प्रिय साहेब, जय महाराष्ट्रआपली मुलाखत वाचली. सुधाकरराव नाईक यांची आठवण काढून आपण त्यांचा किस्सा सांगितला ते भारी वाटलं. सावज टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही, असं ते म्हणायचे. मात्र आपल्या एका वाक्याचा अर्थ कितीही डोकं खाजवलं तरी समजेना झालाय. आपण म्हणालात, शिकार करायची गरजच नाही, कारण आता सावज दमलंय... ते दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते. खरं काय ते कळेना साहेब... म्हणून हे पत्र लिहायला घेतलं.सावज दमवून दमवून वाघ शिकार करतो हे खरंय पण सावज दमलंय, त्याला जरा थोडा श्वास घेऊ दे, निवांत होऊ दे, मग शिकार करु असं कधी म्हणत नाही तो... सापडला तावडीत की पंजा मारून मोकळा होतो... मग आपण का त्याच्या स्वत:हून मरणाची वाट पाहू लागलो...? शिकार करायची गरजच उरणार नाही, सावज दमलंय... याचा अर्थ ते आपोआप मरून जाईल आणि मग आपण शिकारीवर ताव मारू, असं तर नाही ना साहेब. कारण दमलेल्या सावजाची शिकार म्हातारा झालेलाच वाघ करतो असं पुस्तकात वाचलं होतं म्हणून विचारलं... आम्हाला कळेना म्हणून शेलारमामांना विचारलं तर ते म्हणाले, वाघ दमला की सावज, मला नाही माहिती. मी नागपुरात सावजी खाऊन दमलोय.आज परत आपली मुलाखत वाचली. आपण म्हणालात, उद्याच्या सत्तेची रंगीत तालीम सुरूय... आम्ही पुन्हा कोड्यात पडलो ना साहेब. आजकाल सगळे आपल्याला सत्तेत राहणारे विरोधक म्हणतात. आपण सरकारमध्ये राहूनही मतदान करायची वेळ आली की तटस्थ रहातो. कुणी काही म्हणो, आपण विरोधातच बोलतो. पोटनिवडणुका आल्या की आपण त्यांनाच असा काही ठोकून काढतो की विचारता सोय नाही आणि निकाल लागले की पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून आपलेच नेते चर्चा करत बसतात. ही जर सत्तेची रंगीत तालीम असेल आणि त्यातून आपली सत्ता आली तर तेव्हा देखील आपण असेच वागणार? सत्तेतही आणि विरोधात आपणच राहणार का? एकदम भारी काम होईल. म्हणजे एकदा एका ग्लासातला घोट घ्यायचा, चियर्स म्हणायचं, नंतर दुसऱ्या ग्लासातला घोट घ्यायचा आणि चियर्स म्हणायचं... असचं ना... भारी मजा येईल साहेब. दोन्हीकडे पण आपलेच लोक... एकदम भारी रंगीत तालीम आहे साहेब ही... चालू द्या, चालू द्या...!साहेब, आपल्या मंत्र्यांनी राजीनामे टाईप केले, खिशात ठेवून सगळे वर्षावर गेले, पण द्यायचे राहून गेले, कुणी म्हणालं मध्यंतरी आलेल्या पावसात वाहून गेले असतील राजीनामे... खरं खोटं आपल्यालाच माहिती. पण साहेब, राजीनामा कसा लिहायचा, कसा द्यायचा... हा देखील रंगीत तालमीचाच भाग होता का? सहज सुचलं म्हणून विचारलं...असो. पण मुलाखतीत आपले राऊत साहेब, कधी कधी शरद पवारांच्या प्रेमात पडल्यासारखे का बोलतात हो... आणि परवा दिल्लीत भाजपाच्या कार्यालयात टाईप केलेला तो ‘व्हीप’ ज्याने कोणी काढला होता त्याचा शोध लागला का हो...? साहेब, राजीनामे टाईप करायला दिल्लीत आपलं एकही कार्यालय नाही...?- अतुल कुलकर्णी
सावज दमलं की वाघ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 4:08 AM