- प्रशांत दीक्षिततेलंगणामध्ये राहूल गांधी व चंद्राबाबू नायडू यांची युती चमत्कार घडवील असे सांगितले जात होते. चंद्राबाबू नायडू यांनी संसदेत बराच हंगामा करून भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणेच आघाडी उघडली. आपलेच भाऊबंध असलेल्या तेलंगणाच्या तुलनेतआंध्र प्रदेशावर अन्याय होत आहे असे त्यांचे म्हणणे होते. राज्यासाठी, विशेषत: राजधानी अमरावतीच्या बांधणीसाठी ते अधिक निधीची केंद्राकडे मागणी करीत होते. मोदी सरकारने ती मागणी मान्य केली नाही. उलट आंध्रला पुरेसा निधी कसा दिला जात आहे हे सविस्तर पत्रातून अमित शहा यांनी जाहीर केले. त्यानंतर चंद्राबाबू खवळले. त्यांनी तिसऱ्या आघाडीचा घाट घातला. दिल्लीत येऊन अनेक नेत्यांची भेट घेतली. फोटोशूट केले. राहूल गांधींबरोबर आघाडी केली आणि तेलंगणात केसीआर यांची सत्ता संपविण्याचा चंग बांधला.
चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पार्टीचे खासदार संसदेत हंगामा करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. बाजूच्या राज्यात, म्हणजे तेलंगणामध्ये केसीआर कसे काम करीत आहेत हे पहा व त्याप्रमाणे नियोजन करा असे मोदी म्हणाले होते. अर्थात चंद्राबाबूंना तेव्हा ते पटले नाही. आताचे रिझल्ट पाहून कदाचित ते पटेल.
केसीआर यांनी नऊ महिने आधीच विधानसभा विसर्जित केली. लोकसभेबरोबर निवडणूक झाली तर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)चा प्रभाव पडणार नाही, कारण लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींभोवती फिरत राहील असा केसीआर यांचा अंदाज होता. तो काही प्रमाणात बरोबर होता. कारण मोदींची जादू इतकी कमी झाली असेल याची कल्पना त्यावेळी कोणालाच नव्हती. केसीआर एकेकाळी काँग्रेसचे मित्र होते. सोनिया गांधी यांना मातेसमान मानणारे होते. पण तेलंगण राज्य स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसने तेथे सुरू केलेल्या राजकारणाला ते विटले. त्यातच काँग्रेसने चंद्राबाबूंची साथ केली. चंद्राबाबू यांनी तेलंगणात आंध्रची अस्मिता जागविण्याचा प्रयत्न केला, जो चंंद्राबाबूंच्या अंगाशी आला. आंध्रचे लोक आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत ही भावना लोकांमध्ये पसरली. तेलंगणाच्या प्रादेशिक अस्मितेला केसीआर यांनी फुंकर घातली. त्याचा फायदा झाला.
मात्र केवळ अस्मितेवर केसीआर यांनी निवडणूक जिंकली नाही. केसीआर यांचे सर्व डावपेच लक्षात घेतले तर काँग्रेस, भाजपा व तेलगू देसम या तिघांची त्यांनी कशी पंचाईत केली हे लक्षात येईल.
काँग्रेसने यावेळी शेतकरी वर्गावर सर्वत्र लक्ष केंद्रीत केले होते. शेतकऱ्यांसाठी अफाट योजना, कर्जमाफीचे आश्वासन, हमी भाव अशा अनेक लोकप्रिय (पण तिजोरी रित्या करणाऱ्या) योजनांची खैरात काँग्रेसच्या सर्व जाहीरनाम्यांमध्ये आहे. तेलंगणामध्येही तसेच करण्यात आले.
