प्रिय क्षत्रिय बंधूंनो,मी तुमच्यापैकी एक आहे. तुम्ही मला शेतमजूर माना किंवा शेतकरी समजा. माझे पूर्वज शेतीच करायचे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझे पूर्वज जे काम करायचे, तसेच काम करणाऱ्यांनी मला आजचा हा अध्यक्षपदाचा बहुमान बहाल केला आहे. कृषक, महत्पराक्रमी शिवाजी महाराज आणि त्यांची सून महाराणी ताराबाई यांच्या वंशातील मी असल्याने आपण हे अध्यक्षपद मला बहाल केले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी या श्रेष्ठ वंशात जन्म घेऊनही दीनदुबळे, दलित, वंचित साºयांचे रक्षण केले, त्यांचा प्रतिपाळ केला; त्या शिवाजी महाराजांच्या वंशातील मी... त्यांचा पुत्र, नातू, पणतूंपैकी मी एक आहे.म्हणूनच आपण मला आमंत्रित करून अध्यक्षपदाचा बहुमान बहाल केला असावा. आपण ज्या भारत देशात राहतो, तो देश पूर्वी ‘आर्यावर्त’ या नावाने ओळखला जायचा. आर्यांचे मूळ निवासस्थान तिबेट (त्रिविष्ट्या) होते. आर्यांचे दोन वर्ण होते. ‘आर्यवर्ण’ आणि ‘दासवर्ण’ ही दोन्ही एकाच पित्याची अपत्ये होती. आर्यांचे गुण दासांनी आत्मसात केले व नंतर हे दासही आर्य बनले. तसेच ज्या आर्यांनी दासांच्या गुणांचा अंगीकार केला, ते आर्यही अशाच प्रकारे पुढे ‘दास’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आर्यांच्या सामाजिक गरजा वाढत जाऊन आर्यांचे चार वर्णांत विभाजन झाले. कल्पित श्रुती-स्मृती त्या काळात अस्तित्वातच नव्हती. वंश, परंपरेच्या आधारावरील वर्णव्यवस्था नंतर अस्तित्वात आली. त्यामुळे वर्णांतर अशक्य होऊन बसले. जो तो आपल्या वर्णात बंदिस्त झाला. त्यामुळे माणसं वर्णच्युत होऊ लागली. परिणामी सामाजिक व्यवस्था बिघडली. शेवटी गुण, कर्मावर आधारित वर्णव्यवस्था जन्म, वंशावर येऊ न स्थिर झाली. उच्चवर्णीय आपल्या जन्मसिद्ध अधिकाराचा गर्व करू लागले. त्यातून अन्यांना हीन लेखणे सुरू झाले.हिंदूंच्या दुर्गतीचे मूळ या वर्णीय अहंकारात सामावलेले आपणास दिसून येईल. आज तर या चार वर्णांतून पाच हजार जाती निर्माण झालेल्या दिसतात. त्यामुळे हिंंदूंचे सामाजिक बळ क्षीण होत गेले. वर्णावर्णांतील तेढ वाढत जाऊन वर्णावर्णांत पूर्वापार चालत आलेले खान-पान, रोटी-बेटी व्यवहार संपुष्टात आले. एका जातीवर अन्याय होत असेल तर दुसºया जातीच्या लोकांत दयाभाव उत्पन्न होत नाही. ते हातावर हात ठेवून उघड्या डोळ्यांनी अन्याय पाहत प्रेक्षक बनतात, बघे होऊ न राहतात. खरे पाहू लागू तर या जगात माणूस ही इथून-तिथून एकमात्र जात आहे. दुसरी जातच अस्तित्वात नाही. समान द्रष्टाभाव, समान आकृती, समान उत्पत्तीतूनच जात ठरते. व्याकरणशास्त्रात म्हटले आहे की, ‘आकृति ग्रहणात्र जाति:’ समान आकृती हीच जात होय. म्हणजेच मनुष्य, गाय, हत्ती, घोडा, पिंपळ, वड (वटवृक्ष) याच खºया जाती होत.माझी तर इच्छा आहे की, प्रत्येकाने स्वत:स चारही वर्णगुणांनी संपन्न करायला हवे; तेव्हा कुठे आपला देश सुधारेल. प्रत्येकाने ज्ञानी बनले पाहिजे. तुम्ही गुणसंपन्न व्हावे, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही अशा नाहक वादात स्वत:ला गुंतवून घेऊ नये की, इतिहासकाळात आम्ही अमुक-तमुक वंशाचे होतो. आपला संबंध पराक्रमी पूर्वजांशी असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. नसेल तरी बिघडत नाही. पण विकास, उन्नतीसाठी पूर्वसंचित उपयोगी ठरत नसते. जनगणना अधिकारी तुम्हास कोणत्या जाती-जमातीच्या सूचीत ठेवतात, वर्गीकरण करतात ते महत्त्वाचे नाही. आपल्या जातिबांधवांच्या शिक्षणाची व्यवस्था करा. समाजातील जे वंचित, उपेक्षित, गरीब आहेत, त्यांना सढळ हातांनी मदत करा. भारतवासीयांत उन्नतीचे तीन मार्ग प्रचलित आहेत. एक पर्दा पद्धती, दोन विधवाविवाह निषेध व तीन दुसºया हाताने बनविलेले अन्न न खाणे. आश्चर्य वाटावे असे नाही का हे? कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराबाई, महाराणी कमलाबाई अशा कितीतरी क्षत्रिय भगिनींनी राज्यकारभार अत्यंत कुशलतेने केला.त्यांनी युद्धे केली व जिंकली पण; जर त्यांनी पर्दा पद्धतीचे पालन केले असते तर त्या असा पराक्रम करू शकल्या नसत्या. मला हे ऐकून आनंद झाला की, कुर्मी क्षत्रिय समाज शेती करतो. मी तर माझ्या मुलांना शेतीचे प्रगत ज्ञान व्हावे म्हणून विदेशात पाठविले. प्रयागसारख्या उन्नत कृषी विद्यालयात मुलांना धाडले. तुम्ही सर्वांनी वैज्ञानिक, प्रगत शेती पद्धतीचा अंगीकार करायला हवा. विकासाचा लाभ स्वत:स होतो तसा पर्यायाने समाजास, देशासही होत असतो. युरोपमध्ये तर शेतकरी प्रतिष्ठित समजला जातो. हे मी तिथे पाहिले, अनुभवले आहे.तिथे तर शेती व्यवसाय करणारे उच्चपदस्थ आहेत. तिथे कलाकारशिल्पी यांनाही मोठा मान आहे. आपल्याकडे सुशिक्षित बी. ए., एम. ए. झालेले कला-कौशल्य आत्मसात करीत नाहीत; कारण कलेस आपण हीन लेखतो, हे योग्य नाही. अशा गैरसमजातून आपण प्रगतीस मुकतो. माझ्या ज्ञानी देशबांधवांना सद्बुद्धी दे रे परमेश्वरा! आपण सर्व बांधवांनी एकमेकांचा आदर करा. प्रेमभाव, बंधुभावच आपणास एक करू शकतो. परदु:खास कवटाळले पाहिजे. त्यातून आपलेपण येते. एकमेकांस साहाय्य, सद्भाव, आदर यांतून आपण शारीरिक, आत्मिक, सामाजिक उन्नती साधू शकू. त्यातूनच आपण आपला देश स्वर्गभूमी, स्वर्णभूमी बनवू शकू.
वैज्ञानिक, प्रगत शेती पद्धतीचा अंगीकार करावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 5:28 AM