयी योद्ध्याप्रमाणे स्वागत झाले. एरव्ही पराभूत झालेल्या संघाला तोंड लपवित परतावे लागते. खेळाडूंच्या घरांवर दगडफेक केली जाते. पोलीस संरक्षणात त्यांना घरी सोडावे लागते. यावेळचा नजाराच काही वेगळा होता. आजही या महिला खेळाडूंना विविध राज्य सरकारे, संघटना यांच्याकडून बक्षिसे दिली जात आहेत. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी २६ वर्षीय गोलंदाज राजेश्वरी गायकवाड हिला कर्नाटक सरकारने परवाच पाच लाखांची कार बक्षीस म्हणून जाहीर केली. पण काय आश्चर्य राजेश्वरीने अतिशय विनयाने हे गिफ्ट घेण्यास नकार दिला. का दिला तिने हा नकार? तिच्याकडे आधीच भरपूर कार आहेत म्हणून की, केवळ पाच लाखांची क्षुल्लक वस्तू आहे म्हणून. कारण वेगळेच आहे. राजेश्वरी ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. भाड्याच्या घरात राहणारी. ती म्हणते, ‘मी कार घेऊन काय करणार, मला डोक्यावर छत हवे आहे’. अटकेपार झेंडा रोवून आलेल्या या मुलीची ही हतबलता खरंच मन विदीर्ण करणारी आहे. केवळ राजेश्वरीच नव्हे तर बहुतांश महिला खेळाडूंची थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे. याउलट भारतीय पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंची स्थिती बघा! सर्वच कोट्यवधींच्या घरात खेळणारे. खेळोत बिचारे, त्यांचे नशीब. पण येथे बीसीसीआयचा रोल महत्त्वाचा आहे. आपल्या क्रिकेट नियंत्रण मंडळाने नेहमी पुरुषांनच झुकते माप दिले. त्या तुलनेत महिला संघ दुर्लक्षितच राहिला. एकाच छताखाली खेळणाºया या दोन संघांना भिन्न वागणूक देणे, ‘एकाला छप्पर फाडके तर दुसºयाला छतच नाही’ अन्यायकारक आहे. महिला संघांच्या आताच्या देदीप्यमान कामगिरीमुळे आतातरी मंडळाचे डोळे उघडतील आणि महिला संघाला अगदीच समान नसली तरी सन्मान्य वागणूक मिळेल अशी आशा करू या.