धर्म आणि राजकारण या गोष्टी जेव्हा एकमेकांना चिकटतात, तेव्हा त्यातून एक दुधारी शस्त्र तयार होते व त्याचे स्वरूप कमालीचे परिणामकारक व विदारक असते. परवाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच शस्त्राचा अत्यंत खुबीने वापर केला. ते राजकारण म्हणत होते आणि त्यांचे दुय्यम दर्जाचे सहकारी धर्माचे नाव घेत होते. समाजातील सामान्य वर्ग व त्यावर वर्चस्व असणारा उच्च मध्यमवर्ग या दोहोंनाही हे दुहेरी राजकारण भावते. कारण त्यात त्यांना त्यांच्या मिळकतीची व प्रतिष्ठेची सुरक्षितता दिसत असते. गरिबांचे व बेरोजगारांचे वर्ग बोलतात वा ओरडतात, पण त्यांच्यात एकवाक्यता नसते. ते जातीधर्मात, भाषापंथात, तर कधी एकेका जातीच्या पक्षात विभागलेले असतात. त्यांचे पुढारी खुजे व फारसे दूरचे न पाहणारे असतात.
परिणामी, आपापले वर्ग सोबत घेऊन ते पराभवाचीच वाटचाल करीत असतात. पं. नेहरू एकदा म्हणाले, ‘एका धर्मनिष्ठ समाजाचे सेक्युलर राष्ट्रात रूपांतर करणे हे आमच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.’ त्या आव्हानाला आता मिळालेले उत्तर नेमके उलट आहे आणि ते स्वातंत्र्यलढ्याच्या जुन्या परंपरांचा पराभव करणारे आहे. तरीदेखील मोदी व त्यांचा पक्ष यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या आपल्या उभारणीचे व निवडणुकीतील आखणीचे कौतुक करणे आवश्यक आहे. त्यांनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव केला. ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, दिग्विजयसिंग आणि अशोक चव्हाण यांचाही पराभव केला. जी राज्ये गेल्या वर्षी काँग्रेसने जिंकली, ती सारी त्यांनी परत मिळविली, शिवाय आपले पूर्वीचे गडही त्यांनी राखले. प्रचारात काही माध्यमे व प्रचारी ट्रोल्स ताब्यात घेतले आणि सारी लढाई एकतर्फी जिंकली. मोदींचा प्रचार धुव्वाधार होता. बाकीचे सारे नेते त्यांनी झाकोळून टाकले होते. धर्माला विकासाच्या नावाची जोड व राजकारणाची साथ, संघाची मदत आणि धनवंतांचा पाठिंबा असे सारे त्यांना जुळविता आले. आताच्या त्यांच्यापुढच्या आव्हानात सुषमा स्वराज नाहीत, सुमित्रा महाजन नाहीत, गडकरी स्पर्धेत राहिले नाहीत, प्रादेशिक पुढारी पांगले आहेत आणि दिल्ली पूर्णपणे ताब्यात आली आहे. परिणामी, यापुढला त्यांचा कारभार लोकशाहीची मान्यता असलेला एकछत्री कारभार असेल. त्याला गंभीर व वास्तवाचे वळण यावे लागेल. त्याचे स्वरूप ट्रम्पच्या राजकारणासारखे होऊ नये.
आताचा त्यांचा कार्यक्रम देश एकात्म राखण्याचा व त्यासाठी जाती, धर्म, भाषा यांच्यातील संघर्ष संपविण्याचा व तडजोडीचा राहिला पाहिजे. पूर्वीची एकारलेली भाषा व भयतंत्र त्यांना थांबविता आले पाहिजे. वाचाळ माणसांची तोंडे कुलूपबंद केली पाहिजेत. कारण विरोधी पक्ष पराभूत असले, तरी ते शमणार नाहीत. राहुल गांधी दक्षिणेतून आठ लक्ष मतांनी निवडून आले आहेत. सात राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत. पूर्ण बहुमत मिळाले असले, तरी आपल्या सर्व मित्रपक्षांना याही वेळी सरकारमध्ये सोबत घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), अकाली दल, शिवसेनेला व इतर मित्रपक्षांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व द्यावे लागेल. त्यामुळे सरकार सुरळीत चालेल.
देशाला शेतीचा विकास हवा. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळायला हवा. रोजगाराच्या संधी वाढवायला हव्यात. लष्कराची ताकद वाढायला हवी. बुलेट ट्रेन नंतर आली तरी चालेल, पण आधी बेरोजगार माणसांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे आणि जिणे सुकर झाले पाहिजे. समाजजीवन सदैव पुढे जाणारे असते, ही जाणीव ठेवूनच मोदींना काम करावे लागणार आहे, तसे ते करतील, याची अपेक्षा जनतेला आहे.