- कोल्हापूरमराठा आरक्षणासाठी झटणारे संभाजीराजे यांना मानणारा वर्ग मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात अधिक आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी तसेच एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपामधील बहुजन चेहऱ्यावरील हा हल्ला आहे, अशी चर्चा रंगली. त्यावर उतारा टाकण्यासाठी भाजपाने संभाजीराजेंची राज्यसभेवर निवड करुन एक उत्तम राजकीय खेळी खेळली आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा मान, मरातब आणि दबदबा वेगळाच आहे. करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्यापासून सुरू असलेली राजघराण्याची परंपरा आणि मिळणारा मान जनतेच्या अपार प्रेमाने आजही कायम आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कृतिशील विचाराने घडवून आणलेल्या परिवर्तनाने तर महाराष्ट्राच्या विचारधनात मोलाची भर घातली. यामुळे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात एक वेगळे स्थान या घराण्याला आहे. काळ बदलला, राजकीय व्यवस्था बदलली, तरी परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्वातून छत्रपतींच्या घराण्याकडे बघितले जाते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात या घराण्यातील कोणीही उतरले किंवा काम केले, तर त्यास वेगळा आयाम प्राप्त होतो. विद्यमान शाहू महाराज, त्यांचे सुपुत्र युवराज संभाजीराजे आणि मालोजीराजे यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आली. तिचे पावित्र्य, सामाजिक बंधन आणि लोकभावना त्यांनीही परंपरेला साजेशा जपल्या. मात्र, सध्याच्या नामदार-खासदार-आमदार या रचनेत कुठल्याही स्तराला जाऊन काम करण्यात मर्यादा आल्याने छत्रपतींच्या घराण्यातील नेतृत्वाला मर्यादा येत गेल्या. त्यातही युवराज संभाजीराजे हे सन्मानाने राहाण्याबाबत अधिक जागरूक असल्याने त्यांनी राजकारणापेक्षा सामाजिक कार्यावरच सतत भर दिला. शैक्षणिक कामाबरोबरच मराठा समाजाला आरक्षण असो किंवा शिव-शाहू विचाराने समाजाची वाटचाल असो, गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी मोहीम असो, यात ते नेहमी आघाडीवर राहिले. मध्यंतरीच्या काळात त्यांना शरद पवार यांनी राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मालोजीराजे आमदार म्हणून निवडून आले. संभाजीराजे यांना २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेत जाण्याची संधी दिली. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आलेली विधानसभेची निवडणूकही न लढविण्याचा सल्ला छत्रपती शाहू महाराज यांनी चिरंजीवांना दिला. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान देणारे दोन्ही चिरंजीव सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा क्षेत्रांत काम करणे पसंत करीत कार्यरत राहिले. मात्र, आमदार किंवा खासदार होऊ न राजकीय नेतृत्व करण्याची इच्छा असूनही संधी मिळात नव्हती. याच दरम्यान भाजपा पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी धडपड करीत होती. महाराष्ट्रात भाजपा सत्तेवर असली, तरी दक्षिण महाराष्ट्रात तिची तशी बाल्यावस्थाच आहे. एक खासदार आणि सहा आमदार निवडून आलेले असले, तरी स्थानिक समीकरणातून त्यांना विजय मिळाला आहे. बहुतांश आमदार आणि एकमेव खासदार मूळचे भाजपाचे नाहीत. जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, दूध संस्था, साखर कारखाने, आदी सत्तास्थानांपासून भाजपा कैक मैल दूर आहे. अशा परिस्थितीत कोणी पक्षात येईल का असा भाजपाचा प्रयत्न असून त्याला २०१९ च्या दोन्ही निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. बहुजन समाजाला जवळ करण्याचाही तो एक प्रयत्न आहे. त्यातूनच संभाजीराजे यांची राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेवर नियुक्ती करवून घेऊन भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात एक राजकीय डाव टाकला आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपामधील बहुजन चेहऱ्यावरील तो हल्ला असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी थेट छत्रपती घराण्याचाच वापर करण्यात आला. खडसे यांच्या राजीनाम्याचा कवित्वावर उतारा टाकण्यासाठीसुद्धा संभाजीराजेंची निवड ही उत्तम राजकीय खेळी भाजपाने खेळली आहे. यातून एक मात्र झाले की, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याला राजकारणात संधी नाकारणाऱ्यांना चपराक बसली. - वसंत भोसले
संभाजीराजेंची खेळीदार निवड
By admin | Published: June 17, 2016 9:04 AM