पूर्वीचे कढ काढून आजच्या जगण्याशी तडजोड करायची ही जगाची जगण्याची रीतच झाली आहे. पण काहींना ही तडजोड करणं मंजूर नसतं आणि कढ काढणंही. ही माणसं जे पूर्वी होतं ते परत निर्माण करण्याचा ध्यास घेऊन काम करत राहतात. मग एक दिवस असा उगवतो की त्यांनी जे निर्माण केलं त्याची दखल जगाला घ्यावी लागते. ब्राझीलमधील फोटोग्राफर सेबास्टिओ सलगाडो आणि त्याची बायको लेलिया या दोघांनीही असंच काम केलं आहे. या दोघांनी स्वबळावर एका ओसाड जागेचं रूपांतर घनदाट जंगलात करून दाखवलं आहे. हे काम एका रात्रीत किंवा काही दिवसात / महिन्यात झालं नाही. यासाठी त्यांना तब्बल २० वर्षे लागली.
ब्राझीलमध्ये सेबास्टिओ राहायचा तो भाग घनदाट जंगलाचा होता. तो भाग म्हणजे उष्णकटिबंधातलं पर्जन्यवनच होतं. हे जंगल म्हणजे देशी-विदेशी वनस्पतींचा, विविध प्राणी-पक्षी-किटकांचा अधिवास होतं. फोटोग्राफर असलेला सेबास्टिओ पत्रकारिता शिकण्यासाठी घरापासून दूर गेला. पत्रकारितेचा अभ्यास करून काही वर्षांनी सेबास्टिओ आपल्या पत्नीसह आपल्या घरी आला तेव्हा त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एकेकाळचं घनदाट जंगल तोडून टाकलेलं होतं. जमीन ओसाड झाली होती. घराचंही खूप नुकसान झालं होतं. घरापेक्षाही आपलं जंगलं मोडून पडलं हे बघून तो दु:खी झाला. त्याला रडू कोसळलं. तो नैराश्यात गेला. तेव्हा सेबास्टिओच्या पत्नीने लेलियाने त्याला धीर दिला. जे गेलं आहे ते आपण परत निर्माण करू, आपण पुन्हा जंगल तयार करू हा आशावाद त्याला दिला. सेबास्टिओलाही उमेद मिळाली. मग त्याने आणि त्याच्या बायकोने गल निर्मितीचा ध्यासच घेतला.
कार्बनडाय ऑक्साइडचं ऑक्सिजनमध्ये रूपांतर केवळ झाडंच करू शकतात. झाडांची ही ताकद ज्यांनी ओळखली नाही त्यांनी एक एक करत झाडं तोडली होती. पण झाडांचं महत्त्व जाणणाऱ्या सेबास्टिओ आणि लेलियाने एक एक झाड लावत जंगल उभारणीला सुरुवात केली. जंगल पुनर्निर्माणासाठी झाडं कोणती निवडायची याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. स्थानिक लोकांशी बोलून स्थानिक झाडांची माहिती घेतली. त्यांनी स्थानिक झाडं लावायला सुरुवात केली.
स्थानिक झाडं आणि वनस्पतींचा आग्रह दोघांनी धरल्याचा चांगला परिणाम म्हणजे झाडांच्या अनेक नामशेष होत असलेल्या जाती त्यांनी वाचवल्या आणि वाढवल्या. त्यांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा माणूस जसा आजाराने खंगतो तशी जमीन खंगून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या जमिनीवर केवळ अर्धा टक्के झाडं कशीबशी शिल्ल्क होती. त्या जमिनीत झाडं लावून सेबास्टिओ आणि लेलियाने जीव फुंकला. आपण जे काम करत आहोत त्याचे परिणाम दिसायला खूप काळ लागणार आहे, तोपर्यंत आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, ते वाढवावे लागतील याची दोघांनाही कल्पना होती. ती दोघं निश्चयाने झाडं लावत राहिली. काही वर्षांनी जंगल पुन्हा आकार घेऊ लागलं. झाडांसोबतच तेथील जीवसृष्टी बहरू लागली. पशुपक्षी, किडे, प्राणी परतल्याने जंगल गजबजू लागलं.
सलग २० वर्षे त्यांनी लाखो झाडं लावली. झाडं जगवली. जंगलाचा विस्तार वाढू लागला तशी मनुष्यबळाची गरज वाढली. त्यासाठी दोघांनी ‘टेरा’ नावाची संस्था सुरू केली. लोकांना प्रशिक्षण दिलं. जंगल वाढवण्यासाठी दोघांनी लोकांचा सक्षम गट तयार केला. ही संस्था जंगलाची, जंगलातल्या पर्यावरणाची काळजी घेऊ लागली. ज्या जंगलाच्या सान्निध्यात सेबास्टिओ लहानाचा मोठा झाला ते जंगल जेव्हा मोडून पडलं तेव्हा सेबास्टिओ स्वत: मोडून पडला होता. आता जंगलासोबतच आपलाही पुनर्जन्म झाल्याचं त्याला वाटत आहे. जंगलातील स्थानिक लोकं, तेथील जीवसृष्टी यांचं काहीतरी म्हणणं असतं. ते माणसाने ऐकायला हवं. त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग विनाशच होतो. पण विनाशाशी तडजोड सेबास्टिओला करायची नव्हती. त्याच्या ध्यासातूनच एका जंगलाला, जंगलातल्या जीवसृष्टीला पुनर्जन्म मिळाला.
२० लाख झाडं आणि शेकडो जीव
जंगलाचं पुनर्निर्माण करताना सेबास्टिओ आणि लेलियाने जंगलातल्या झाडांच्या बिया गोळा करायला सुरुवात केली. पूर्वीपासून जंगलात आढळणारी झाडंच लावण्याचा त्यांचा आग्रह होता. कारण तेथील पशुपक्ष्यांनाही त्याच झाडांचा परिचय होता, सवय होती. नवीन झाडे लावली असती तर स्थानिक पशुपक्षी तेथे परतले नसते. त्या दोघांनी २० वर्षांत २० लाख झाडं लावली. आज त्या जंगलात १७२ निरनिराळ्या पक्ष्यांच्या जाती, ३३ प्रकारचे सस्तन प्राणी, १५ प्रकारचे उभयचर प्राणी, १५ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि २९३ प्रकारच्या वनौषधी आहेत.