तथापि त्याचा अजिबात उपयोग झाला नाही. कारण तेलंगणामध्ये केसीआर यांनी आधीच अशा योजनांची खैरात केली होती. इतकेच नव्हे तर दर चार कुटुंबांपैकी निदान एका कुटुंबापर्यंत आपल्या खुष करणाऱ्या योजनांची फळे थेट पोहोचतील अशी यंत्रणा उभी केली होती. या योजना आखताना व राबविताना केसीआर यांनी पैशाकडे पाहिले नाही. सरकारी तिजोरीतून अफाट पैसा खर्च केला. तेलंगणा हे नवे राज्य असल्याने केंद्राकडून राज्याला मुबलक मदत मिळत होती. त्याचबरोबर राज्याचे मूळ उत्पन्नही बरे आहे. केंद्राच्या मदतीचा वापर करून केसीआर यांनी आपले मतदार बांधले. त्यांच्या योजनांमध्ये नाविन्य नाही, पण त्या थेट मदत पोहोचविणाऱ्या आहेत. या योजना व स्थानिक विविध समाजगटांच्या अस्मिता यांची योग्य सांगड केसीआर यांनी घातली. त्याचबरोबर नवे उद्योग तेलंगणात येण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले.
केसीआर यांच्या या योजना व अन्य उपक्रम याबद्दल स्वतंत्र लिहिता येईल. तथापि त्यांच्या डावपेचातील एका दुर्लक्षित पण महत्वाच्या भागाकडे इथे लक्ष वेधायचे आहे. गुजरातमधील निवडणुकीपासून राहूल गांधी यांनी काँग्रेसकडे पुन्हा धार्मिकतेचा वसा आणला आहे. पूर्वी तो काँग्रेसकडेच होता, पण मधल्या काळात काँग्रेसने हा वसा टाकला होता. गुजरात, कर्नाटक व आता तीनही महत्वाच्या राज्यात राहूल गांधी यांनी आपली हिंदू आयडेंटिटी ठळकपणे जनतेसमोर आणली. भाजपच्या कडव्या धार्मिक राजकारणाला शह देण्याची राहूल गांधी यांची खेळी बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरली. हिंदू व्होट बँक तयार करून ती आपल्या वेठीस धरण्याच्या मोदी- शहा व संघ परिवाराच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसली हे निकालावरूनही समजते आहे.
तेलंगणामध्येही काँग्रेसने हा प्रयोग केला. तेलंगणामध्ये ओवेसी हेही आक्रमक होते. हैदराबाद परिसरात त्यांचे वर्चस्व आहे. ओवेसींना लक्ष करून भाजपनेही तेथे आक्रमक हिंदुत्वाचा झेंडा रोवण्यास सुरूवात केली. योगी आदित्यनाथ यांच्या सभा आयोजित केल्या. भडक भाषणांचा रतीब घातला. मोदी यांच्याही चार सभा झाल्या. त्याला गर्दीही चांगली होती. भाजप व ओवेसी यांचा आक्रमक धार्मिक प्रचार व त्याबरोबरीने काँग्रेसचा सौम्य पण ठळक असा हिंदू प्रचार यामुळे तेलंगणातील प्रचाराला धार्मिकतेचा वेगळा रंग चढला.
याला केसीआर यांनी कसे उत्तर दिले हे पाहण्यासारखे आहे. केसीआर यांनी प्रचारात धर्म आणला नाही वा मंदिर दर्शनासारखी नाटके केली नाहीत. मात्र आपण निष्ठावान, श्रध्दावान हिंदू आहोत आणि त्याचबरोबर अन्य धर्मांचा आदर करणारे आहोत हे जनतेच्या मनावर त्यांनी चार वर्षांत विविध मार्गांनी ठसविले.
हैदराबाद विश्वविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे के के कैलाश यांनी याबाबत उद्बाेधक माहिती दिली आहे. धार्मिकतेची झूल केसीआर यांनी उघडपणे व सहजतेने पांघरली होती, असे कैलाश म्हणतात. सर्व हिंदू देवळांना वा धार्मिक संस्थांना सढळ हाताने मदत दिली जात होती. सोने, चांदी, दागिने अशा सर्व मौल्यवान वस्तुंचा यामध्ये समावेश होता. सरकारी निधीतून हे होत होते. त्याचबरोबर राज्यात जागोजागी यज्ञ करण्यात आले. त्यामध्ये केसीआर कुटुंबियांसह सहभागी होत. राज्याची स्थिती उत्तम राहावी, राज्यावर संकटे येऊ नयेत यासाठी हे यज्ञ करण्यात येत व त्यामध्ये पंगती उठत. तेलंगणात मंगलमय वातावरण राहावे यासाठी मुख्यमंत्री यज्ञयाजन करतो आहे, देवांना साकडे घालतो आहे, ईश्वरी शक्तीची मदत मागत आहे याचे जनतेला बरेच अप्रुप वाटे. केवळ यज्ञयाग व दक्षिणाच नव्हे तर केसीआर यांनी अधिकृत वास्तु सल्लागार नेमला. वास्तुशास्त्रानुसार सरकारी इमारती वा प्रकल्पांचे बांधकाम होऊ लागले. ज्योतिष, अंकशास्त्र याचा काहीवेळा अतिरेक ही झाला व कडक टीका झाली. त्याकडे केसीआर यांनी लक्ष दिले नाही.
