पश्चिम महाराष्ट्रात भाजपची सुरुंग पेरणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:18 PM2018-10-31T23:18:05+5:302018-10-31T23:22:04+5:30
पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच कॉँग्रेस विचारसरणीच्या प्रभावाने वर्चस्ववादी राहिला आहे. त्याच जोरात पश्चिम महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ठेवणे शक्य झाले आहे. जेव्हा जेव्हा कॉँग्रेसअंतर्गत संघर्षाने कॉँग्रेस पक्ष संकटात आला, तेव्हा कॉँग्रेसच्याच दोन गटांत जोरदार राजकारण झाले. त्याचे म्होरके...
पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच कॉँग्रेस विचारसरणीच्या प्रभावाने वर्चस्ववादी राहिला आहे. त्याच जोरात पश्चिम महाराष्ट्राचेमहाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ठेवणे शक्य झाले आहे. जेव्हा जेव्हा कॉँग्रेसअंतर्गत संघर्षाने कॉँग्रेस पक्ष संकटात आला, तेव्हा कॉँग्रेसच्याच दोन गटांत जोरदार राजकारण झाले. त्याचे म्होरके यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते-पाटील, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब माने असे अनेक नेते होते. या सर्व नेत्यांच्या बरोबरीने राजकारण केलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत ही परंपरा होती. आजही त्यांचा शब्द आणि राजकीय प्रभाव पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्त्वाची भूमिका बजावतो आहे.
वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रथम स्वबळावर निवडणूक लढविली आणि एक निर्णायक शक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली. त्या शक्तीच्या जोरामुळे कॉँग्रेस पक्षालाही तडजोड करावी लागली. केंद्रात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सामावून घ्यावे लागले. राज्य पातळीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या एकाच विचाराच्या दोन गटांनी आघाडी करून सलग पंधरा वर्षे महाराष्ट्राचे राजकारण सांभाळले.
गत निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा चेहराच बदलला तसा महाराष्ट्राचाही पूर्णत: बदलून टाकला. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी आघाडी तसेच युती करून लोकसभा निवडणूक लढविली. मात्र त्यामध्ये आघाडीचा सपशेल पराभव झाला. महाराष्ट्रात कॉँग्रेसने इतका निचांक कधीच गाठला नव्हता. मराठवाड्यातील दोन लोकसभा मतदारसंघ (नांदेड आणि हिंगोली) वगळता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण आणि मुंबई-ठाणे पट्ट्यात कॉँग्रेसची पाटी कोरी राहिली. याउलट राष्ट्रवादी कॉँग्रेसने चार जागा जिंकल्या. (कोल्हापूर, सातारा, माढा आणि बारामती). मात्र मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण आणि मुंबई-ठाणे पट्टा कोराच राहिला. या आघाडीने एठ्ठेचाळीसपैकी केवळ सहा जागा जिंकल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात हे प्रथमच घडत होते. विदर्भ, खान्देश, मुंबई-ठाणे पट्टा आणि कोकणात आघाडीला एकही जागा मिळाली नाही.
याउलट भाजप-शिवसेना युतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह बेचाळीस जागा जिंकल्या. भाजप २३, शिवसेना १८ आणि स्वाभिमानी एक अशी ती वर्गवारी होती. इतर कोणत्याही पक्षाला यश मिळाले नाही. केंद्र आणि राज्य पातळीवर झालेल्या सत्तांतराचा परिणाम सर्वत्र झाला तसा तो महाराष्ट्राच्या राजकारणावरही झाला. भाजपला अतिमहत्त्वाकांक्षेने पछाडलेले होते. पंचवीस वर्षांची शिवसेनेबरोबरची युती तोडली. तशी पंधरा वर्षांची राष्ट्रवादीबरोबरची आघाडीही कॉँग्रेसने तोडली. हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले. आॅक्टोबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढताना भाजप वगळता सर्वांनी आपली ताकद गमावली. मात्र, भाजपने ऐतिहासिक परिवर्तन करीत १२३ जागा जिंकून चमत्कार करून दाखविला. त्याला सर्वांत महत्त्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोड होती.
