नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते त्याच प्रयोगाचे सादरीकरण आता मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सुरु झाले आहे. तेथील कुंभमेळा जरी येत्या एप्रिल-मे दरम्यान भरणार असला तरी कथित साधू-संत येत्या मकर संक्रांतीपासूनच डेरेदाखल होणार आहेत. परंतु त्यांच्या आगमनाची दखल घेऊन तेथील प्रशासनाने जी चपळाई दाखविणे त्यांना अपेक्षित होते ती दाखवली जात नसल्याने त्यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांच्याचकडे धाव घेतली घेतली आहे. नाशिक कुंभाच्या वेळी ज्यांना आपल्या हवाई वैभवाचे सादरीकरण करायचे होते पण ज्याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली गेली त्या ‘पायलट बाबां’चा यात पुढाकार आहे, कारण ते षट्दर्शन आखाड्याचे म्हणे प्रमुख आहेत. नाशकातील वास्तव्यात त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपले कसे परमभक्त आहेत याच्या कहाण्या कथन केल्या होत्या आणि आता त्याच चौहानांच्या विरोधात बाबांनी मोदींना गाठले आहे. नाशिकचा कुंभमेळा सुरु असतानाच शिवराजसिंह चौहान सपत्निक नाशकात आले होते आणि त्यांनी प्रत्येक महंतास व्यक्तिगत निमंत्रण देऊन उज्जैनमध्ये त्यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत असे सांगितले होते. आता त्याच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनातील स्थानिक लोकाना हटवून मोदींनी त्यांच्या खास विश्वासातल्या लोकांवर आमच्या सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवावी असा हट्ट पायलट बाबांनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली असून ती मिळताच तब्बल १०१ साधू मोदींना भेटायला जाणार आहेत. षट्दर्शन आखाड्याचे राज्य सचिव नरसिंहदास महाराज यांनी तर राज्य सरकार जाणीवपूर्वक साधू-संतांचा अपमान करीत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांनी केलेला दुसरा आरोप त्याहूनही गंभीर आहे. राज्य सरकार पायलट बाबांवर ‘नजर’ ठेऊन आहे आणि त्यांचे फोनदेखील म्हणे टॅप केला जातो आहे. खरे तर संसाराला असार मानणाऱ्या या साधू-संतांना अत्याधुनिक ‘गॅजेट्स’ची गरजच का पडावी हा एक प्रश्न आणि स्वत:स पारदर्शी मानणाऱ्या या लोकांवर कोणी नजर ठेवली काय आणि न ठेवली काय, त्याने फरक पडायचे तरी कारण काय?
उज्जैनमध्येही तेच
By admin | Published: December 31, 2015 3:04 AM