>> प्रशांत दीक्षित
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात काँग्रेस पक्ष नाही, मात्र त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी काँग्रेसचा मतभेद आहे असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत केले. सावरकरांवरील टपाल तिकिटाला इंदिरा गांधींनी मान्यता दिली होती याची आठवणही मनमोहनसिंग यांनी करून दिली. काश्मीरला लागू असलेले ३७० कलम ही तात्पुरती व्यवस्था होती, मात्र ती व्यवस्था संवैधानिक पद्धतीने रद्द करायला हवी होती असेही मनमोहनसिंग म्हणाले.
मनमोहनसिंगांच्या या दोन्ही वक्तव्यांतून काँग्रेसची बदलती भूमिका दिसते. ‘सद्यस्थिती’ हा राजकारणात फार महत्त्वाचा बिंदू असतो. सद्यस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या धोरणात बदल सुरू केल्याचे या दोन वक्तव्यातून कळते. महाराष्ट्रातील काही विशिष्ट बौद्धिक संप्रदाय सावरकरांना कायम विरोध करीत असला तरी बहुसंख्य मराठी जनता सावरकरांना श्रेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान देते. सावरकरांचा त्याग, शौर्य, देशप्रेम, प्रतिभा याचा प्रभाव बहुसंख्य मराठी माणसांवर आहे. काँग्रेसने या वास्तवाची दखल घेतली आहे.
३७० कलमाबाबतही काँग्रेसने शहाणपणा दाखविला आहे. हे कलम ही बहुसंख्य भारतीयांच्या मनातील दुखरी जागा होती. हे कलम एका झटक्यात रद्द करून मोदींनी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण केले. या समाधानाला डिवचणे राजकीयदृष्ट्या चुकीचे ठरेल हे काँग्रेसच्या लक्षात आले. ३७० कलम घालविण्यास आमची हरकत नाही, ते ज्या पद्धतीने घालविले त्याला हरकत आहे असे सांगत काँग्रेस पक्ष जनतेमधील बहुसंख्याकांच्या भावनेशी जवळीक साधत आहे. अर्थात ३७० घालविण्यास काँग्रेसने विरोध केला नाही हे मनमोहनसिंग यांचे वक्तव्य साफ चुकीचे आहे. लोकसभेत पक्षाने याच्या विरोधात मतदान केले होते.
तथापि, त्याहून महत्त्वाचा मुद्दा स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपलेसे करण्याचा आणि त्यासाठी इंदिरा गांधींचा दाखला देण्याचा आहे. इंदिरा गांधींचा दाखला देऊन मनमोहनसिंगांना एका ऐतिहासिक सत्याकडे निर्देश केला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात सावरकरांना राजमान्यता कधीच मिळाली नाही. रेडिओवरही त्यांना जागा नसे. नेहरूंचे सरकार सावरकरांच्या कायम विरोधात राहिले व उतारवयातही बेळगावमध्ये त्यांना तुरुंगात ठेवले गेले. गांधी हत्येमध्ये त्यांना गोवण्यात आले होते हे आता पुरेशा पुराव्यांनी सिद्ध झाले आहे. गांधी हत्येच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली यापेक्षा या निकालावर नेहरूंच्या सरकारनेही अपील केले नाही ही बाब सावरकरांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास पुरेशी आहे. सावरकरांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही. जातीभेद निर्मुलनाचे अतिशय प्रखर असे बौद्धिक व सामाजिक प्रयत्न सावरकरांनी केले आणि वेद नव्हे विज्ञान असा मंत्रही दिला. ते प्रखर राष्ट्रवादी होते व समाजसुधारकही होते. त्यांच्या राष्ट्रवादात भौतिक समृद्धीला प्राधान्य होते. भौतिक साधनांनीच भारतीय राष्ट्राची घडण होऊ शकेल हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांची लेखणी तळपत असे.
खरे तर ज्या भौतिक ताकदीचा व समृद्धीचा सावरकरांनी जयघोष केला तीच साधने स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने वापरली. स्वातंत्र्यानंतरचा भारत हा सावरकरांना वाळीत टाकीत असला तरी व्यवहारात सावरकरवाद प्रत्यक्षात आणीत होता. द. न. गोखले यांनी, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक रहस्य’, या पुस्तकात हा मुद्दा फार तपशीलाने मांडला आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांचे प्रत्येक राजकीय, आर्थिक, परराष्ट्रीय धोरण सावरकरवादामध्ये जसे बसते तसे गांधीवादात बसत नाही. प्रचंड उद्योगधंदे, पोलादाचे कारखाने, धरणे, सरकारी प्रयोगशाळा, सैन्याची सक्षमता, देशाला यंत्रशील-तंत्रशील बनविण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्रातील जगाबरोबरची चढाओढ, अशी अनेक धोरणे ही सावरकरवादात बसतात. गांधीवादात यांना स्थान नाही.
