- ह. भ. प. बाबामहाराज सातारकरजीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. कोणतीही लाट आली तरी ती समुद्राचीच आहे, हे लक्षात आल्यानंतर ती मोठी लाट आहे की लहान आहे, हा विचार बाजूला पडतो आणि समुद्रावर लक्ष केंद्रित होते. तसे माणसाचे जीवन सुखमय, पावनमय, आनंदमयच आहे. आपल्यापुरता आपण जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत. पण आपण जेव्हा दुसºयाकडे पाहतो तेव्हा आपण दु:खी होतो. आपली सायकल चांगली आहे, पण दुसरा मोटारसायकलवरून गेलेला पाहिल्यानंतर आपल्याला दु:ख होते. म्हणजे आपल्याकडे दु:ख नाही तर अॅक्शन-रिअॅक्शन आहे. दुसºयाचा चांगला संसार पाहिला की आपल्याला बरे वाटेनासे होते. अर्थात आपला वाईट आहे, असे नव्हे. काही माणसे देवमाणसे आहेत. आहे त्या परिस्थितीत सुखी असतात. कारण ती दुसºयाकडे पाहत नाहीत. मला एकदा झोपडीत राहणारे एक कुटुंब भेटले. त्यांना विचारले कसे आहात? त्यावर ते म्हणाले, आहे त्यापेक्षा छान आहे. म्हटले बरे झाले. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही दोघेही काम करतो. कष्ट करतो. लोकांना घास मिळत नाही. आम्हाला मिळतो.’ प्रभूने सुंदर जीवन दिले, असा दृष्टिकोन हवा. खरे तर, विचार केला तर जीवनात आनंद लहरीच आहेत. पण दुसºयाकडे पाहून जीवन जगायचे म्हटल्यास मात्र दु:ख होते. त्याच्याकडे जे आहे, माझ्याकडे नाही हे खरे दु:ख आहे. लंडनला थंडीचे दिवस होते. बर्फ पडत होता. खूप बर्फ साचला होता. एकाच्या पायात बुट नव्हते. तो गाडीमध्ये जाणाºया माणसांना शिव्या देत होता. हे त्याचे मोठ्याने बोलणे रस्त्याच्या कडेला असणाºया एका माणसाने ऐकले. त्याने त्यास बोलावून घेतले. काय झाले, असा प्रश्न केला. त्यावर तो त्रागा करणारा माणूस म्हणाला, हे लोक सगळे पैशावाले चाललेत आणि माझ्याकडे साधे बुटही नाहीत. त्यावर रस्त्यावरील त्या माणसाने आपली पँट वर केली तर त्यास गुडघ्यापासून पाय नव्हते. तो म्हणाला, ‘राजा तुला बुट नाही म्हणून रडतोस, मला तर पायच नाहीत. तरीही मी सुखात आणि आनंदात आहे.’ जीवनात प्रभूने जे दिलेय त्यात सुख मानावे. आनंद मानला तरच जीवन सुखी होणार आहे. माणूस दुसºयाकडे पाहून जगला तर मला नाही वाटत शेवटच्या श्वासापर्यंत सुखी होईल.
शोध सुखाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:48 PM