शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

गाईला मिठी मारतानाचा फोटो पाठवा, आम्ही शेअर करू...

By अतुल कुलकर्णी | Published: February 12, 2023 9:50 AM

आपल्याकडे पशुसंवर्धन विभाग मिळावा म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते देव पाण्यात घालून बसतात.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई प्रिय एस. के. दत्ताजी, सचिव, ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया

आपण १४ फेब्रुवारीला गाईला मिठी मारण्याचा आदेश काढला. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी हे केल्याने तुम्ही मनाने श्रीमंत व्हाल. तुमचे जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरले जाईल. व्यक्तिगत आणि सामूहिक आनंद वाढेल, असंही आपण आदेशात म्हटलं होतं. इतका चांगला हेतू यामागे असताना काही नतद्रष्ट  लोकांनी देशभर त्याची खिल्ली उडवली. तुम्हाला नाइलाजाने आदेश मागे घ्यावा लागला. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही केवढी तयारी केली होती. मारकुट्या गाई बाजूला काढल्या होत्या. ज्या गाईंची शिंगं मोठी आहेत, त्या गाईंना कोणी मिठी मारायची हे आधीच ठरवून घेतलं होतं... विशिष्ट रंगाचा कपडा दिसला की आमच्यातल्या काही गाई चिडतात. त्यामुळे त्यांना मिठी मारतानाचा ड्रेस कोडदेखील आम्ही तयार केला होता. कोणत्या चौकात, कोणी गाई आणून उभ्या करायच्या..? प्रत्येक मिठीला किती रुपये तिकीट लावायचं... हे देखील ठरवलं होतं. पण तुम्ही माघार घेतल्यामुळे सगळ्या तयारीवर पाणी फिरलं आहे...

आपल्याकडे पशुसंवर्धन विभाग मिळावा म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते देव पाण्यात घालून बसतात. आयएस दर्जाचे अधिकारी या विभागाचे सचिव पद घ्यायला धावत पळत जातात. देशात पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांची संख्या भरपूर आहे. प्रत्येक जिल्ह्याला गाई-म्हशींसाठी तपासणी केंद्र आहेत. त्यांना दर्जेदार लसी मिळतात. चांगलं खाद्य मिळतं. असं चौफेर आनंदाचं वातावरण असताना, आता फक्त गाईला मिठी मारायचं बाकी होतं. आपलं चांगलं काम या एका मिठीमुळे उजळून निघालं असतं. पण तेही काही नतद्रष्ट लोकांनी हाणून पाडलं. आपल्याकडे प्रत्येक नेत्याला गाईंची किती काळजी आहे, हे आपण पाहातच आहोत. कोणीही गाईंना प्लास्टिक खाऊ देत नाही..! त्यांना फक्त हिरवागार चाराच मिळतो. त्यांचं खाद्य नेहरूंच्या काळापासून पाच रुपये किलो मिळायचं. जे आता २५ ते ३० रुपये किलो केल्यामुळं आपल्यालाही महाग खाद्य दिलं जातं, हे पाहून तमाम गाई खूश आहेत. भाकड गाईंबद्दल कोणाचे काहीही विचार असोत, आपल्या प्रत्येक नगरसेवकानं, आमदारानं गावोगावी गोशाळाच उघडल्या आहेत. त्यामुळं गाई एकदम आनंदात आहेत. महाराष्ट्रात तर पशुसंवर्धन विभागात प्रत्येक जिल्ह्यात पुरेसा स्टाफ आहे. गाईला काहीही झालं तर पटकन औषधोपचार मिळतो. मात्र काही लोक मुद्दाम निगेटिव्ह बोलत राहतात. गावात चांगल्या सोनोग्राफी मशीन नाहीत. पंढरपुरात गाय आजारी पडली तर तिला शिरवळला सोनोग्राफीसाठी न्यावं लागतं. एकाही तालुक्यात सक्षम यंत्रणा नाही. तत्काळ लसी मिळत नाहीत, असंही काही जण सांगत राहतात. नेहरूंच्या काळापासून

बिघडत चाललेलं चित्र असं पटकन कसं सुधारेल बरं..? कोरोनाच्या निमित्ताने आपण माणसांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावले, त्यामुळे कोरोनादेखील आपल्याकडून पळून गेला. हे यश कोणाला बघवत नाही. त्यामुळं उगाच गाईला लाळ्या खुरकूत, घटसर्प, लंपी इतर संसर्गजन्य आजार होतात, अशी अफवा पसरवण्याचं काम काही जण करत राहतात. दत्ता साहेब, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.दत्ता साहेब, एकाने तर ब्राझीलचं उदाहरण सांगितलं. तुम्हाला कळलं की नाही..? ब्राझीलने म्हणे काही चांगले वळू निवडले. त्यांच्यापासून जन्माला आलेल्या कालवडी वाढवल्या. त्या किती दूध देतात, याचा अभ्यास केला. ज्या गाई जास्त आणि चांगलं दूध देतात त्या कोणत्या वळूपासून जन्माला आल्या त्यांना सिद्ध वळू म्हणून बाजूला काढलं गेलं. अख्ख्या ब्राझीलमध्ये त्या वळूंचे सिमेन (वीर्यकांडी) वितरित केले. त्यामुळे ब्राझील दुधाच्या बाबतीत प्रचंड क्षमतेचा देश बनला. आपल्याकडे असं काहीही केलं जात नाही, असा गंभीर आरोप आपलं चांगलं काम न बघवणाऱ्या लोकांनी केला आहे. खरं तर त्यांना त्याच कांड्या फेकून मारल्या पाहिजेत...

आपण गाईंना मिठी मारण्याचा आदेश काढून असली फालतू, वायफळ बडबड करणाऱ्यांच्या तोंडात मारण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यांची बोलती बंद झाली होती. गाईंविषयी इतका अपार स्नेह, श्रद्धा आजपर्यंत कोणी दाखवली नव्हती. मात्र आदेश मागे घेतल्यामुळे त्या बडबड करणाऱ्या लोकांना बळ मिळालं असं आपल्याला वाटत नाही का, दत्ता साहेब..? जाऊ द्या. वाईट वाटून घेऊ नका. पुढच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला आपण ही आयडिया नक्की अंमलात आणू..! तोपर्यंत सगळ्यांचं मतपरिवर्तन होईल, याची पूर्ण खात्री आहे. तुम्ही मात्र १४ तारखेला आठवणीने गाईला मिठी मारतानाचा फोटो आम्हाला पाठवा. आम्ही आमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करू, आणि आमचा पाठिंबा जाहीर करू..! - तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकcowगाय