- प्रा. हरी नरके (सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे संपादक, लेखक, चरित्रकार)
ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे या चार कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले, अशी कबुली दस्तुरखुद्द जोतिराव देतात, यातून सावित्रीबाईंचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित होते. शिक्षण, स्त्री-पुरूष समता, सामाजिक न्याय या विषयांचे ‘सावित्री-जोती’ यांचे समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचे दिसून येते. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी सावित्रीबाईंचे जोतिरावांशी लग्न झाले. जोतिराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.
लग्नानंतर जोतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचे शासकीय कागदपत्रांवरून दिसते. सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतली होती. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत ! सावित्रीबाईंनी शिकविण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेले पहिले पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होय.
समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाईंनी आपले काम केले. १८६३मध्ये जोतिरावांनी ब्राह्मण विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले, त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. या जोडप्याने स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवले होते. दूरदूरहून मुले शिक्षणासाठी तिथे येत असत. त्यांचा एका विद्यार्थी महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती कोणासही जेवू घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे.
एखादंवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारत असे. त्यावर तात्या शांत मुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करत असत.’ जोतिराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारत असत. सावित्रीबाई उत्तर आयुष्यात तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पती-पत्नीत्वाचे खरे प्रेम भरलेले होते. जोतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. शेवटपर्यंत त्या काम करत राहिल्या.
१८९३मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषविले. १८९६च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडले, तेच प्लेगचे थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसे मरू लागली. सरकारने रँड या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेतले. सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतले आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणत, त्यांच्यावर उपचार करत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रुषा करत होत्या.
मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचे प्लेगमुळे निधन झाले.
harinarke63@gmail.com