वडीलधारी मंडळी नेहमीच एक विधान पिढी दर पिढी करीत आले आहेत आणि ते म्हणजे, पुढचा काळ घोर कलियुग येणार आहे. आमचा काळ चांगला होता, संतमहंतांचा होता आणि येणारा काळ हा भामटे, लुटारू यांचा असेल, असा एक सार्वकालिक समज आहे. वास्तव असे आहे की, संत ज्ञानेश्वर असो की संत तुकाराम किंवा संत एकनाथ साऱ्यांनाच तत्कालीन धर्ममार्तंडांच्या, स्वार्थी मंडळींच्या विरोधाचा, छळवणुकीचा सामना करावा लागला होता. सध्या संपूर्ण जग ‘कोरोना’ या जागतिक जैविक युद्धाच्या खाईत लोटले गेले आहे.
मागील शतकाने दोन महायुद्धे पाहिली. त्यानंतरच्या पिढ्यांनी दहशतवादी हल्ले, घातपाती कारवाया या माध्यमातून लढली जाणारी छुपी युद्धे वरचेवर अनुभवली. २१ व्या शतकाच्या पूर्वार्धातील हे जैविक युद्ध तितकेच भीषण आहे. अशा युद्धाच्या प्रसंगी आपल्याला दोन परस्पविरोधी मानवी चेहरे पाहायला मिळत आहेत. डॉक्टर्स, नर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित व संशयित रुग्णांवर उपचार करीत आहेत.
लोकांनी घरी राहून हे युद्ध जिंकायचे आहे, असे सर्वजण बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतानाही काही हवशेनवशे जणू युद्धाला बाहेर पडल्यासारखे तोंडाला टीचभर रुमाल बांधून रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना रोखण्याकरिता पोलिसांना रक्त आटवावे लागत आहे. शिवाय निराधारांच्या पोटात अन्नाचे दोन घास जातील व ते कोरोनाबाधित होऊन समाजात हा विषाणू पसरवणार नाहीत, याकरिता त्यांना मास्क, सॅनिटायझर यांचा पुरवठा करण्याचे काम पोलीस करीत आहेत.
अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते हेही मास्क, सॅनिटायझर, अन्न-पाणी यांचा पुरवठा करीत आहेत. आयआयटीच्या प्राध्यापकांनी क्वारंटाईन व्यक्तीचे ट्रॅकिंग करणारे अॅप विकसित केले आहे तात्पर्य हेच की, एकीकडे डॉक्टर, नर्स यांच्यापासून रतन टाटा यांच्यासारखे उद्योगपती, मोजके सामाजिक कार्यकर्ते यांनी संतपदाला साजेशा वृत्तीचे दर्शन घडवले आहे; मात्र त्याचवेळी समाजातील काही संधिसाधू प्रवृत्तीच्या लोकांना या युद्धप्रसंगी आपल्या तुंबड्या भरून घेण्याची संधी दिसत आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार करून किंवा बनावट सॅनिटायझर बाजारात विकून ही मंडळी पैसा ओरपत आहेत. हातावर पोट असलेल्या अनेकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांनी शहरातून गावाकडे स्थलांतर सुरू केले.
घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला अव्हेरून ही मंडळी टेम्पो, ट्रक इतकेच काय टँकरमध्ये गर्दी करून परराज्यात जात आहेत. या मंडळींकडून पैसे उकळून त्यांना परराज्यात घेऊन जाणाºया दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. औरंगाबाद, सांगलीत संदेशवहनात मोलाची कामगिरी करणाºया वॉकीटॉकीवर कुणी नतद्रष्टांनी डल्ला मारला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विडीकाडी, पान व मद्य शौकिनांचे वांधे झाले आहेत. सुरुवातीला त्यांनी आपली तल्लफ कशीबशी दाबून ठेवली. मात्र त्यानंतर चोरट्या मार्गाने आपली व्यसनाधीनता पूर्ण करण्याकरिता ते आटापिटा करू लागले. लागलीच काहींना येथे लक्ष्मीदर्शनाची संधी दिसली. मद्याच्या बाटलीचे पाचपट दर आकारून या तळीरामांचे घसे ओले करण्याचा धंदा काहींनी सुरू केला.
मद्यसेवनाने माणसाच्या यकृत व मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतो. परिणामी माणसाच्या प्रतिकारक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ज्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता क्षीण झाली आहे, अशा व्यक्तीचे प्राण घेणे कोरोनाला सहज शक्य होते. त्यामुळे अशा पद्धतीने मद्यबंदी असताना छुप्या मार्गाने मद्य पुरवणारे हे युद्धात फंदफितुरी करणाऱ्यांपेक्षा वेगळे नाहीत. अफवा पसरवणाºयांची जातकुळी ही काही वेगळी नाही.
सोशल मीडियावर कुठलेही व्हिडिओ, संदेश खातरजमा न करता पुढे पाठवून देणारे हेही युद्धात शत्रूपक्षाला सामील असणाºयांच्या पंक्तीत बसतात. कोरोनाच्या संकटात अशा दोन्ही प्रवृत्तींचे दर्शन घडत असल्याने घोर कलियुग भविष्यात येणार, असे म्हणून आपल्या काळात सारे आलबेल असल्याचा दावा करणे किंवा कलियुगाच्या नावाने केवळ खडे फोडत राहणे हे मूढत्वाचे लक्षण आहे. सध्याच्या या समरप्रसंगी अशा फुटीर, आपमतलबी प्रवृत्तींना वेसण घालणे ही साºयांचीच जबाबदारी आहे.