श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
इडिओनेला सकाइनसिस नावाचा बॅक्टेरिया चक्क प्लॅस्टिक खातो हे २०१६ साली जगाला समजले तरी प्रत्यक्षात तो पंधरा वर्षे आधी सापडला होता. जपानमधील क्योटो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीचे कोहेई ओडा यांना २००१ मध्ये कचऱ्याच्या ढिगात या जिवाणूच्या रूपाने जणू कांचन सापडले. सकाइन शहरावरून त्याचे नाव ठरले; पण या जिवाणूची भूक आणि प्लॅस्टिक खाण्याचा वेग खूपच कमी आहे. इतका की सामान्य तापमानाला अवघ्या दोन सेंटिमीटर लांबीची, ग्रॅमच्या एक विसांश वजनाची प्लॅस्टिक फिल्म वितळवायला या जिवाणूला सात आठवडे लागले. तेव्हा म्युटेशनद्वारे जिवाणूचा नवा अवतार तयार करून त्याची भूक वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या नॅशनल रिन्युवेबल एनर्जी लॅबच्या संशोधक एलिझाबेथ बेल यांना त्यात थोडे यश आले आहे.
प्लॅस्टिकमुक्तीची क्रांती अद्याप दृष्टिपथात नसली तरी आशा पल्लवित झाल्या आहेत. मधल्या वीस वर्षांत प्लॅस्टिकने पृथ्वीतलावरील सगळी जीवसृष्टी, पाणी-माती अशा सगळ्या नैसर्गिक संसाधनांभाेवतीचा महाभयंकर विळखा आणखी घट्ट केला आहे. एका अभ्यासानुसार, या कालावधीत आपण तब्बल अडीच अब्ज टन प्लॅस्टिक तयार केले व वापरून फेकून दिले. त्यात दरवर्षी तब्बल ३८० दशलक्ष टनांची वाढ होते. परिणामी, प्लॅस्टिकच्या महाराक्षसाचा आकार २०६० पर्यंत तिप्पट होईल. केवळ प्रशांत महासागरातील प्लॅस्टिक कचऱ्याचा विचार केला तर ग्रेट ब्रिटनच्या क्षेत्रफळाच्या सातपट आकाराचा एक टापू तयार होईल.
इडिओनेला सकाइनसिस सापडला तेव्हा मायक्रोप्लॅस्टिक किंवा नॅनोप्लॅस्टिक जगाला माहीत नव्हते. त्यानंतर तीन वर्षांनी पुढे आलेल्या, डोळ्यांना न दिसणाऱ्या या सूक्ष्म प्लॅस्टिकचे दुष्परिणाम अंगावर काटा आणणारे आहेत. फळे, भाजीपाल्यात हे प्लॅस्टिक मुळांद्वारे पोहोचते आणि त्यातून माणसांच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे माणसांच्या सगळ्याच अवयवांमध्ये प्लॅस्टिकचे अंश आहेत. त्यापेक्षा भयंकर म्हणजे आईच्या दुधातून ते मुलांच्या शरीरात दाखल होत आहेत. या बालकांचे जगणेच प्लॅस्टिकसोबत सुरू होते. आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक वस्तू, कपडे, बॅगा, बाटल्या या सगळ्यात प्लॅस्टिक असतेच. पीईटी अर्थात पॉलिइथिलिन टेरेप्थालेट या प्रकारचे प्लॅस्टिक कापड व पॅकेजिंग उद्योगात सर्वाधिक वापरले जाते आणि इडिओनेला सकाईनसिस बॅक्टेरिया त्याचा कर्दनकाळ आहे. त्याला पीईटी प्लॅस्टिकमधून चक्क पोषणद्रव्य मिळते.
प्लॅस्टिक कधीच नष्ट होत नाही. जैविक वस्तूसारखे ते कंपोस्ट होत नाही, त्याचे खत बनत नाही. त्याचा फक्त फेरवापर, रिसायकलिंग होऊ शकते. तेदेखील इन्सिनेरेशन म्हणजे जाळण्यातून. अधिक घनतेचे प्लॅस्टिक जाळून त्यापासून पाण्याच्या बाटल्या, नंतर त्या जाळून बॅगा वगैरे, नंतर फायब्रस जॅकेट आणि अखेरीस रस्त्याच्या भरावासाठी वापर, असा पुनर्वापराचा क्रम आहे; पण हे करताना प्रचंड कार्बन उत्सर्जन होते. परिणामी, आधी सगळे जलस्रोत प्रदूषित करून ते तुंबवून टाकणाऱ्या प्लॅस्टिकचा हा पुनर्वापरही अंतिमत: पर्यावरणालाच मारक आहे.
