धर्मराज हल्लाळे
थोर समाजसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव. वय वर्षे ९०. देशाच्या कानाकोपऱ्यात तरूण, विशेषत: लहान मुलांमध्ये जाऊन राष्ट्रीय एकात्मता आणि एकात्मतेचे बीजारोपण करणारे एक शक्ती देणारे रसायन. देशातील १८ भाषांमध्ये भारत की संतान या गीताद्वारे एकात्मतेचा संदेश देणारे सुब्बाराव अर्थात भाईजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. निमित्त आहे ते लातूर येथील गोल्ड क्रेस्ट हाय मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे. या सोहळ्यात सुमारे २० राज्यातील मुले सहभागी होणार आहेत. मुलांसाठी हा आनंद सोहळा आहे. खूप काही शिकायला मिळेल. चार भिंतींच्या बाहेरील संस्कारक्षम शिक्षण मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. तिथे शिकवायला शिक्षक असणार नाहीत. मुलेच स्वत:हून शिकतील. २२ दालने आहेत. नानाविध उपक्रम होतील. या सर्व आनंदयात्रेबरोबरच मुलांवर सद्भावनेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मूक संस्कारही होणार आहे.
डॉ. एस.एन. सुब्बाराव हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. महाविद्यालयाबाहेर असणाºया तरूणांना राष्ट्रीय युवा योजनेचे व्यासपीठ त्यांनी देशपातळीवर उपलब्ध करून दिले आहे. दुर्गम, दुर्लक्षित भागात त्यांची शिबीरे होतात. तिथे श्रमसंस्कार मिळतात. श्रमदानातून नवनिर्माण उभे केले जाते. भारत जोडोचा नारा तरूणांच्या मनावर ठसा उमटवितो अन् ते आयुष्यभर त्या संस्कारात वाढतात. देशाच्या जडणघडणीत योगदान देतात. बाल महोत्सवातही राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना शांती यात्रा निघते. ज्याचा समारोप भारत की संतान या आगळ्या वेगळ्या सोहळ्याने होतो. महाराष्ट्रात तोही मराठवाड्यात लातूर येथे हा महोत्सव १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. आज प्रांत वाद, भाषा वाद, धर्म व जातीयवादाने मने दुभंगतील अशी स्थिती आहे. प्रत्येकाचा नारा वेगळा आहे. खांद्यावरील झेंडे वेगळे आहेत. समाज, धर्म आणि जातीच्या बेड्यांनी देश दुभंगून जाईल की काय असा सूर विचारवंत मांडत असतात. अशावेळी डॉ़ एस.एन. सुब्बाराव यांच्यासारखे कृतीवंत माणसे देश जोडायला खंबीरपणे उभे आहेत. नानाविध १८ भाषांमधील भारत की संतान हा गीताद्वारे सादर केलेला कार्यक्रम विविधतेत एकतेचा नारा देतो.
विविध प्रांत आहेत. नानाविध भाषा आहेत. राज्या राज्याची संस्कृती वेगळी आहे. वेशभूषा विभिन्न आहे. मात्र आपण सर्वजण भारतीय आहोत याची जाण बालमनावर कोरणारा हा महोत्सव आहे. प्रांतवादावरून होणारी भांडणे, जाती-धर्मावरून होणाऱ्या दंगली, बालमनावर कोणते परिणाम करतात ? आज मुले आपल्या आई-वडिलांना आपण कोणत्या जातीचे आहोत हे विचारू लागले आहेत. हे असे का घडले आणि तसे का घडले हा बालमनाला पडलेला प्रश्न भेदाभेद निर्माण करणारा आहे. अशावेळी सद्भावना आणि शांतीयात्रेची नितांत गरज आहे. किंबहुना विकासाच्या बाता करणारे सरकार मग ते कोणतेही असो, सर्वात पहिल्यांदा या देशाची एकात्मता, सहिष्णुता आणि सद्भावना टिकवणे हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. सुरक्षितता नसेल आणि ज्यामुळे एकात्मता, शांतता भंग होत असेल तिथे विकासही नांदू शकत नाही. अर्थात प्रगतीच्या दारातील सर्वात पहिले पाऊल हे शांततेचे आहे. ती नांदत असेल तरच घरात, गावात, राज्यात अन् देशात विकासाची फळे येतील. अन्यथा कोणाच्या तरी वेशभूषेवरून, आहार पद्धतीवरून दंगे भडकायला वेळ लागणार नाही. हे थांबवायचे असेल वा घडूच द्यायचे नसेल तर राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवासारखे आयोजन हा सर्वोत्तम उपाय आहे. परंतू, सरकार अशा सोहळ्यांना मदत करताना दिसत नाही. या महोत्सवासाठी देशभरातून येणाऱ्या मुलांसाठी कुठल्याही सवलती द्याव्यात सरकारला वाटत नाही. खरे तर समाज दुभंगल्यानंतर त्यात एकता निर्माण करण्यासाठी जे परिश्रम आणि जो पैसा खर्च करावा लागणार आहे. त्या तुलनेत अशा महोत्सवासाठी लागणारी तरतूद सरकारच्या दृष्टीने नगण्य आहे. परंतू, डॉ. सुब्बारावजी यांना देशातील कानाकोपऱ्यात होणारे असे महोत्सव आणि शिबीरे हे स्थानिक संस्थांच्या मदतीने घ्यावे लागतात. महाराष्ट्रात लातूर येथे होणाऱ्या महोत्सवासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशनने सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे जवळपास १ हजार मुले आणि शेकडो शिक्षकांचा सहभाग असलेला हा महोत्सव देशातील बाल पाहुण्यांमुळे लक्षवेधी ठरणार आहे.