अशा पार्श्वभूमीवर आणि केंद्र तसेच राज्यात चार वर्षांच्या सत्तेनंतर भाजप आघाडी निवडणुकांना सामोरे जाते आहे. शिवसेनेबरोबरची युती राहणार की नाही, हे स्पष्ट नाही. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने युती करण्याची इच्छा आहे, असे वारंवार जाहीरपणे सांगण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेना मात्र त्याला उत्तर न देता भाजपवर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार करीत आहे. या वादात भाजपचे पारडे जड झाले आहे. सामान्य माणसांची तसेच या दोन्ही पक्षांना मानणाऱ्यांची सहानुभूती भाजपच्या बाजूने वळते आहे. याचबरोबर शिवसेना स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऐनवेळी गडबड नको म्हणून भाजपने सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढविण्याची तयारी करीत आहे. किंबहुना त्याची तयारीदेखील झाली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागासाठी भाजपने समित्या स्थापन केल्या आहेत. दरमहा त्यांची आढावा बैठक होत आहेत. तशी पश्चिम महाराष्ट्रासाठीदेखील समिती नियुक्त करण्यात आली आहे. दरमहा या समितीच्या बैठका पुण्यात होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा कॉँग्रेस विचारांचा प्रभाव, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व आणि भाजपसाठी कठीण विभाग आहे.
सध्या या विभागात लोकसभेच्या दहा जागा आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे चार, भाजपकडे तीन (सोलापूर, सांगली आणि पुणे) मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना एक (हातकणंगले) तर शिवसेनेकडे दोन जागा आहेत. (मावळ आणि शिरूर). काँग्रेसच्या विचाराने प्रभावित असूनही पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. या पक्षाने दहापैकी चार जागा लढविल्या होत्या. (पुणे, सांगली, सोलापूर आणि हातकणंगले). याउलट राष्ट्रवादीने सहा जागा लढवून चार जिंकल्या होत्या. (मावळ, शिरूर, बारामती, माढा, सातारा आणि कोल्हापूर). भाजपने पुणे, सांगली आणि सोलापूरच्या जागा लढविल्या आणि जिंकल्याही. बारामती, हातकणंगले आणि माढा मतदारसंघ मित्र पक्षांसाठी सोडले होते. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे बारामतीची जागा लढविली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माढा आणि हातकणंगल्याची जागा लढविली. यापैकी हातकणंगल्यात यश मिळाले. (राजू शेट्टी). शिवसेनेने चार जागा लढवून दोन जिंकल्या. (मावळ, शिरूर, सातारा आणि कोल्हापूर) यापैकी मावळ व शिरूरच्या जागा जिंकल्या.
भाजपने येत्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना पुणे, बारामती, माढा, हातकणंगले, सांगली आणि सोलापूरची जागा स्वत:कडे घेण्याची शक्यता आहे. उर्वरित शिरूर, मावळ, कोल्हापूर आणि सातारा या जागा शिवसेना लढवेल. मात्र, युती झालीच नाही तर राष्ट्रवादी कॉँग्रेस या प्रमुख पक्षाशी टक्कर देण्यास भाजप आतापासूनच भूसुरुंग पेरीत आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चितच होणार आहे. त्यामध्ये दहापैकी चार जागा (पुणे, सांगली, सोलापूर आणि हातकणंगले) कॉँग्रेस लढवेल. यापैकी हातकणंगलेची जागा खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाईल. उर्वरित सहा जागा राष्ट्रवादी कॉँग्रेस लढविणार आहे.
