- मिलिंद कुलकर्णी
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने संवेदनशील अभिनेता आमीर खान, पत्नी किरण राव व अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत दोन दिवस खान्देशात आले होतो. चार गावांमध्ये त्यांनी ४५ अंश तापमानाची तमा न बाळगता श्रमदान केले. चित्रीकरण केले. ग्रामस्थांशी संवाद साधला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना आमीर खान यांनी दिलेले प्राधान्य, लोकसहभागातून उभारलेली मोठी चळवळ ही खरोखर कौतुकास्पद आहे. राज्य शासन, भारतीय जैन संघटना यांनीही वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना संपूर्ण सहकार्य देऊ केले. भारतीय जैन संघटनेने तर जेसीबी, पोकलँड मशीन मोफत उपलब्ध करुन दिले. जलसंधारण चळवळीचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसह बहुसंख्य शासकीय अधिकाऱ्यांनी स्वत: श्रमदान करीत अन्य सर्व प्रकारची मदत या गावांना केली. ‘तुफान आलंया’ या बोधवाक्याप्रमाणे खरोखर मोठी स्पर्धा गावागावांमध्ये दिसून आली.
आमीर खान, किरण राव यांच्यासारख्या कलावंतांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील समस्येला भिडावे आणि त्यासाठी जलसंधारणासारखे ठोस उपाय हाती घ्यावे, हे आदर्शवत असे उदाहरण आहे. ‘सेलिब्रिटी’ असल्याने त्यांच्या कृतीकडे तरुणाईसह संपूर्ण समाजाचे लक्ष असते. त्यांनी ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून हाती घेतलेल्या कार्याला समाजाकडून लाभलेल्या उदंड प्रतिसादावरुन या कलावंतांची लोकप्रियता आणि त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाची अपरिहार्यता अशा दोन्ही गोष्टी अधोरेखित होत आहेत.
चांगल्या कामात खोडा घालण्याची मानवी प्रवृत्ती असते, त्याचा प्रत्यय अशा उपक्रमांमध्येही येतोच. श्रमदानासाठी गाव राबत असताना त्याचे कौतुक करण्याऐवजी काही मंडळींनी आयुष्यभर ज्यांच्या श्रमाचे शोषण झाले, त्यांचे काय ? असा सवाल उपस्थित करुन या उपक्रमाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. शोषणाचा प्रश्न आहेच, त्याबद्दल दुमत नाही. त्यासंबंधी कायदे, नियम आहेत, त्याची अंमलबजावणी होत नसेल तर दाद मागता येऊ शकते. परंतु श्रमदानासारख्या विधायक उपक्रमाच्यावेळी असे विषय उपस्थित करुन काय साधले जाते?
दुसरा विषय श्रमदानापेक्षा या अभिनेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईचे ओंगळवाणे प्रदर्शन. ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी समस्या सोडविण्याच्या तळमळ आणि कळकळीने भौतिकदृष्टया संपन्न असलेला अभिनेता ४५ अंश तापमानात खेडोपाडी फिरत असताना श्रमदान करण्याऐवजी आमची तरुणाई सेल्फी काढण्यात गर्क दिसली. व्हॉटस अॅप, फेसबूक, ट्विटरवर आमीर, रणबीर सोबतचे फोटो सगळ्यांनी टाकले होते. पण कुणाच्या हाती कुदळ, फावडा, पाटी घेतलेला फोटो दिसला नाही. पाणीटंचाईसाठी सरकारला जबाबदार धरणारे आम्ही, उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला असताना खांद्याला खांदा लावून श्रमदानास तयार होत नाही, हेच विदारक चित्र या काळात दिसून आले. आमीरचे वैशिष्टय म्हणजे, श्रमदान टाळून ‘सेल्फी छान’ म्हणणाऱ्या तरुणाईला त्याने नाराज केले नाही.