योग हा असा संस्कार आहे, तो आयुष्यभराची सोबत करणारा आहे. त्यामुळे शालेय आयुष्यात योग विषयाची आवड निर्माण होणे, अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शरीराची आणि मनाची ओळख शालेय जीवनात झाल्यास त्याला कसे वळण द्यायचे हे कळू लागते. हल्लीच्या काळातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे अग्रक्रम अर्थात प्रायोरिटी न ठरवता येणे. कोणत्या गोष्टीला केव्हा, किती महत्त्व द्यायचे हेच कळेनासे होते. एकावेळी अनेक बाबींचा मारा होत असतो. त्यात हे माहिती तंत्रज्ञानाचे युग. त्यामुळे विविध गॅझेट्स आणि डिजिटल माध्यमांमुळे माहितीचा मारा सतत सुरू असतो. त्यात अनेकदा गांगरल्यासारखे होते. मुलांनाही या वातावरणात कसे रोखायचे, सांभाळायचे हे एक आव्हानच असते. पण शालेय जीवनात योगविषयक आवड निर्माण झाल्यास यातील बहुतेक समस्यांवर उत्तरे मिळू शकतील. कशाला अग्रक्रम द्यायचा ही सारासार विवेकबुद्धी योगातून निर्माण होते. विचारांचा गुंता सुटायला मदत मिळते. जे आपण ठरवलेले आहे किंवा आपल्या ज्या मूलभूत क्षमता आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योगाचे मोठे साहाय्य मिळते. मुलांमधील खरे गुण कोणते आहेत? हे ओळखण्यासाठी हल्ली पालकांना खूप कष्ट पडतात. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची, समुपदेशकांची मदत घेतली जाते. आपल्या पाल्यांचा कल कोठे आहे? हे शोधणे अनेकांना कर्मकठीण काम वाटते. पर्यायी अनेकदा चुकीच्या वाटा निवडल्या जातात, आणि त्यातून नैराश्य निर्माण होते. योगसाधनेतून ही बाबदेखील सहज सोपी होऊन जाते. लहान मुलांना योगाची आवड लागली म्हणजे त्यांना ज्या गोष्टीत अधिक रस आहे, त्यात ते अधिक समरसून जातात. ज्यात आवड नसेल पण तो अभ्यासक्रमाचा भाग असला तर कर्तव्य भावनेतून ते त्यातही शिकतातच. त्यातून त्यांचा कल ओळखणे खूप सोयीचे जाते. एकाग्रता हादेखील शालेय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर. आमचा मुलगा-मुलगी खूप हुशार, फक्त त्यांनी मनावर घ्यायला हवे! असे अनेक पालकांकडून सांगितले जाते. मनावर घ्यायला हवे, पण ते घेतले जात नाही कारण एकाग्रता न साधणे खूप कठीण जाते. मन चंचल असल्याने बुद्धीला, शरीराला कष्ट देणाऱ्या बाबी करणे सतत टाळले जाते. त्यासाठी लागणारी शिस्त योगाद्वारे निर्माण होणे शक्य आहे. आपण जी गोष्ट करतोय ती अत्यंत एकाग्रतेने केल्यास त्यात अधिकाधिक रिझल्ट्स मिळतात, यश ओघाने मिळत जाते. मग नावलौकिकासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण यासाठी लागणारा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी खरी गरज आहे, योगमार्गाद्वारे हे शक्य आहे. लहान मुलांचा मेंदू कोणतेही बदल, नव्या गोष्टी स्वीकारण्यासाठी नेहमी सज्ज असतो. योगसंस्कारांचा सर्वाधिक लाभ कोवळ्या वयात होऊ शकतो, जो त्यांच्यासाठी आयुष्यभराची पुंजी ठरेल. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल, तिथे तिथे योगशिक्षणाचा समावेश शालेय जीवनात केल्यास होणारे बदल हे विस्मयकारी असतील, यात शंका नाही. सध्याच्या काळात योगविषय अनिवार्य ठरत असताना त्याची सुरुवात लहान मुलांपासून होण्याची गरज आहे. मुलांना योगशिक्षणापासून रोखू नका. त्यांना मनसोक्त योग शिकू द्या, योग आत्मसात करू द्या. किंबहुना या पिढीबरोबरच पुढची पिढीही योगमाध्यमातून सशक्त, संपन्न होईल. या गुंतवणुकीचा परतावा ६ वर्षांनी किंवा पॉलिसीसारखा २० वर्षांनी नव्हे, तर पदोपदी मिळत राहील; आणि शेवटपर्यंत तो सोबत राहील. शिवाय कैक पटींनी अधिक तो पुढच्या पिढीत संकरित होईल, याची खात्री बाळगा. योग शिकताना लहान मुलांची निरागस बुद्धी नवा विषय आत्मसात करण्यासाठी सदैव तयार असते. त्यांना गरज असते ती योग्य योगशिक्षण देण्याची.
आनंदाचा शोध
By admin | Published: January 11, 2015 1:57 AM