देशातील मतदारांमध्ये धर्माच्या नावावर दुभंग निर्माण केला तरच आपला पाड लागू शकतो अशीच बहुधा भाजपाची ठाम धारणा झालेली दिसते. अन्यथा पश्चिम उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैरना गावातून केवळ मुस्लीमांच्या भीतीने शेकडो हिन्दू कुटुंबांनी स्थलांतर केल्याची आवई उठवून या प्रश्नावर राष्ट्रीय चर्चादेखील घडवून आणली गेली नसती. याला आवई म्हणायचे कारण म्हणजे ज्या व्यक्तीने ती उठविली तिनेच आता आपल्या आधीच्या वक्तव्यापासून माघार घेतली आहे. पुन्हा ही व्यक्ती तशी साधीसुधी नाही. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात लष्करी अधिकारी म्हणून लढलेल्या आणि सध्या कैरना लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाच्या हुकुमसिंग यांनी ती उठविली आणि त्यांनीच ती आता सत्यापलाप करणारी असणारी कबुली दिली आहे. भाजपाच्या अलाहाबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मुहूर्त साधून त्यांनी कैरना येथील हिन्दूंची काश्मीरातील पंडितांशी तुलना केली आणि देशभर खळबळ माजवून दिली. सिंग यांनी स्थलांतर केलेल्या दोन-अडीचशे लोकांची यादीदेखील प्रसिद्ध केली. त्यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर जागरुक माध्यमांनी प्रत्यक्ष कैरना येथे जाऊन पाहाणी केली असता सिंग यांच्या यादीतील काही लोक पूर्वीच मरण पावलेले, काहींनी दहा-बारा वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याचे तर अनेकांनी रोजगारासाठी कैरना सोडल्याचे माध्यमाना आढळून आले. त्यावर सिंग यांनी सारवासारव करताना त्या गावात हिन्दू-मुस्लीम संघर्ष निर्माण झाल्याने नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने लोक स्थलांतर करीत असल्याचे म्हटले. कैरना येथील कथित स्थलांतराविषयीचे वक्तव्य माघारी घेताना सिंग यांनी शामली जिल्ह्यातीलच कांधला येथून ६३ हिन्दू कुटुंबांनी नैराश्यापोटी स्थलांतर केल्याची नवी आवई उठवून दिली आहे. जातीय तेढीतून हिन्दूंनी स्थलांतर करण्याच्या वा ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीतून ते होत असल्याच्या दोन्ही आरोपांचा तेथील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इन्कार करुन भाजपावर खोटेपणा तसेच अप्रामाणिकपणाचाही आरोप केला आहे. विशेष म्हणजे त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीदेखील सिंंग यांचे म्हणणे खोडून काढले असून भाजपा केवळ नैराश्यापोटी भलते सलते आरोप करीत असल्याचे म्हटले आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. अखिलेश-मुलायम यांची समाजवादी पार्टी, मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि भाजपा यांच्यात खरी टक्कर असून काँग्रेस सह राजद, जद यांचीही काही भूमिका राहाणार आहे. परिणामी यापुढील काळात परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याच जाणार आहेत. पण हिन्दू मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात भाजपाने पुन्हा एकदा तोच घातक खेळ सुरु केला असावा असे यातून प्रतीत होते.
तोच घातक खेळ
By admin | Published: June 16, 2016 3:53 AM