- वामन देशपांडेभगवंत म्हणतात, ‘पार्था, तू फक्त माझाच भक्त हो, तुझे शुद्ध मन आणि अवघे चित्त तू केवळ माझ्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वात केंद्रित कर. माझीच पूजा कर. माझ्या भजनात तल्लीन हो. मला नमस्कार कर. तू केवळ माझ्यातच जर गुंतलास, तर शेवटी तू मलाच येऊन मिळशील. माझी प्र्राप्ती तुला होईल. जन्म-मरणाच्या चक्रातून तू कायमसाठी सुटशील. तुला माझा गोलोक प्राप्त होईल. आपली उपासना, नामसाधना ही भगवंतांच्या प्राप्तीसाठी असते, हे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.’ परमभक्ती मानवी आयुष्याचा मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रकाशित करते. आपली भक्ती ज्ञानमयी झाली की, परमेश्वर अस्तित्वाचा साक्षात्कारी अनुभव सहजपणे प्र्राप्त होतो. आपल्या हे प्रथम लक्षात यायला हवे की, या प्रकट विश्वाची निर्मिती या परमेश्वरानेच केलेली आहे. सर्व काही भगवंतांच्याच कृपेने चालते, हे एकदा का आपल्या लक्षात आले की, प्रपंचातले आपले ‘मी’पणाने जगणे पूर्णपणे लयाला जाते. भगवंत भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हणतात, ‘पार्था, तू एक लक्षात घे की, सर्व संग्रहाचा शेवटी नाशच होतो. ज्या मर्त्य प्रापंचिक संदर्भाशी निगडित आपण प्रेमभावना जपतो, त्यातले वैयर्थ काही काळानंतर आपल्याला जाणवू लागते. आपण या मर्त्य मानवी संदर्भात उगीच जीव अडकवला, त्याची बोचरी खंत जिवाची अस्वस्थता वाढवते, परंतु जो भक्त निरंतर माझ्याच भजन-कीर्तन-नामात अष्टौप्रहर दंग राहतो, दृढतेने माझी उपासना करतो, तो भक्त मला अधिक प्रिय होतो. त्याच परमभक्तांना माझ्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खरी ओळख होते.’
मोक्षप्राप्ती प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:40 AM