आता यावर जिवाणू हाच उपाय असल्याबद्दल अभ्यासकांचे एकमत आहे. जगभरातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रानोमाळ, शेतशिवार, पाणथळ जागा, कचराकुंड्या अशा ठिकाणी वणवण भटकत राहतात. विविध गुणधर्मांचे बॅक्टेरिया शोधतात. एखाद्या बॅक्टेरियामुळे क्रांती घडते. बीटी कॉटन नावाची कापसाची लोकप्रिय जात अशीच बॅसेलिस थुरिनजेनेसिस बॅक्टेरियातील जनुकामुळे विकसित झाली. जर्मनीतील थुरिनजिन नावाच्या प्रदेशात सापडला म्हणून त्याला ते नाव मिळाले.
२०१९ मध्ये दक्षिण कोरियातील ग्वांगजू विद्यापीठाच्या अभ्यासकांना बीटी जिवाणू कचऱ्याच्या जुन्या डेपोमध्ये १५ मीटर खोलवर पॉलिइथिलिनवर जगताना सापडला, तर पोर्टस्माउथ विद्यापीठाच्या अभ्यासकांना व्हिएतनाम व कंबोडियाच्या कांदळवनात पीईटी प्लॅस्टिक खाणारे मायक्रोब्ज आढळले.बॅक्टेरिया हे माणसाला लाभलेले वरदान आहे. प्लॅस्टिक हा शाप तर जिवाणू हे वरदान. दोघेही सहज नष्ट न होणारे, चिरंजीवी! उल्कापातावेळी उल्केसोबत पृथ्वीवर आलेल्या जिवाणूंपासूनच जीवसृष्टीला प्रारंभ झाला, असे मानले जाते. जिवाणू दुधाचे दही बनवतो, ही सर्वविदीत उपयोगिता. त्याशिवाय मोठ्या कामगिरी जिवाणूंच्या नावावर आहेत. १९८९ सालच्या अलास्का सामुद्रधुनीतील तेलगळतीवेळी हजारो किलो नायट्रोजन खत किनाऱ्यावर टाकले गेले. त्यामुळे तेलाचा थर शोषून घेणाऱ्या बॅक्टेरियांची वाढ झाली. सागराचा श्वास मोकळा झाला. जिवाणूंची कामगिरी मात्र दुर्लक्षित राहिली.
लंडन ऑलिम्पिकवेळी रसायनमिश्रित माती जिवाणूंच्या मदतीने स्वच्छ करून नंतर मैदानांवर टाकली गेली. कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मलमूत्र, घाण साफ करण्यासाठी असाच जिवाणूंचा वापर केला जातो. चोवीस तासांत त्या जागा साफ होतात. तर अशा बहुपयोगी एकपेशीय जीव, बॅक्टेरियाच्या पृथ्वीवर किमान एक कोटी प्रजाती असाव्यात. अंतराळातील त्याचे अस्तित्व ही वेगळी गोष्ट. आता प्लॅस्टिक व जिवाणू यांची गाठ पडली आहे आणि त्यात जिवाणूचा विजय होईल, अशी संशोधकांना खात्री आहे. तसे झाले तर पृथ्वीच्या गळ्याभोवतीचा प्लॅस्टिकचा फास किमान सैल तरी होईल.
यात आधी म्हटल्यानुसार, जिवाणूची कमी भूक, प्लॅस्टिक खाण्याची संथ गती हीच त्यात अडचण आहे. म्युटेशन तसेच नायट्रोजन, ऑक्सिजनचा वापर करून ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी कारबायोस या फ्रेंच कंपनीने इडिओनेला सकाइनसिस बॅक्टेरियाचा वापर करून प्लॅस्टिक रिसायकलिंगवर भर दिला. सुरुवातीला वेग खूपच कमी होता. तो आता रोज अडीचशे किलोवर पोहोचला आहे. बॅक्टेरियाची कार्यक्षमता वाढवून २०२५ पर्यंत ही क्षमता १३० टनांपर्यंत वाढविण्याचे या कंपनीचे नियोजन आहे.