इंडियन सायन्स काँग्रेसची सुरुवात १९१४मध्ये सर्वांत आधी कोलकाता येथून झाली. तद्नंतर १९१९ला ६व्या सायन्स काँग्रेसचे आयोजन मुंबईत झाले होते. त्यानंतर १९२६, १९३४, १९६०ला मुंबईत सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. १९६०नंतर तब्बल ५४ वर्षांनी मुंबई विद्यापीठाला इंडियन सायन्सच्या यजमानपदाचा बहुमान मिळाला. नवीन वर्षाच्या प्रारंभीच ३ ते ७ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेली ही काँग्रेस विविध कारणांनी चांगलीच गाजली.या काँग्रेसमध्ये जगभरातील नोबेल लॉरेट आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. ‘मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ ही इंडियन सायन्स काँग्रेसची थीम होती. पाच दिवसांच्या विविध परिसंवादांमध्ये मानवी विकास आणि राष्ट्रउभारणीसाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कशी मदत होईल, याबाबत सखोल चर्चा झाली. परंतु विज्ञानाची पाळेमुळे शोधण्याच्या वादांनी चर्चेचे मोहोळ उठले. दरवर्षी आयोजित होणारी इंडियन सायन्स काँग्रेस त्या त्या राज्यांपुरती चर्चेत राहते. परंतु मुंबई विद्यापीठातील परिषद वादांमुळे सर्वदूर पोहोचली. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण ठरलेले आहे. तसे इंडियन सायन्स काँग्रेस आजवरच्या काँग्रेसला अपवाद ठरली.केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी परिषदेच्या पहिल्याच दिवशी प्राचीन काळातील भारतीयांनी आपल्या संशोधनाचे श्रेय अन्य देशांच्या शास्त्रज्ञांना घेऊ दिल्याचे वक्तव्य करून परिषद चर्चेत आणली. ‘प्राचीन भारतीय हवाई उड्डाण तंत्रज्ञान’ या विषयाला वैज्ञानिक आधार नसल्याने हा विषय परिषदेत समाविष्ट करण्यावरच नासामधील एका भारतीय संशोधकाने आक्षेप घेतला होता. तरीदेखील ‘संस्कृतमधील प्राचीन विज्ञान’ हा विषय परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या परिसंवादाने तर ही परिषद मानवी विकासासाठी होती की प्राचीन विज्ञानाचा शोध घेण्यासाठी हेच कुणास उमगले नाही. या परिसंवादात प्राचार्य कॅप्टन आनंद बोडस यांनी प्राचीन काळातही भारतात विमाने उडत होती, असा दावा करून खळबळ उडवून दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांनीही प्राचीन भारतीय विज्ञान हा विषय परिषदेत समाविष्ट करण्यास १०० वर्षे का लागली, असा प्रश्न उपस्थित केला. यासह इतर वक्त्यांनीही प्राचीन विज्ञानाचे गोडवे गायले. परिषद आयोजक मंडळातील काही मंडळींनी जाणीवपूर्वक हा विषय घेतल्याची टीका तज्ज्ञ करीत आहेत. परंतु झाल्या दाव्या-प्रतिदाव्यांनी विज्ञान परिषदेचा मूळ हेतूच हरविला.केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही प्राचीन भारतीय विज्ञानातील संज्ञा तर्कशास्त्रावर आधारित होत्या, असा दावा केला. तर ज्योतिष हे शास्त्र असून वैज्ञानिकांनी प्राचीन विज्ञानाचे स्मरण ठेवावे, असा सल्ला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी दिला. नवीन सरकारमधील मंत्री आणि त्यांचे अनुयायी भारतीय वैज्ञानिकांचा दृष्टिकोन खच्ची करण्यासाठी सरसावल्याचे यातून दिसले. जगातील सर्व तंत्रज्ञान प्राचीन भारतात होते, असा दावा करणारे मंत्रीगण भारतीय प्राचीन ज्ञानाचे अवमूल्यन करीत आहेत.धार्मिक होण्याऐवजी विज्ञानवादी बना असा सल्ला देत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी नैतिकता धर्मामधून येते पण तिला केवळ वैज्ञानिक आधार असला तरच तिचा स्वीकार करा, असे आवाहन चिल्ड्रन्स काँग्रेसमध्ये विद्यार्थ्यांना केले. यासह शेती, शिक्षण, स्वच्छ भारत, पर्यावरण, मंगळयान मोहीम, नगर विकास, आदिवासींचे प्रश्न, आपत्कालीन व्यवस्थापन आदी विषयांवर झालेल्या विज्ञानवादी चर्चेने परिषदेत सहभागी झालेल्यांची मने सुखावली.१0२ वर्षे झालेल्या इंडियन सायन्सचा उद्देश खरेच सफल होतोय का? हाही आता संशोधनाचा विषय ठरू शकतो. परदेशात संशोधक आणि नागरिकांमध्ये सतत संवाद होत असतो. संशोधकांनी सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून त्यावर उपाय सुचविणे आवश्यक असते. मात्र, भारतात तसे होत नाही. संशोधक आणि सर्वसामान्यांमध्ये संवाद घडून येत नाही. परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये संवाद घडून आला. ही आनंदाची बाब असून, असा संवाद वारंवार घडून आला तरच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल.देशातील विविध समस्यांवर संशोधकांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे उपाय सुचवावेत, असा सूर जवळपास सर्वच चर्चासत्रांमध्ये शास्त्रज्ञांकडून ऐकण्यास मिळाला. हीच बाब विज्ञानवादी नागरिकांसाठी आनंददायी ठरली.तेजस वाघमारे
विज्ञानवादी संवाद
By admin | Published: January 11, 2015 2:03 AM