-सुधीर लंकेअहमदनगरच्या भूमीत कोतकर-जगताप-कर्डिले हे ‘संतमहात्मे’ आले कुठून ? असा प्रश्न शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून उपस्थित केला आहे. पण, येथे हे संतमहात्मे सेनेनेही मोठे केले, हा इतिहास आहे. जगताप पिता-पुत्रांना सेनेने एकदा आपल्या पक्षात घेऊन पावन केले होते. नगरच्या गुंडगिरीला सर्वपक्षीय हातभार आहे. सेनाही त्याला अपवाद नाही.मुंबईतील टोळीयुद्ध गाजत नाहीत तेवढी प्रसिद्धी सध्या अहमदनगर या संतांच्या भूमीतील गुंडगिरीला मिळत आहे. एखाद्या गावाची संस्कृती ही पक्ष, राजकीय नेते आणि प्रशासन कशी नासवू शकतात याचे उदाहरण म्हणून नगरच्या हत्याकांडाकडे व त्यानंतर सुरू असलेल्या राजकारणाकडे पाहता येईल.नगर शहरात केडगावसारख्या उपनगरात एका वॉर्डाची पोटनिवडणूक होती. म्हटले तर ही अदखलपात्र निवडणूक. पण, दोन्ही काँग्रेस-आणि शिवसेना यांनी ती इतकी प्रतिष्ठेची केली की हा वॉर्ड संवेदनशील म्हणून जाहीर करावा लागला. निवडणूक काँग्रेसने जिंकली. त्यानंतर दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना घडली. राष्टÑवादीचे अरुण आणि संग्राम जगताप हे दोन आमदार पिता-पुत्र, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, त्यांचे व्याही काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्यासह ३० जणांनी हत्याकांड केल्याचा आरोप आहे. एकाच वेळी तीन आमदारांवर खुनाचा गुन्हा दाखल होण्याची कर्तबगारी नगरच्या नशिबी आली. या नेत्यांनीच हत्यांकाड घडविले का ? हे अजून निष्पन्न व्हायचे आहे.नगर शहरात कोतकर-जगताप-कर्डिले या तीन परिवारांवर सातत्याने दहशतीचे आरोप झाले. या तीन परिवारांची सोयरेशाही इतकी पक्की आहे की ते कुठल्याही पक्षात असले तरी आतून एकमेकाला भिडलेले असतात. सत्ता मिळविण्यासाठी सोबत असतात. अनेक चुकीचे कार्यकर्ते त्यांनी सोबत पाळले. या तीन परिवारांना आज दहशतखोर ठरविणारी नगरची शिवसेनाही फार संतसज्जन आहे, अशातला भाग नाही. या नेत्यांनी दहशत करायची व सेनेने त्याचे भांडवल करत जगायचे हा सेनेचाही राजकीय धंदा बनला आहे. सेनेचे अनिल राठोड हे रचनात्मक कामांपेक्षा या भांडवलावरच आमदार होत आले. सेनेने आपल्या मुखपत्रात जगताप पिता-पुत्रांना ‘संतमहात्मे’ म्हणून खिजविले. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा जोडधंदा भाजपने २०१४ साली सुरू केला व त्यातून ‘संत’ शिवाजी कर्डिले जन्मले, असा टोला भाजपलाही लगावला. पण, राठोड यांनीच एकेकाळी जगताप पिता-पुत्रांना सेनेत पावन करून घेतले होते. जगताप विधान परिषदेवर सर्वप्रथम सेनेच्याच छुप्या मतांवर निवडून आले. कर्डिले हे युती सरकारच्या काळात सेनेसोबत होते. त्यामुळे हे ‘संतमहात्मे’ घडण्यात सेनेचाही वाटा आहे.नगर शहराचे राजकीय व सांस्कृतिक वाटोळे करण्यात सगळेच पक्ष जबाबदार आहेत. अगदी भाजपसुद्धा. शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर राष्टÑवादीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला, तर सेनेनेही केडगावात धुडगूस घातला. दोन जखमी शिवसैनिकांचे देह तब्बल सात तास पडून होते. तेथे कुणाला जाऊ दिले नाही. ते जिवंत आहेत की गतप्राण झाले? हेही तपासू दिले नाही. ही कुठली ‘संत’कृती? राष्टÑवादीवरचे गुन्हे कायम ठेवा आणि आमच्यावरचे मागे घ्या, अशी सेनेची मागणी आहे. सेनेकडे गृहराज्यमंत्रिपद असताना सेनाच पोलिसांवर आरोप करत आहे.नगरचे नागरिक या सर्वपक्षीय दहशतीला, घराणेशाहीच्या राजकारणाला विटले आहेत. सर्वच पक्षांनी हे शहर बदनाम केले. जगतापांच्या घरातच दोन आमदारक्या का? राठोड यांनी २५ वर्षांत भरीव काय केले? भाजप-काँग्रेसने काय दिवे लावले? हे प्रश्न आहेत. दहशत आणि गुंडगिरीचा निषेध म्हणून नगरला मंगळवारी सामान्य माणसांचा मोर्चा निघाला. त्याचा महामोर्चा होईल तेव्हा सर्वच पक्षांना हादरा बसेल.
नगरचे हे ‘संतमहात्मे’ सेनेनेही मोठे केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:49 AM