‘‘मùùग काय केलं आज?’’‘‘भैरू उठला, रानात गेला. बैल सोडले, औत जोडले.. दुसरं नवीन काय करणार?’’ ‘‘मùùग , आम्ही तरी काय नवीन करतो? रांधा, वाढा अन् उष्टी काढा.’’ - भैरूची बायको म्हणत असेल!
‘‘आमचं तरी काय वेगळं आहे? उठा, वेळापत्रकाप्रमाणो दफ्तर भरा, शाळेत जा. तेच ते शिक्षक! तसंच त्यांचं शिकवणं, वर्गपाठ, गृहपाठ, ही चाचणी, ती परीक्षा! सगळं काही तेच ते!’’ भैरूची मुलं म्हणत असतील.
तसे आपण सगळेच एकापरीने ‘भैरू’ असतो. आमच्या शाळेच्या पाठय़पुस्तकातल्या ‘भैरू’च्या धडय़ातल्या ‘भैरू’सारखे! रोज एका ठराविक साच्याच्या दिनक्रमात अडकलेले. बदल नसतो असं नाही. पण आज बटाटय़ाच्या भाजीत कांदा, तर
उद्या कांद्याच्या भाजीत बटाटा! इतपतच तो बदल! मग
आई, बाबा, बंडय़ा, बंडी सगळेच रोज रोज तेच ते करून
‘बोअर’ होतात. मधूनअधून मग ‘रांधा, वाढा’ चुकवण्यासाठी मध्यमवर्गीय आई ‘बाहेर’ जेवायला जायचा ‘बूट’ काढून सुटका करवून घेते. एखाद्या दिवशी बाबा सोयीने आजारी पडून रात्री माफक ‘पार्टी’ करतात, तर बंडय़ा-बंडी शाळा-कॉलेजला दांडी मारून पिकनिक साजरी करून येतात. बदल म्हणाल तर हा एवढाच! कष्टकरी मंडळीही अशा चिल्लर बदलांचा आनंद भोगतात. कामवाली दांडी मारून सिनेमा पाहून येते फार तर! आणि ‘कोल्हं काकडीला राजी’, म्हणीसारखे सगळेच जण अशा लहान-सहान बदलात समाधान मानून आपला ‘बोअरडम’ जरा हलका करतात.
शहरीकरण, औद्योगिकीकरण इ. इ.मुळे हल्ली हे जगणं असं एकसुरी, रटाळ होतंय, असं म्हटलं जातं; पण हे तरी कुठे पूर्ण खरं आहे? अनेक बाबी ‘सालाबाद’प्रमाणो चालूच असतात. उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळासारखे! एरवी ‘सालाबादप्रमाणो’ हा शब्द कसा अस्तित्वात आला असता?
‘भैरू’च्या धडय़ासारखा मागच्या पिढीत एक धडा होता, ‘‘नवरात्र संपले, दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला,...’’, एकूण काय, कुठे मोरू तर तर कुठे भैरू! आपणही त्यांचेच भाऊ! कालच्या पानावरून पुढचा दिवस घालवणारे!
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ख:याखु:या मामाच्या गावाला जायचा शिरस्ता सुदैवाने आमच्या लहानपणी होता. रात्री अंगणात मामाच्याभोवती रिंगण धरून गोष्टी ऐकणो, हा खास कार्यक्रम! भुताखेतांच्या गोष्टी आणि कुणाच्या फजितीच्या गोष्टी रंगवून सांगण्यात आमच्या मामाचा हातखंडा होता. मात्र, आमच्या हावरटपणाला कधी कधी तो वैतागत असावा. ‘‘मामा, आता दुसरी गोष्ट सांग ना!’’ असं आमचं सुरू झालं की, मग हळूच डोळे मिचकवीत विचारायचा, ‘‘कापूसकोंडय़ाची (कांद्याची) गोष्ट सांगू का?’’ - ‘‘हं सांग.’’, ‘‘सांग काय म्हणतोस कापूस.. का?’’ - ‘‘सांग ना रे!’’ ‘‘सांग ना रे काय म्हणतोस? कापूस.. का?’’ हे असं च:हाट मग आम्ही वैतागून जाईर्पयत चालायचं आणि एकेकाचे डोळे पेंगुळत आवाज बंद होऊन झोप लागायची. असा गोष्टीचा हिसका मधूनअधून मिळायचा.
लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्ये ‘बालकवींच्या’ - ठोमरेंच्या लहानपणीच्या गोष्टवेडेपणाची अशीच एक गंमतशीर हकीकत आहे. एक आजीबाई रसाळ गोष्टी सांगत; पण मधूनच वैतागत. मग त्यांची गोष्ट सुरू होई, ‘‘एक चिमणी आली. एक दाणा घेऊन गेली.’’.. ‘‘हंùù’’, ‘‘एक चिमणी आली. आणखी एक दाणा..’’ हे च:हाट ऐकून बालक ठोमरे वैतागून म्हणत, ‘‘हो, हो, हजार चिमण्या आल्या... आता पुढे सांगा.’’ ‘‘दमा ना भाऊ, पुढं सांगू द्या.’’ ‘‘एक चिमणी आली..’’ मग आमच्यासारखंच हं, हं.. करताना पेंगुळत ठोमरेही गाढ झोपी जात.
अशा मग कितीतरी गोष्टी आणि गाणी आठवायला लागली. स्काऊटच्या शेकोटीचं एक असंच गाणं शाळेत भेटलं. एकानं म्हणायचं, ‘‘मालाडचा म्हातारा शेकोटीस आला.’’ दुसरा म्हणो, ‘‘मालाडचा म्हातारा, म्हाता:याचा कुत्र शेकोटीस आला.’’.. पुढे मग कुत्र्याचं शेपूट, शेपटावरची माशी.. शेकोटीस आलाची आवर्तनं चालू राहायची. असंच आणखी एक गाणं.. ‘‘राम नारायण बाजा बजाता!’’ मग बाजा, पुंगी, ढोल, ट्रॅँगल अशा वाद्यांची भर पडत, ‘‘राम नारायण बाजा बजाता’’ हे पालुपद कंटाळा येईर्पयत चालू राही. कधी तरी आपसुकच तोंडं वाजवून थकली की गाणं बंद पडे.
मला वाटतं, पुढचं आयुष्याचं एकसुरी चक्र सुरू होऊन ‘‘भैरू उठला, रानात गेला,’’ ‘‘रांधा, वाढा, उष्टी काढा..’’ अशी प्रत्येक टप्प्यावर जी जगण्याची आवर्तनं होतात, त्याच्या पूर्वतयारीचं सूचन म्हणून लहानपणीची ती गाणी आणि कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगून तयारी करून घेतली जात असेल.’’ ‘‘सकाळपासून रात्रीर्पयत तेच ते आणि तेच ते! जगणोही तेच ते आणि मरणोही तेच ते!’’र्पयत!
डॉ. तारा भवाळकर