मुलायमसिंह यादवांचा समाजवादी पक्ष, लालुप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल, नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल, ओमप्रकाश चौटाला यांचा राष्ट्रीय लोकदल आणि देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) या सहा पक्षांनी एकत्र येऊन समाजवादी जनता दल हा एकच पक्ष स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या राजकारणावर महत्त्वाचा परिणाम करणारा आणि त्यातील राजकीय समीकरणे बदलणारा आहे. समाजवादी पक्षाच्या ताब्यात उत्तर प्रदेश तर संयुक्त जनता दलाच्या नियंत्रणात बिहार ही दोन देशातील सर्वात मोठी राज्ये आहेत. ओमप्रकाश चौटालांचा पक्ष हरियानात मजबूत आहे आणि देवेगौडांना कर्नाटकात अजून बऱ्यापैकी वजन शिल्लक राहिले आहे. हे सारे पक्ष एकेकाळी जयप्रकाशांच्या जनता पक्षात सहभागी होते. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यात वैचारिक वा तात्त्विक अडचणी येण्याचे कारण नव्हते. नेतृत्वाचा वाद आणि प्रादेशिक अहंता याच गोष्टींचा त्यांच्या एकत्रीकरणात आजवर अडसर राहिला. जोवर केंद्रात काँग्रेसची सत्ता मजबूत होती आणि देशाच्या राजकारणात या प्रादेशिक पक्षांना महत्त्व होते तोवर हा अडसर कायमही राहिला. मात्र २०१४ च्या निवडणुकांनी भाजपाच्या हाती केंद्रातील सत्ता सोपविली आणि राजकारणाची सारी गणितेच बदलून गेली. कधी नव्हे ते हे सारे पक्ष काँग्रेसशी दुरून का होईना संबंध जुळवताना दिसले आणि प्रसंगी त्यांनी काँग्रेससोबत संसदेत संयुक्त भूमिकाही घेतल्या. कारण उघड आहे. हे सारे पक्ष धर्मनिरपेक्ष राजकारणाची बाजू घेणारे व किमान तोंडाने समाजवादाची भूमिका मांडणारे आहेत. या भूमिका काँग्रेसच्या राजकारणातील वळणाच्या जवळही जाणाऱ्या आहेत. मात्र काँग्रेस पक्षाचा लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व पराभव झाल्याने या पक्षांनी त्याच्याशी आजच जुळवून घेण्याचे टाळले असणार. शिवाय काँग्रेसशी जुळवून घ्यायचे तर आपल्या साऱ्यांचे नेतृत्व त्या पक्षाच्या नेत्यांच्या हाती सोपवावे लागण्याची शंकाही त्यांच्यातील साऱ्यांना असणार. वास्तव हे, की मुलायमसिंहांपासून लालुप्रसादांपर्यंत आणि चौटालांपासून देवेगौडांपर्यंतच्या सगळ्याच प्रादेशिक पुढाऱ्यांनी या निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. त्या झटक्याने त्यांना एकत्र यायला भाग पाडले असले, तरी त्यांच्यातल्या प्रत्येकाला राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची असलेली आकांक्षा मात्र सोडता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा या दोहोंपासूनही काही अंतरावर आपली संघटना राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो मोठाही आहे. समाजवादी जनता दल या नव्या पक्षात ओडिशातील नवीनकुमार पटनायकांचा सत्तारूढ पक्ष सहभागी होणे वैचारिकदृष्ट्या अडचणीचे नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसलाही त्याच्याशी जुळवून घेणे सोपे आहे. तसाही ममताबार्इंचा मुलायमसिंहांशी एकेकाळी जवळचा संबंध होता आणि नवीनकुमारांचे यातल्या कोणत्याही पुढाऱ्याशी उभे भांडण नाही. धर्मनिरपेक्षता आणि केंद्राच्या समाजवादी बाजूला राहणे याही मुद्द्यावर त्यांच्यात एकवाक्यताच आहे. मात्र नवीनकुमारांचे एकला चलो रे आणि ममताबार्इंचे अहंतापूर्वक आक्रस्ताळेपण त्यांना यापासून दूर राखणारे आहे. मात्र, राजकारण ही शत्रूंनाही मित्र बनविणारी आणि त्यांना एका रात्रीतून जवळ आणणारी किमयागार व्यवस्था आहे. या साऱ्याचा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावरील राग एवढा मोठा, की तोच आताच्या सहा पक्षांना एकत्र आणायला कारण ठरला आहे. याच कारणाखातर नवीन पटनायक आणि ममता बॅनर्जी यांनाही त्यांना जवळ करणे आवश्यक वाटले तर त्याचे नवल करण्याचे कारण नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही भूमिकांबाबत समाजवादी जनता दलाच्या जवळचा आहे. त्याच्यासाठी काँग्रेस आणि हे दल सारख्याच अंतरावरचे आणि सारख्याच चेहऱ्याचे आहेत. त्यामुळे तो पक्षही या नव्या आघाडीत उद्या सहभागी झाला तर त्याचेही आश्चर्य नव्हे. निवडणुका दूर आहेत आणि हे पक्ष स्वस्थ बसणारे नाहीत. मोदी सरकारच्या यू टर्न प्रकाराविरुद्ध संसदेवर मोर्चा नेण्याचे त्यांनी आताच ठरविले आहे. ही भूमिका काँग्रेसने याआधीच घेतली आहे. त्यातून भाजपातील निरंजन ज्योती किंवा संघ परिवारातील कडव्या भूमिकांचे लोक ज्या तऱ्हेची उन्मादी वक्तव्ये सध्या करीत आहेत तीही या नव्या संघटनेला जास्तीचे अनुयायी व सामाजिक वर्ग मिळवून देणारी आहे. हा देश मुळातच मध्यममार्गी व केंद्राच्या डाव्या बाजूने असणाऱ्यांचा आहे. ही स्थितीही नव्या संघटनेला अनुकूल ठरावी अशी आहे. अडचण एकच, यातला प्रत्येक नेता व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने पछाडला आहे. त्याला भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांविषयी वाटणारा राग तिरस्काराच्या पातळीवर जाणारा आहे. राजकारणात न चालणारा हा दुर्गुण ते घालवू शकले तर या नव्या पक्षाला निश्चितच भवितव्य आहे.
समाजवादी जनता दल
By admin | Published: December 05, 2014 11:39 PM