मात्र सावकरवादातील राष्ट्रवाद आणि काँग्रेसच्या सुरुवातीच्या पुढाऱ्यांच्या मनातील राष्ट्रवाद यामध्ये महत्त्वाचा फरक होता. सावरकरांच्या विचारांमध्ये हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववाद असे दोन प्रवाह आहेत. यातील हिंदू किंवा हिंदवी राष्ट्रवाद (याचा हिंदी भाषेशी काहीही संबंध नाही, हिंदूस्थानच्या सीमांशी आहे) हा प्रवाह अनेक काँग्रेस नेत्यांना मान्य होता. किंबहुना पंडित नेहरूंचा अपवाद करता या पुढाऱ्यांचे आचरण त्याच विचाराने होत होते. पंडित नेहरू हे सावरकरांचे प्रखर विरोधक असले तरी त्यांच्या कारभारातील अनेक धोरणे ही सावरकरवादाशी जुळलेली होती. विज्ञानाला अग्रस्थान हे या दोन्हीमधील महत्वाचे साम्य. नेहरूंच्या राष्ट्रवादाला हिंदू राष्ट्रवाद हा पैलू नव्हता. इंदिरा गांधींमध्ये मात्र सॉफ्ट हिंदुत्वाचा पैलू दिसतो. इंदिरा गांधी या प्रखर राष्ट्रवादी होत्या आणि राष्ट्र बलवान करण्यासाठी ते शस्त्रसंपन्न झाले पाहिजे, राष्ट्रीय स्वार्थ हा परराष्ट्र धोरणात महत्त्वाचा घटक असला पाहिजे याच धोरणाने त्यांचा कारभार सुरू होता. जगाच्या दबावाला झुगारून इंदिराजींनी अणुस्फोट केला. सावरकर पहिल्यापासून अणुस्फोटाचा आग्रह धरीत होते. दक्षिण ध्रुवावर तळ स्थापन करण्याचा इंदिराजींचा निर्णय या सावरकरांच्या सामरिक धोरणात बसणारा निर्णय होता. देशाच्या ऐक्याला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण होताच सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविण्यास इंदिराजींनी मागेपुढे पाहिले नाही. मकबुल भट्ट या काश्मीरी अतिरेक्याच्या सुटकेसाठी रवींद्र म्हात्रे या परराष्ट्रखात्यातील अधिकार्याचे अपहरण करून त्याची हत्या काश्मीरी अतिरेक्यांनी केली, तेव्हा मकुबल भट्टला इंदिराजींनी त्वरीत फाशी दिले. प्रखर राष्ट्रवादी धोरणाचे हे उत्तम उदाहरण आहे. वेळ योग्य असती तर ३७० कलम हटविण्यास त्यांनी दिरंगाई केली नसती. तथापि, मुसलमानांना वगळणारे सावरकरांचे हिंदुत्व इंदिराजींना अजिबात मान्य नव्हते. सर्व धर्मांनी सहमतीने राहावे आणि सरकार सर्वांसाठी समान आहे या तत्वावर त्यांचा विश्वास होता. कोणत्याही समाजाला, गटाला वगळणारा राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता. सुवर्ण मंदिरात सैन्य पाठविल्यानंतरही स्वतःचे शीख सुरक्षा रक्षक हटविण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला, यावरून हे धोरण स्पष्ट होते. सर्वसमावेशकतेसाठी स्वतःच्या जीवावरील धोका पत्करण्यास त्या तयार झाल्या. इंदिराजींनी असा धोका पत्करणे सावरकरांना मान्य झाले असते का याबद्दल शंका वाटते. सावरकरांनी याबाबत व्यावहारिक सल्ला दिला असता. अशा काही गोष्टींबाबत इंदिराजींचे सावरकरांशी मतभेद असले तरी सावरकरांचे अन्य विचार त्यांना बहुदा मान्य असावेत. म्हणूनच सावरकरांवरील टपाल तिकीटाला त्यांनी विरोध केला नाही.
