उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलीस चकमकीत झालेला मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करणारा असला, तरी उत्तर प्रदेशपोलिसांना त्याची फिकीर नाही, असे त्यांच्या वर्तनावरून दिसते. विकास दुबे याने पोलिसांच्या गाडीतून पळताना पोलिसांचे पिस्तूल हस्तगत करून हल्ला केला व त्या वेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असे पोलीस सांगतात. पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याने विकासला पळण्याची संधी मिळाली, असेही सांगितले जात आहे. रस्त्यावर उलटलेली पोलिसांची गाडी सर्वांनी पाहिली. तरीही अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि हे प्रश्न विकास दुबेच्या बचावासाठी नसून, पोलिसांचा खुलासा व घटनाक्रमावर आहेत.मुळात विकास दुबे याला उज्जैन येथे अटक झाली की तो शरण आला, इथंपासून संशयाला सुरुवात होते. उज्जैनमधील महाकाल मंदिरातील सुरक्षारक्षकाने त्याला हटकले तेव्हा त्याने स्वत:हून नाव जाहीर केले. पोलिसांचा ससेमिरा चुकविणारी व्यक्ती असे नाव जाहीर करीत नाही. याचा अर्थ तो पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत होता. शरण येणारी व्यक्ती पोलिसांवर हल्ला करील हे संभवत नाही. ज्या गाडीतून त्याला कानपूरला नेण्यात आले, त्याच गाडीला अपघात झाला की दुसऱ्या गाडीला याबाबतही संशय आहे. शिवाय बेड्या घातलेल्या विकास दुबेने पोलिसांचे पिस्तूल हस्तगत केले कसे? एका पायाने लंगडणारा दुबे सुमारे अर्धा किलोमीटर पळाला कसा? विकास दुबेला घेऊन येणा-या गाड्यांच्या मागे असणाºया पत्रकारांच्या गाड्यांना टोलनाक्यावर का रोखले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चकमकीचा जो बनाव पोलिसांनी उभा केला आहे तो हास्यास्पद आहे. तथापि, त्याहून चिंताजनक बाब म्हणजे माध्यमांचे बारीक लक्ष असूनही अशी चकमक करण्यास पोलीस धजावले. पोलिसांच्या निर्ढावलेपणाचे हे उदाहरण आहे. गेल्या तीन दशकांत देशात अनेक चकमकी झाल्या. त्यातील खºया किती व बनाव किती, हे निर्विवादपणे कधीच बाहेर आले नाही. परंतु, दुबेला चकमकीत ठार मारले जाईल, असे जाहीरपणे बोलले जात असतानाआणि दुबेच्या मागोमाग माध्यमांचे कॅमेरे असताना ही चकमक घडली किंवा घडवून आणली गेली, ही बाब केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर देशासाठी चिंताजनक आहे. कानपूरच्या रस्त्यावर दुबेची गाडी उलटवून योगी आदित्यनाथ यांनी आपले सरकार उलटण्यापासून वाचविले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. सध्याच्या घटनेपुरती ती बरोबर असली तरी अखिलेश, मायावती यांची आधीची सरकारे धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती. दुबेच्या कुटुंबीयांचे राजकारणातील संवर्धन अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीने केले. भाजपच्या राज्यमंत्र्यांवर पोलीस ठाण्यातच खुनी हल्ला करण्याचे धाडस दुबेने वीस वर्षांपूर्वी दाखविले ते सर्वपक्षीय राजकीय संरक्षणाच्या जोरावर. कानपूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २०० पोलीस दुबेचे खबरे होते असे म्हणतात. दुबेच्या घरावर धाड टाकताना दुबेने केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या अधिकाºयाने दोन महिन्यांपूर्वीच वरिष्ठांना पत्र लिहून दुबेने पसरविलेल्या जाळ्याची माहिती दिली होती. दुबे याला सर्वपक्षीय पाठिंबा होता आणि तो त्याने एका व्हिडिओत उघडही केला होता. त्याची रीतसर चौकशी झाली असती, तर दुबेचे अनेक लागेबांधे उघड झाले असते. तसे होऊ न देण्यात उत्तर प्रदेशातील भ्रष्ट यंत्रणा या चकमकीतून यशस्वी ठरली.योगींचे सरकार गुन्हेगारांचा नायनाट करीत आहे असे भासविले जाते. असा नायनाट करण्यामागे उद्देश काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. गुन्हेगारी संपविण्यापेक्षा पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील हातमिळवणीवर पडदा टाकण्याचा उद्देश त्यामागे आहे का, अशी शंका दुबे आणि त्याच्या साथीदारांशी झालेल्या चकमकीतून येते. योगींचा उद्देश साफ असेल तर दुबेला मदत करणाºया भ्रष्ट यंत्रणेतील सर्व म्होरके त्यांनी शोधून काढावेत आणि त्यांना न्यायालयात हजर करावे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता योगींनी हे काम केले, तर त्यांच्या उद्देशाबद्दल खात्री पटेल.