उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी त्यांची आताची पदे स्वीकारण्यासाठी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एक वर्ष लोटत नाही तोच त्या दोघांच्याही मतदार क्षेत्रात त्यांच्या सत्तारूढ पक्षाचा दारुण पराभव व्हावा ही देशाच्या राजकारणाने घेतलेले नवे वळण सांगणारी बाब आहे. आदित्यनाथांची ओळख संघाचा परिवार, मोदींचे उत्तराधिकारी अशी करून देत असे आणि त्या संन्याशाला केरळपासून त्रिपुरापर्यंत प्रचाराला नेत असे. सत्तेचा मोह असलेला हा योगी त्याच्या गोरखपूर मतदारसंघातून सातवेळा लोकसभेवर निवडून गेला. त्याआधी ती जागा त्याचे महंतगुरू अवैद्यनाथांनी तीनवेळा राखली होती. उत्तर प्रदेश हे देशाचे मर्मस्थान. त्यातून गोरखपूर हे त्या राज्याचेही मर्मस्थान. त्यातल्या गीता प्रेसने हिंदू धर्मग्रंथाचा प्रचार व प्रसार करण्याचे जे कार्य गेल्या शतकात केले त्याला तोड नाही. अशा धर्मभूमीत एक योगी आडवा झालेला पाहणे ही सर्व धर्ममार्तंडांना व्यथित करणारी बाब आहे. त्यातून त्यांचा व मौर्यांचा पराभव ज्यांनी केला व ज्यांना अल्पसंख्यकांचे पाठीराखे व पाकिस्तानी म्हणून यांनी शिवीगाळ केली त्या समाजवादी पक्षाकडून होणे हा तर त्यांच्या राजकीय पराभवाएवढाच धार्मिक पराभवाचाही भाग आहे. सत्ता हाती आली की माणसांची डोकी कशी चढतात आणि योग्याच्या नम्र वेशात राहणारी माणसेही कशी उद्दाम होतात याचा आदित्यनाथ हा कमालीची उद्विग्नता आणणारा नमुना आहे. त्याने मुख्यमंत्र्याच्या बंगल्याला धर्माचा रंग दिला आणि त्यावर धर्माची चिन्हे लावली. हा घटनेशी व जनतेशी द्रोह करणारा प्रकार आहे हेही न समजण्याएवढी त्याची धर्मांधता पराकोटीची आहे. त्यातूनच त्याच्या राज्यात अल्पसंख्यकांच्या हत्या झाल्या, विद्यार्थ्यांवर धर्मग्रंथांची सक्ती झाली, दलितांवरचे अत्याचार वाढले आणि हे जे चालले आहे ते धर्ममान्य असल्याचा बकवा तो करीत राहिला. मतदारांनी त्याची ही नशा आता उतरविली आहे. त्रिपुरातील जय आणि मेघालय व नागालॅन्डमधील संशयास्पद विजय यानंतर भाजपला अनुभवावी लागलेली ही सर्वात मोठी मानहानी आहे. तिकडे बिहारातही भाजपच्या लोकसभा उमेदवाराचा लालूप्रसाद यादवांनी, ते स्वत: जेलमध्ये असताना व नितीशकुमारांचा जदयू हा पक्ष त्यांच्याकडून भाजपाकडे गेला असताना साठ हजारांवर मतांनी पराभव करून, विरोधकांना कमी लेखू नका हा धडाच मोदींसकट त्यांच्या परिवाराला दिला आहे. ‘मुलायमसिंग रावण आणि मायावती शूर्पणखा आहे. लालू संपले असून देश काँग्रेसमुक्तीच्या मार्गाला लागला आहे’ या भाजपच्या वल्गनांचा फोलपणाच या निकालांनी उघड केला आहे. लटपटी व खटपटी करून निवडणुका जिंकता येतात, त्यात अल्पमत मिळाले तरी बहुमत विकत घेता येते हे भाजपने गोवा, मेघालय, अरुणाचल आणि नागालॅन्डमध्ये दाखविले. मात्र जनतेला विकत घेता येत नाही ही बाब आताच्या या निकालांनी भाजप व संघपरिवाराला शिकविली आहे. विशेषत: मोदी सत्तेत आल्यापासून ज्यांचे पाय जमिनीला लागत नव्हते त्या हवाहवाई पुढाऱ्यांची विमाने या निकालांनी केवळ जमिनीवरच आणली नाहीत तर ती जमीनदोस्तही केली आहेत. आता पुन्हा राममंदिर, पुन्हा गाय आणि गोमूत्र अशा भावनिक गोष्टींचा सहारा घेण्याची पाळी भाजपवर आणणाºया या निकालांनी देशातील मतदारांनाही धर्मांधतेहून संविधाननिष्ठा मोठी व समाजात दुही माजविण्याच्या उद्योगापेक्षा त्यात एकवाक्यता निर्माण करणारे व समता आणि बंधूतेचे राजकारण श्रेष्ठ असल्याचे त्यांच्या कौलाने साºयांना दाखवून दिले आहे. सामान्य माणसाचे सामर्थ्य सत्ताधाºयांएवढेच धर्माधाºयांनाही पराभूत करू शकते हा या निकालांनी दिलेला धडा आपले राजकारण जेवढे लवकर शिकेल तेवढी येथील लोकशाही प्रगल्भ व मजबूत होणार आहे. नुसती भाषणे नकोत, घोषणा नकोत, दिखाऊ आणि नटवे सोहळे नकोत, जनतेला जमिनीवरच्या सुधारणा आणि त्यांच्या हिताचे अर्थकारण हवे असते हा या निकालाचा आणखीही एक धडा आहे. झालेच तर देशातील धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येऊन धर्मांधांचा पराभव करायला सांगणाराही हा मार्गदर्शक निकाल आहे.
राजयोगाहून संन्यासयोग बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:02 AM