देशाच्या वाटचालीत स्थानिक स्वराज्य संस्था चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि रोजगार हमी योजनेने तर देशापुढे आदर्श ठेवल्याचा नेहमीच अभिमानाने उल्लेख होतो. ग्रामविकासाच्या चळवळीत कोणताही नवा प्रयोग अगोदर महाराष्ट्राने करायचा आणि नंतर देशाने त्याचा कित्ता गिरवायचा ! त्याच कारणाने विकास आणि समाजकारणाचे एक सबळ व्यासपीठ म्हणूनच जिल्हा परिषदांना महत्त्व दिले जाते. त्याच कारणाने जिल्हा परिषदांचे सत्ताकारणही नेहमीच महत्त्वाचे बनले. ज्याच्या ताब्यात जिल्हा परिषद त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर मांड, असे सूत्रही तयार झाले. अशाच सूत्राशी नाते सांगण्याचे काम राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेने नेहमीच केले आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर शरद पवार यांचे या जिल्ह्यावर नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे. जिल्हा परिषद असो वा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीत थेट स्वत:चा सहभाग राखण्याचे काम पवारांनी वर्षानुवर्षे केले. आज काळ बदलला आहे. बदलत्या काळाने राजकारण, राजकारणातील निष्ठा आणि राजकीय संस्कृती याच्या व्याख्याच बदलून गेल्या आहेत. बदलत्या व्याख्यांनी निवडणुकीचे तंत्रही बदलले आहे. या तंत्रात पक्ष आणि तथाकथित निष्ठांपेक्षा काळाची मागणी हा मुद्दा वरचढ ठरतो आहे. आपल्या स्वत:च्या आणि आपण काम करीत असलेल्या कार्यक्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपकारक ठरणारा निर्णय म्हणजेच राजकारण ! हे तत्त्व रूढ होऊ लागले आहे. मतयंत्राच्या माध्यमातून येणारे जनादेशही तेच सांगताना दिसतात. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मनोरंजक आणि ऐतिहासिक ठरणार आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, लोकनेते नामदेवराव जगताप, शहाजीराव पाटील यांसारख्या नेत्यांनी जिल्हा परिषदेतील अनेक घडामोडीत निर्णायक भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो. त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर नव्या पिढीतील संजय विठ्ठलराव शिंदे या नेत्याने मोहिते-पाटलांचा निष्ठावंत कार्यकर्ता ते स्वत:च्या हिमतीवर स्वतंत्र भूमिका घेऊन आक्रमक वाटचाल करणारा नेता असा तब्बल तपाचा प्रवास मोठ्या खुबीने केला. आज त्या प्रवासातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक हे महत्त्वाचे वळण आले आहे. संजयमामा या नामाभिधानाने ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याने प्रस्थापितांशी व पर्यायाने मोहिते-पाटलांशी संघर्ष हे आपल्या राजकारणाचे मुख्य सूत्र ठेवले. केवळ त्या सूत्रावर न थांबता त्या सूत्राला ‘जादूची झप्पी’ आणि स्वत:च्या संस्थांच्या सक्षम व पारदर्शी कारभाराची जोड त्यांनी दिली. आता आपण म्हणाल, ही ‘जादूची झप्पी’ काय भानगड आहे. हो, खरंच ! सिनेक्षेत्रातील मुन्नाभाई एम. बी. बी. एस. ची ‘जादूची झप्पी’ देशभर गाजली. तीच ‘झप्पी’ संजयमामा या गृहस्थाने सोलापूर जिल्ह्यात गाजविली, असे म्हणायला हरकत नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संजयमामांच्या या ‘झप्पी’चे नेटवर्क तयार झाले. या नेटवर्कला ना पक्षाची मर्यादा राहिली ना गटाची ! ज्यांनी ‘झप्पी’ घेतली त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत विश्वासपूर्ण साथ-संगत हा ‘जादूच्या झप्पी’चा मुख्य आधार राहिला. त्याचा रिझल्टही जिल्ह्याने स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीवेळी अनुभवला. आकड्याचे गणित राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बाजूचे, मते आणि निकाल मात्र वेगळाच. आता जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्यांपैकी २३ राष्ट्रवादीचे, ७ काँग्रेसचे तर दीपक साळुंखे व आ. गणपतराव देशमुख यांचे ५ सदस्य असे एकूण ३५ सदस्य कागदावर दिसतात. या त्रैरासिकाने जि. प. अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या खिशातच असले पाहिजे. पण संजयमामांची ‘जादूची झप्पी’ आणि त्या ‘झप्पी’ला सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि त्यांची टीम या सर्वांचे बळ मिळाले आहे. परवा ‘वर्षा’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेत्यांना संजयमामांनी कडकडून ‘जादूची झप्पी’ दिली आहे. आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष जादू पाहण्याचीच !- राजा माने
संजय शिंदेंची ‘जादूची झप्पी’
By admin | Published: March 17, 2017 12:41 AM