२००४नंतरच्या काँग्रेसमध्ये सावरकरांच्या टपाल तिकीटाला प्रखर विरोध झाला असता. कारण अलिकडील काँग्रेस ही स्वतःला अहिंदू म्हणवून घेण्यात धन्यता मानत होती. राष्ट्रवाद या संकल्पनेचीच युपीए सरकारला अलर्जी होती. याचाच फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि हिंदी राष्ट्रवादाला त्यांनी हिंदुत्ववादाचे स्वरुप दिले, जे इंदिरा गांधींना अजिबात मान्य झाले नसते. मात्र त्याचबरोबर देशातील साधनसंपत्तीवर अल्पसंख्यांकांचा प्रथम अधिकार आहे असले वक्तव्यही इंदिरा गांधींना मान्य झाले नसते. इंदिरा गांधी प्रखर राष्ट्रवादी होत्या. अध्यात्मिक मूल्ये त्या मानीत असल्या तरी ऐहिक मार्गानेच राष्ट्राची उभारणी करता येते हेही त्या उमजल्या होत्या. पाकिस्तानची फाळणी करून बांगला देशाची निर्मिती इंदिरा गांधींनी केली. शत्रुराष्ट्र दुबळे करण्याचा राष्ट्रवादी विचारच या धोरणामागे होता. ‘एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो’, या सावरकरांनी १९४७साली दिलेल्या घोषणेशी सुसंगत अशी ही कारवाई होती. आजची मानवजात राष्ट्रवाद व शस्त्रवादाच्या राजकीय पातळीवर उभी आहे, असे सावरकरांचे विधान इंदिराजींना मान्य झाले असते. आज ते सर्वांनाच पटते. सावरकरांच्या जीवनदृष्टीत राष्ट्रीय स्वार्थाला महत्वाचे स्थान होते. इंदिराजींच्या जीवनातही राष्ट्रीय स्वार्थासाठी पराकोटीचा प्रयत्न केल्याची उदाहरणे सापडतात. मात्र सावरकरांच्या राष्ट्रीय स्वार्थामध्ये जी अतिप्रवणता, आत्यंतिकता व मुस्लीमांना वगळण्याचे धोरण होते ते इंदिराजींनी शहाणपणाने टाळले. ‘राक्षसांशी लढायचे व जिंकायचे तर सवाई राक्षस होऊनच लढले पाहिजे’, असे प्रतिपादन सावरकरांनी क्रांतीघोष या पुस्तकात केले होते. ते इंदिराजींना मान्य झाले नसते. परंतु, आजचे मोदी सरकार सावरकरांचा आत्यंतिक उग्र राष्ट्रवाद आपलासा करण्याचा धोकादायक प्रयास करीत आहे.
मोदी-शाह यांच्या या प्रयासाला वेसण घालायची असेल तर हिंदुत्ववादी नव्हे पण हिंदवी राष्ट्रवादाला योग्य ते राजकीय स्थान देण्याची गरज आहे. काँग्रेसला ते जाणवले असावे असे मनमोहनसिंग यांच्या विधानावरून दिसते. हिंदूप्रमाणे अहिंदूनीही भारतीय जीवनप्रवाहात मिसळून जावे, सर्वांनी हे राष्ट्र आपले मानावे हा देशामधला फार मोठा विचारप्रवाह आहे. मात्र या सामंजस्यामध्ये हिंदूंची शरणागती नसावी तर हिंदूंच्या स्वार्थालाही योग्य ते स्थान असले पाहिजे असे हा प्रवाह मानतो. बहुसंख्य व अल्पसंख्यांकांच्या स्वार्थामधील समतोल काँग्रेस साधत होती तोपर्यंत पक्षाचे देशावर राज्य होते. हा समतोल बिघडला आणि हिंदी राष्ट्रवादात कडव्या हिंदुत्वाचा शिरकाव झाला. हिंदुत्व वगळलेल्या पण हिंदूना महत्व देणार्या हिंदी सावरकरवादाकडे काँग्रेस वळत असेल तर देशासाठी ते चांगले लक्षण आहे.
आणि आता भारतरत्न किताबाविषयी..
१९६०साली पुणे येथे ‘मृत्युंजय सावरकर समारंभ’ झाला. त्याला अलोट गर्दी लोटली होती. तेथे केलेल्या भावस्पर्शी भाषणात स्वातंत्र्यवीर म्हणाले, ‘ज्या दोन सत्तांनी तुमच्यावर बाराशे वर्षे पारतंत्र्य लादलं ते शत्रू तुम्ही उपटून टाकलेत.. या धन्यतेने मी जगतो आहे. मला जहागिरी नको, तीन-चतुर्थांश हिंदुस्थान मला परत मिळाला माझा, त्यात काय माझी जहागिरी आली नाही… मी अगदी समाधानात आहे..
आम्ही राज्य करण्याकरता, अध्यक्ष होण्याकरिता, भारतभूषण होण्याकरिता म्हणून जर लालसा धरली, तर आमच्या शपथा आम्ही मोडल्या, आमच्या बरोबरच्या मंडळींशी आम्ही विश्वासघात केला, त्यांना मृत्यूमध्ये ढकलून आम्ही राज्योपभोग भोगायला राहिलो, असं होईल…
सावरकरांची ही भावना पाहता, भारतरत्न हा किताब त्यांनी कधीच स्वीकारला नसता.
(मुख्य संदर्भ, सावरकर, एक रहस्य, द. न. गोखले आणि धनंजय किरांचे सावरकर चरित्र)