भारतीय मानसावर दैववादाचा पगडा फार मोठा आहे. समाजातील मोठा वर्ग अद्याप कर्मकांडाच्या कचाट्यातून वा धाकातून मोकळा झालेला नाही. उच्चविद्याविभूषितही यातून सुटलेले नाहीत. समाजाच्या या स्वभावाकडे पत्रकार व अन्य भाष्यकार गंभीरपणे पाहात नाहीत. या चालीरिती,कर्मकांडे ही त्यांना वेडगळ वाटतात. तशी ती असतीलही. पण या चालीरितींचा प्रभाव विलक्षण असतो व राजकीय पक्षांना त्याकडे लक्ष द्यावेच लागते. कर्मकांडे व चालीरिती यांच्या या प्रभावाकडे काही राजकीय पक्षांनी सुधारणांच्या नावाखाली पूर्ण दुर्लक्ष केले. ही चूक संघ परिवाराच्या लक्षात आली. या वर्गाला आपलेसे करण्यावर परिवाराने भर दिला. त्याचा फायदा भाजपला मिळाला. ही चूक सुधारण्याची धडपड आता काँग्रेसकडून सुरू आहे. काँग्रेस अँटी हिंदू नाही हे समाजात ठसविण्याचा प्रयत्न होत आहे.
समाजावर कर्मकांडाचा प्रभाव असला तरी हिंसक प्रवृत्ती हिंदू समाजाला आवडत नाहीत. हिंदू समाजातील अनेक लोक कर्मकांडापासून स्वत:ला दूर ठेवणारे आहेत. पण ते कडवा विरोध करीत नाहीत आणि दुसर्या लोकांना त्रास न देणारी कर्मकांडे कुणी करीत असेल तर त्यावर आक्षेपही घेत नाहीत. हिंदूंच्या स्वभावाला हे धरून आहे. हिंसक मार्गापासून दूर असणारे सौम्य हिंदुत्व समाजातील खूप मोठ्या वर्गाला पसंत पडते. हिंदू असण्याचा अभिमान किंवा आत्मविश्वास आणि विकासाकडे दिशा हे सूत्र २०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ठेवले. ते जनतेला आवडले. मात्र गेली दोन वर्षे योगी आदित्यनाथांचे कडवेहिंंदुत्व लोकांच्या गळी मारण्याचा प्रयत्न सुरू झाला. ते जनतेला पसंत पडलेले नाही.
केसीआर यांनी आधीपासूनच उघडपणे हिंदू कर्मकांड स्वीकारून काँग्रेस व भाजपची तेलंगणात घुसण्याची ही वाट बंद करून टाकली. लोकोपयोगी व लोकप्रिय अशा योजनांची त्याला जोड दिली. याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला फार मजल मारता आली नाही व भाजप तर अवघी एक जागा जिंकून भूईसपाट झाला.
मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने कर्मकांडात पडावे का, केसीआरप्रमाणे धार्मिक प्रदर्शन करावे का, हे वेगळे विषय आहेत. त्याची चर्चा इथे नाही. हिंदूच्या धार्मिक स्वभावाला आपलेसे करून घेण्याचा जो प्रयत्न काँग्रेस वा टीआरएस अशा पक्षांकडू होत आहे त्याचे हे विवेचन आहे. या प्रयत्नांमुळे भाजपच्या कडव्या व हिंसक हिंदुत्वाला शह बसत आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.