त्यामध्ये शिरूर, मावळ, बारामती, सातारा, माढा आणि कोल्हापूरचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी विद्यमान चार जागांपैकी तीन जागा अडचणीत आहेत. साताºयातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देणार का? सातारा जिल्ह्यातील आठपैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्या सर्वांचा उदयनराजेंच्या उमेदवारीस विरोध आहे. उदयनराजे यांना उमेदवारी दिल्यास अडचण आहे. न दिल्यास ते भाजप शिवसेना युतीपैकी साताºयाची जागा ज्यांना सुटेल त्यांच्याकडे ते वळतील. भाजपने आताच त्यांना निमंत्रण वजा आवाहन करून प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तसे आवाहन केले आहे. यापूर्वीही ते भाजपचे आमदार होते आणि युतीच्या सरकारमध्ये काही काळ महसूल खात्याचे राज्यमंत्रीही होते. भाजपची तयारी आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील उमेदवारीचा वाद यावरून साताºयाची निवडणूक गाजणार आहे. उदयनराजे यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास भाजपची अडचण होणार आहे. त्यांना सक्षम पर्याय नाही. राष्ट्रवादीमधील भांडणे वाढल्यास भाजपच्या पोळीवर तूप सांडणार आहे.
कोल्हापूरचीसुद्धा हीच अवस्था आहे. युती झाली तर शिवसेना अन्यथा भाजप स्वतंत्र लढताना प्रथम पसंती राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनाच राहणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांना दोन्ही कॉँग्रेसमधील एका गटाची उमेदवारी देण्यास विरोध आहे. शिवाय धनंजय महाडिक राष्ट्रवादीत शरीराने आणि भाजपमध्ये व्यवहाराने आहेत. त्यांची नाकारलेली उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडेल. मात्र, कॉँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते, असे ते सांगतच असतात. मात्र, शरद पवार माझे दैवत आहेत, असे म्हणतात. त्या दैवाने उमेदवारी न देण्याच्या बाजूने कौल दिला, तर त्या दैवतालाच पंचगंगेत बुडविण्यासाठी मैदानात उतरणार, हे देखील सत्य आहे.
पुणे आणि सोलापूर भाजप लढणार आहेच. बारामतीमध्ये सक्षम उमेदवार नाही. माढा आणि हातकणंगलेवर उसनवारी करावी लागणार आहे. माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली तरी अडचण आणि दिली नाही तरी अडचण, अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे. बारामती वगळता अन्यत्र प्रभाव असून, केवळ पक्षांतर्गत गटबाजीने पोखरल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस अडचणीत आहे. पुणे जिल्ह्यातील चारपैकी बारामती वगळता इतर चार जागांवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी
कॉँग्रेस फारसे आव्हान उभे करेल, असे वाटत नाही. भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मात्र जोरदार टक्कर दिली जाईल. स्वतंत्र लढले तर पुण्यात भाजप आणि शिरुरमध्ये शिवसेना आव्हान उभे करेल. या सर्व परिस्थितीत कॉँग्रेसची अवस्था केविलवाणी होणार आहे. पुणे, सांगली आणि हातकणंगले येथे सक्षम उमेदवार नाहीत. सोलापुरात पुन्हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाच लढावे लागणार आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडून कॉँग्रेस आपला बचाव करू शकते.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सांगली वगळता उर्वरित आठ मतदारसंघात भाजपने आव्हान देण्याची तयारी केली आहे. शिवसेना साथ देऊन युती करणार असेल तर एक आराखडा आणि युती न झाल्यास ठराविक सहा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करणे हा फॉर्म्युला सध्यातरी दिसतो. एखाद्या जागेचा अपवाद वगळला तर शिवसेना फारसे आव्हान देईल, असे वाटत नाही. हीच अवस्था कॉँग्रेसची आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मुख्य लढत राष्ट्रवादी कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. भाजपला एक प्रकारे बळ देण्याचेच काम सध्या अंतर्गत वादात अडकलेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष करतो आहे. त्यासाठीची भाजपची सुरुंग पेरणी महत्त्वाची आहे. त्याचा स्फोट निवडणुका जाहीर होताच होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे पक्षीय बलाबल
एकूण जागा - १०
राष्ट्रवादी - ०४
भाजप - ०३
शिवसेना - ०२
स्वाभिमानी - ०१
कॉँग्रेस - ००