शिवसेनेने सातत्याने ‘जय महाराष्ट्र’चा नारा बुलंद केला. पण तो करीत असताना विदर्भातील प्रश्नांकडे, तेथील जनभावनांकडे तर दुर्लक्ष केलेच पण स्वत:च्या राजकीय वारसदारांनाही फारसे झुकते माप दिले नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो. कारण या शिवसैनिकाला मुंबईतून फारसे कुरवाळले जात नाही. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करताना विदर्भाकडे मात्र सेनेचे गेल्या काळात कमालीचे दुर्लक्ष झाले, हे नाकारता येणार नाही. गेल्या चार वर्षात सेनेने विदर्भातील एकामागे एक संपर्क प्रमुख बदलले. पण एकाही प्रमुखाने कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क ठेवला नाही. निवडणुकांच्या वेळी मुंबईतून सरदार येतात. तोफगर्जना करतात अन् निघून जातात. निवडणुकीची लढाई संपत येते तरी कार्यकर्त्यांना रसद मिळत नाही. नेहमीच्याच अशा अनुभवामुळे हतबल झालेला, मदतीची आस ठेवून हताश झालेला शिवसैनिक शेवटी भाजपाच्या गळाला लागला. त्याला विदर्भातील दमखम नेतत्व नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आपलेसे वाटू लागले. एकेकाळी विदर्भात शिवसेनेचा बऱ्यापैकी बोलबाला होता. प्रत्येक जिल्ह्यात आमदार होता. मात्र, आता संपूर्ण विदर्भात फक्त चार आमदारांवर शिवसेना गडप झाली आहे. लोकसभेत शिवसेनेला भाजपाची साथ होती. सेनेचे चार खासदार लोकसभेत पोहोचले. भाजपाने साथ सोडताच विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी फक्त ४ जागा सेनेच्या पदरात पडल्या. स्वबळाचा नारा विदर्भात तरी सेनेच्या अंगलट आला. बहुतांश जागांवर सेनेच्या उमेदवारांनी दखलपात्र मतेही घेतली नाही. पुन्हा सेनेचा स्वबळाचा नारा कायम आहे. उलट यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धार अधिक तीक्ष्ण केली आहे. मात्र, केवळ ‘आवाज कुणाचा’च्या गर्जना करून राज्यात एकहाती सत्ता मिळविता येणार नाही, हे सेनेच्या लक्षात आले आहे. वेगळ्या विदर्भाची भूमिका तीव्रतेने मांडताना विदर्भातील शिवसैनिकांना ‘पोलिटिकल पॉवर’ दिल्याशिवाय उपाय नाही, याची जाणीव ‘मातोश्री’लाही झाली आहे. विदर्भाने ज्याला साथ दिली त्यानेच मुंबईत राज्य केल्याचा इतिहास आहे. सत्तेसाठी ‘शंभर प्लस’ चे टार्गेट भेदण्यासाठी शिवसेनेला विदर्भाचा लळा लागल्याचे दिसते. मे च्या दुसºया आठवड्यात उद्धव ठाकरे नागपुरात आले. विदर्भातील तयारीचा आढावा घेतला. पाठोपाठ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही चाकं फिरवित संपर्क वाढविला. केवळ बैठकांनी विदर्भाला जिंकणं कठीण आहे. गरज आहे ती मंत्र्यांमार्फत विदर्भातील कार्यकर्त्यांना बळ देण्याची. कारण, लढाई आहे ती विदर्भात घट्ट पाय रोवून बसलेल्या भाजपाशी. हे सेनेला विसरून चालणार नाही.
सेनेला विदर्भाचा लळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:05 AM