मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे नाव कालपर्यंत सर्वांना अपरिचित होते, पण आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रातल्या नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आले.मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना या गावचे मूळ रहिवासी होते. त्यांचे वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले तर आई नोकरीवर आहे. पवनीतील वैनगंगा शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते आधी नागपूर आणि नंतर पुण्याला गेले. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांनी चांगल्या पगाराची, सर्व सुखसोई देणारी, सतत समाधानी ठेवणारी नोकरी करावी अशी सर्वांची इच्छा होती. सामाजिक परंपरा लक्षात घेता त्यांनी असा विचार करणे चुकीचेही नव्हते. कारण, उच्च शिक्षण घेणारे असंख्य तरुण असेच करीत असतात. परंतु, मोहरकर यांच्या मनात देशसेवेची ऊर्मी होती. त्यामुळे ते सर्वांच्या अपेक्षांविरोधात जाऊन भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. त्यानंतर पदोन्नती होऊन मेजर पदावर पोहोचले. ते गेल्या आठ वर्षांपासून देशाची सेवा करीत होते. केवळ तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अशा परिस्थितीत त्यांचे शहीद होणे मनाला चटका लावून गेले. त्यांचे पार्थिव काल विमानाने नागपूर येथे आणण्यात आले असता अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन मानवंदना दिली. त्यात राजकीय नेते, शासकीय अधिकारी आदींसह मोहरकर यांच्या पत्नी अबोली यांचाही समावेश होता. त्यांचा हा धीरोदत्तपणा खरंच फार मोठा आणि वीरपत्नीला शोभणारा आहे. प्रफुल्ल मोहरकर हे नाव आता येणाºया पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. मोहरकर यांनी देशाची सेवा करताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जीवाची आहुती दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे. अनेकदा शहीद जवानांना शासकीय इतमामात निरोप दिला जातो. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना विविध मदत मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. मंत्रालयात याबाबत स्वतंत्र विभाग असला तरी, ते कर्तव्यात कसूर करीत असल्याचे बरेचदा आढळून आले आहे. मोहरकर यांच्या बाबतीत असा प्रकार घडू नये. शासनाने या वीर कुटुंबाची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून येणाºया पिढीला देशाकरिता लढताना कुटुंबाचा विचार करावा लागणार नाही. आपल्यानंतर आपले कुटुंब सुरक्षित आहे ही भावना त्यांना शत्रूंचा बीमोड करण्याची ताकद देईल. मोहरकर हे शत्रूंशी लढताना केवळ देशाच्या सुरक्षेचा विचार करीत होते. अशा वीरपुत्रांमुळेच हा देश स्वत:ला सुरक्षित मानतो. त्यांच्या शौर्याला सलाम!
मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्या शौर्याला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 12:25 AM