विनय र. र., विज्ञान प्रसारक
मिठाच्या ‘व्यसना’मुळे लाखो भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. याकडे गांभीर्याने पाहायला हवे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये दैनंदिन आहारात खूप मोठ्या प्रमाणात मीठ वापरले जाते आणि ते अतिशय धोकादायक आहे, भारतामध्ये मिठाचे सेवन दररोज सुमारे ११ ग्रॅम आहे, ते तीन ग्रॅमपर्यंत आणले पाहिजे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच भारताला दिला आहे.
भारतामध्ये मिठाचे सेवन जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या कमाल ५ ग्रॅम प्रतिदिनपेक्षा दुपटीहून अधिक आहे. आहारातील मिठाचे सेवन कमी न केल्यास, दरवर्षी ४० ते ६९ वर्षे वयोगटातील अंदाजे ८३ लक्ष भारतीयांच्या हृदयात रक्ताची गुठळी होणे, तसेच हृदयविकाराचे रुग्ण वाढतील. त्यातील २० लक्ष केवळ या कारणाने मृत्यू पावतील, याकडेही जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे लक्ष वेधले आहे. हे टाळण्यासाठी पुढील ३० वर्षांच्या कालावधीत मिठाचे सेवन दररोज ११ ग्रॅमऐवजी केवळ ३ ग्रॅम केल्यास हा धोका टाळता येऊ शकेल.
भारताच्या राष्ट्रीय कृती आराखड्यात आणि असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी २०२५ पर्यंत; म्हणजे पुढच्या साधारण एक-दीड वर्षात मिठाच्या सेवनातील ३० टक्के घट साध्य करण्यासाठी सरकार आणि फास्ट फूड उत्पादकांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. मीठ उत्पादकांनीही ‘आरोग्याच्या सगळ्या कमतरता आम्ही मिठाच्या माध्यमातून दुरुस्त करू, असा चंग बांधू नये.’ नाहीतर, इलाज व्हायच्या ऐवजी अनारोग्य बळावेल.
भारतात अलीकडे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रेडिमेड, खारवलेले अन्नपदार्थ.. याशिवाय भारताच्या पारंपरिक पदार्थांत म्हणजेच पापड, लोणची.. यामध्येही मिठाचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणावर असते. जास्त मीठ खाण्याची सवय लागल्यावर त्याची चटक लागते. कालांतराने मिठाचेच व्यसन लागते आणि लोक अधिकाधिक मीठ खाऊ लागतात. मिठाच्या या व्यसनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होतोच होतो.
युरोपियन युनियनने मिठाच्या प्रमाणानुसार तयार खाद्यपदार्थांचे वर्गीकरण केले आहे. तसा उल्लेख वेष्टणावर केला जातो. मिठाचा वापर चार वर्षांत १६% कमी करण्याचा निर्णयही युरोपियन युनियनने घेतला आहे.
बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, इंग्लंड, ग्रीस, हंगेरी, नेदरलँड, पोर्तुगाल, स्लोवाकिया या देशांमध्ये बेकरी पदार्थात मर्यादित मीठ ठेवण्यासाठी कायदे आहेत. तसेच सॉस, चीज, मांस व तृणधान्यापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये असणाऱ्या मिठावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, तुर्कस्तान या देशांत ब्रेडमध्ये एक ते दोन टक्क्यांपेक्षा जास्त मीठ वापरण्यास बंदी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार दरडोई दर दिवशी मिठाचे प्रमाण ५ ग्रॅम पुरेसे आहे. मात्र, आपण भारतीय प्रचंड मीठ खातो. जास्त मीठ खाण्यामुळे रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो. वाढीव मिठामुळे शरीरातील पेशींमधून रक्तात अधिक पाणी ओढले जाते. त्यामुळे रक्ताचे आकारमान वाढते आणि हृदय, रक्तवाहिन्या, मूत्रपिंडे यांच्यावर ताण येतो. आपल्याकडे बैठ्या जीवनशैलीमुळे आधीच हृदय व रक्तदाब विकार वाढले आहेत. त्यात मिठाच्या अधिक सेवनाने भर पडत आहे. मृत्यूच्या कारणांत याचा वाटा २६ % झाला आहे.
कोणत्याही मिठाचे सेवन आरोग्याला सारखेच. मात्र, भारत सरकारने आयोडाईज्ड मिठाची सक्ती केल्यामुळे नैसर्गिक समुद्री मीठ खाण्यासाठी विकणे हा गुन्हा ठरतो. समुद्री मीठ हा शरीरासाठी आयोडीन उपलब्ध होण्याचा सर्वांत चांगला स्रोत आहे. आयोडीनच्या अभावामुळे गलग्रंथी सुजतात. भारतात २० कोटी लोकांना हा आजार आहे. दर सात माणसांमागे एक!
फ्री फ्लो मिठात वरून आयोडीन क्षार घातलेला असतो. १ किलो मिठात २० मिलीग्रॅम आयोडीन क्षार मिसळतात. त्याची किंमत सुमारे २ पैसे आहे. दळलेले मीठ ५ रु. किलो. मात्र, आयोडाईज्ड फ्री फ्लो मीठ २६ रु.पासून १०० रु. किलोपर्यंत मिळते! समुद्राच्या मिठामध्ये पोटॅशियम क्लोराईडचे प्रमाण २.४६ टक्के असते ते फ्री फ्लो मिठामध्ये नगण्य असते. काही कंपन्या मिठात पोटॅशियमचे प्रमाण वाढवतात. एक किलो मिठात १६ ग्रॅम इतके पोटॅशियम क्लोराईड घालतात. ते मीठ ५० रु. ते २०० रु. किलोपर्यंत विकले जाते! आता लोहयुक्त आयोडाईज्ड फ्री फ्लो मीठ बाजारात आले आहे. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. भारतात पुरुषांमध्ये २५% तर महिलांमध्ये ५७% ॲनिमिया आहे. आपल्याला रोज ४० मिलीग्रॅम लोहाची आवश्यकता असते. १ ग्रॅम मिठात १.१ मिलिग्रॅम लोह घालायला भारतीय आरोग्य खात्याची मान्यता आहे. या लोहाची किंमत ०.०२५ पैसे असते. मात्र, हे मीठ ५० ते ९० रु. किलोने विकले जाते.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाने गरिबापासून कोट्यधीशांपर्यंत सर्वांना जागे केले होते. आजही - नैसर्गिक मीठ हा आमचा अधिकार आहे, या विचाराने सर्वांनी जागे होण्याची आवश्यकता आहे.
कुदरती नमक - अच्छा नमक!
शरीराला आवश्यक असणारे क्षार आणि खनिजे आपल्याला भाजीपाला, फळे, फळभाज्या, मांसाहार यातून पुरेशा प्रमाणात मिळतात. आहारात विविधता आणि सर्वसमावेशकता ठेवली तर चांगलेच. कधीतरी चंगळ म्हणून ‘चवीपुरते चिमूटभर मीठ’ पुरेसे आहे - मग, ते समुद्री असो वा खनिज वा हिमालयी - फार फरक नाही. कोणत्याही प्रक्रिया केलेल्या महागड्या मिठाची गरज नाही. सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक मीठ उत्तम.