प्रिय उद्धवराव ठाकरेजी,जय महाराष्टÑ,आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय. हल्ली भाजपाचा कार्यकर्तासुध्दा आपल्या आॅफिससमोरून जाण्याची हिंमत करत नाही. भाजपाने आपल्याला गृहित धरून वागायचं म्हणजे काय गंमत आहे का साहेब? आपण खरं तर यांचे मोठे बंधू. पण ते स्वत:ला मोठा भाऊ मानायला लागले. लहान भावाने मोठ्या भावाची कापडं घातली म्हणून काय तो मोठा भाऊ होतो का साहेब? शेवटी आपणच मोठे आहोत हे खडसावून सांगायची वेळ आलीच. (खडसावून म्हणजे खडसेंचा काही संबंध नाही बरं का साहेब. उलट तुम्ही म्हणालात तर ते आपल्याकडे येतीलही...) बरं झालं तुम्ही आपल्या पक्षाच्या बैठकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर करुन टाकली ते. नाहीतर पुन्हा २०१४ सारखं व्हायचं. भाजपावाल्यांचा काही भरवसा नाही साहेब, आयत्यावेळी हे सांगतील की एवढ्याच जागा देतो, नाहीतर स्वतंत्र लढतो. त्यावेळी शोधाशोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तयारी केलेली बरी.कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही हे सांगायला तुम्ही मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटला. लगेच कुजबुजी सुरू झाल्या. आपले खा. संजय राऊत. शरद पवारांना जे हवं तेच ते बोलतात. मिलिंद नार्वेकर पूर्वी सतत मुख्यमंत्र्यांकडे जायचे. आता त्यांना पक्षाचं पद दिलं ते बरं झालं. त्यामुळे तरी ते तिकडे गेल्यास अधिकृत कामासाठी गेले असं बोलता येईल. तेवढ्याच अफवा थांबतील.पण आणखी बºयाच अफवा आहेत साहेब. परवा दादासाहेब भेटले. ते सांगत होते, की भाजपा-शिवसेनेतील भांडणं ही लुटूपुटूची आहेत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो हे तुम्ही ठरवून करत आहात असाही त्यांचा आक्षेप होता. त्यासाठी त्यांनी काही तर्कही दिले. त्यांच्या मते तुम्ही दोघं आतून एकच आहात. बाहेर मात्र तुमच्यात फार पटत नाही असं तुम्ही मुद्दाम दाखवता. याआधी तुमच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याची घोषणा केली होती. खिशात ठेवलेले राजीनामेही दाखवले होते. पुढे काय झाले त्यांचे...?नंतर कर्जमाफीवरून देखील आम्हाला या असल्या सरकारमध्ये रहायचे नाही असेही तुम्ही घोषित केले होते. मात्र त्याचेही पुढे काहीच झाले नाही. नवी मुंबई विमानतळाच्या कार्यक्रमावर तुम्ही बहिष्कार टाकणार असं तिकडे ठाण्यात आपल्या पक्षाने जाहीर केलं, मात्र ठाण्याचेच मंत्री एकनाथ शिंदे स्वत:च तिकडे हजर होते म्हणे... शिवाय आपले मंत्री सुभाष देसाई देखील बीकेसीमध्ये झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ’ कार्यक्रमात व्यस्त होते. मग आपला बहिष्कार होता की नाही...?२०१७ हे या सरकारमध्ये राहण्याचं शेवटचं वर्ष असेल असं आपले नेते आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं होतं. आता २०१८ चे दोन महिने संपत आले. काहीच झालं नाही. उलट याच वर्षात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी वर्षावर बंद दाराआड चर्चाही केलीत... त्यामुळे नेमकं काय चालू आहे ते काही केल्या कळत नाही असंही ते म्हणत होते. त्यामुळे आमचा पार केमिकल लोचा झालाय. काय करावं ते जरा सांगता का? आपण नेमकं कुठं आहोत हे जरा समजावून सांगता का साहेब...-अतुल कुलकर्णी
साहेब, आपलं नेमकं काय चाललंय?
By अतुल कुलकर्णी | Published: February 21, 2018 5:20 AM