समाज आणि देशाच्या विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोककल्याणासाठीच्या अनेक योजना शासन या संस्थांच्या सहकार्यानेच राबवित असते आणि या कामासाठी त्यांना पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला जातो. परंतु मागील काही वर्षात स्वयंसेवी संस्थांची वाढलेली अवाढव्य संख्या आणि यापैकी काहींवर होणारे निधीच्या गैरवापराचे आरोप यामुळे समाजसेवेच्या नि:स्वार्थ उद्दिष्टांनाच कुठेतरी गालबोट लागल्याची शंका यावी. अनेक संस्था समाजसेवेच्या पडद्याआड निव्वळ शासकीय निधी लाटण्याचे काम करीत असल्याची गंभीर बाबही निदर्शनास आली असून स्वयंसेवी संस्थांच्या या अनियंत्रित कारभारावर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. स्वयंसेवी संस्थांची संख्या आणि या प्रश्नाच्या व्याप्तीकडे लक्ष देणारी एखादी नियामक संस्था आहे काय, असा सवाल सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान शासनाला विचारला आहे. एवढेच नव्हे तर त्यांना मिळणाऱ्या निधीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी कायदा असावा, असेही सुचविले आहे. देशात आजमितीस ३० लाख स्वयंसेवी संस्था असून ही संख्या चक्रावून टाकणारी आहे. एकट्या महाराष्ट्रात पाच लाखावर तर आसामात ९७ हजार आणि बिहारात ६१ हजार संस्थांची नोंदणी आहे. गृह मंत्रालयानुसार अशा संस्थांना दर वर्षी १५० देशांकडून १० हजार कोटी रुपये मिळतात. परंतु या निधीचा कुठे व कसा वापर होतो याबाबतची माहिती शासन दरबारी नाही. अनेक संस्थांकडून विदेशी निधी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यावर शासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षी अशा ६९ संस्थांना काळ्या यादीत टाकून विदेशी निधी स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली तर ३१ हजार संस्थांना आयकर विवरण न भरल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली. काही संस्था देशहिताविरुद्ध कारवायात गुंतल्या असल्याचा गंभीर आरोप गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने शासनाने केल्यानंतर हे सरकारचे दमनतंत्र असल्याचीही टीका झाली होती. पण बहुतांश स्वयंसेवी संस्था या लोकांची सेवा करण्यापेक्षा स्वत:चाच उद्धार करण्यात धन्य मानत असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. मुळात समाजसेवा हा सुद्धा आता व्यवसाय झाला आहे. या क्षेत्रात रग्गड पैसा असल्याने करिअर म्हणूनही त्याची निवड होऊ लागली आहे. अनेक संस्थांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच आहेत. अन्यथा या ३० लाख संस्थांनी स्वत:ला प्रामाणिकपणे समाजकार्यात झोकून दिले तर देशाचे चित्र निश्चितच वेगळे आणि सुखावह दिसले असते.
आत्मोद्धारी संस्था
By admin | Published: September 23, 2016 12:48 AM